एचपी झेडबुक एक्स 2 : जाणून घ्या सर्व फिचर्स

By शेखर पाटील | Published: October 24, 2017 03:27 PM2017-10-24T15:27:41+5:302017-10-24T15:29:51+5:30

एचपी कंपनीने डिटॅचेबल म्हणजे लॅपटॉप आणि टॅबलेट या दोन्ही प्रकारांमध्ये वापरता येण्याजोगे झेडबुक एक्स२ हे मॉडेल सादर करण्याची घोषणा केली आहे.

hp z book x2: know all features | एचपी झेडबुक एक्स 2 : जाणून घ्या सर्व फिचर्स

एचपी झेडबुक एक्स 2 : जाणून घ्या सर्व फिचर्स

googlenewsNext

एचपी झेडबुक एक्स२ या मॉडेलमध्ये अतिशय उत्तमोत्तम फिचर्स आहेत. यामुळे कंपनीने हे जगातील पहिले टु-इन-वन वर्कस्टेशन असल्याचा दावा केला आहे. वर्कस्टेशनमध्ये प्रॉडक्टीव्हिटीसाठी अत्यंत गतीमान टुल्स दिलेले असतात. याचप्रकारे एचपी झेडबुक एक्स२ मध्येही फिचर्स असल्याचे यातून अधोरेखित करण्यात आले आहे. याला स्टायलस प्रकारातील डिजीटल पेनचा सपोर्ट देण्यात आला आहे. याच्या मदतीने रेखाटनासह नोटस् घेता येतील. हा पेन अतिशय दर्जेदार असून याचा विविध सृजनात्मक कामांमध्ये उपयोग करता येणार असल्याचे एचपी कंपनीने नमूद केले आहे. याला चार्जींगची गरजदेखील नसेल.

विशेष करून याच्या सोबत एक वर्षासाठी अडोबी क्रियेटिव्ह क्लाऊडची सेवा प्रदान करण्यात आली असून आर्टीस्ट मंडळीला याचा अतिशय उत्तम वापर करणे शक्य आहे. यात ड्युअल-फॅनयुक्त अ‍ॅक्टीव्ह कुलींग सिस्टीम, इनबिल्ट किकस्टँड आणि विलग करण्याजोगा ब्लॅकलीट कि-बोर्ड प्रदान करण्यात आला आहे. यामुळे लॅपटॉप म्हणून वापरतांना एखाद्या डेस्कटॉपप्रमाणे याचा वापर करता येतो. तर कि-बोर्ड काढल्यानंतर त्याला टॅबलेट म्हणून सुलभपणे वापरता येईल. तर थंडरबोल्ट ३ पोर्टयुक्त एचपी झेडबुक डॉकच्या मदतीने हे मॉडेल दुसर्‍या मोठ्या डिस्प्लेला जोडून वापरणेदेखील शक्य आहे. हे सर्व मॉडेल्स विंडोज १० प्रो या प्रणालीवर चालणारे असतील.

एचपी झेडबुक एक्स२ या मॉडेलमध्ये १४ इंच आकारमानाचा आणि ३४४० बाय २१६० पिक्सल्स म्हणजेच फोर-के क्षमतेचा एलईडी अँटी ग्लेअर डिस्प्ले देण्यात आला आहे. यात इंटेलचे कोअर आय-५ व आय-७ प्रोसेसर देण्यात आले आहेत. याच्या विविध व्हेरियंटमध्ये ८ ते ३२ जीबी इतकी रॅम असून स्टोअरेजसाठी  १२८, २५६ व ५१२ जीबी तसेच एक टेराबाईटचे पर्याय देण्यात आले आहेत. एनव्हिडीयाचे ग्राफीक कार्ड आणि फोर-के डिस्प्ले असल्यामुळे उच्च ग्राफीक्सवर काम करण्यासह गेमिंगसाठी हे मॉडेल उपयुक्त आहे. यातील बॅटरी तब्बल १० तासांचा बॅकअप देत असून यात फास्ट चार्जींगचा सपोर्ट असल्यामुळे अवघ्या ३० मिनिटात ५० टक्के चार्जींग होत असल्याचा एचपी कंपनीचा दावा आहे. यातील मुख्य कॅमेरा ८ मेगापिक्सल्सचा तर फ्रंट कॅमेरा एचडी क्षमतेचा असेल.

यात फिंगरप्रिंट स्कॅनरदेखील देण्यात आले आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे लष्करी उपकरणांसाठी असणार्‍या एमआयएल-एसटीडी ८१०जी या मानकावर याला तयार करण्यात आले आहे. यामुळे हे मॉडेल डस्टप्रूफ व वॉटरप्रूफ असून ते कोणत्याही विषम वातावरणात वापरता येईल. यात ब्ल्यु-टुथ आणि वाय-फायसह युएसबी टाईप-सी, युएसबी ३.०, थंडरबोल्ट, मायक्रो-एसडी कार्ड रीडर आदी फिचर्सही असतील. एचपी झेडबुक एक्स२ या मॉडेलच्या विविध व्हेरियंटचे मूल्य १,७४९ डॉलर्सपासून (सुमारे १,१४,०० रूपये) सुरू होणारे असेल. ग्राहकांना प्रत्यक्षात हे मॉडेल डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात मिळेल.

Web Title: hp z book x2: know all features

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.