ऑनर व्ह्यू १० स्मार्टफोनची घोषणा

By शेखर पाटील | Published: January 5, 2018 11:03 AM2018-01-05T11:03:19+5:302018-01-05T11:03:32+5:30

हुआवेची उपकंपनी असणार्‍या ऑनरने आपले ऑनर व्ह्यू १० स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली असून याचे मूल्य २९,९९९ रूपये इतके असेल.

Honor View 10 Smartphone Announcement | ऑनर व्ह्यू १० स्मार्टफोनची घोषणा

ऑनर व्ह्यू १० स्मार्टफोनची घोषणा

googlenewsNext

हुआवेची उपकंपनी असणार्‍या ऑनरने आपले ऑनर व्ह्यू १० स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली असून याचे मूल्य २९,९९९ रूपये इतके असेल. हुआवे कंपनीने चीनमध्ये नोव्हेंबर महिन्यात ऑनर व्ही १० हा स्मार्टफोन सादर केला होता. आता यालाच ऑनर व्ह्यू १० या नावाने भारतीय ग्राहकांना उपलब्ध करण्यात येणार आहे. याचे मूळ मॉडेल तीन व्हेरियंटमध्ये सादर करण्यात आले होते. यातील ६ जीबी रॅम व १२८ जीबी स्टोअरेजचे व्हेरियंट ग्राहकांना मिळणार आहे.

ऑनर व्ह्यू १० या मॉडेलमध्ये ५.९९ इंच आकारमानाचा आणि फुल एचडी प्लस अर्थात २१६० बाय १०८० पिक्सल्स क्षमतेचा फुल व्ह्यू या प्रकारातील तसेच १८:९ अस्पेक्ट रेशो असणारा डिस्प्ले प्रदान करण्यात आला आहे. यात ऑक्टा-कोअर किरीन ९७० प्रोसेसर असेल. तर वर नमूद केल्यानुसार याची रॅम ६ जीबी व स्टोअरेज १२८ जीबी असून ते २५६ जीबीपर्यंत वाढविण्याची सुविधा असेल. फास्ट चार्जींग सपोर्टसह यात ३७५० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. 

ऑनर व्ह्यू १० या स्मार्टफोनमध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप प्रदान करण्यात आला आहे. याच्या मागील बाजूस एलईडी फ्लॅश, पीडीएएफ आणि एफ/१.८ अपार्चरसह २० आणि १६ मेगापिक्सल्सचे दोन कॅमेरे असतील. यातील एक मोनोक्रोम तर दुसरा आरजीबी या प्रकारातील असेल. याद्वारे उत्तम दर्जाच्या प्रतिमांसह फोर-के क्षमतेचे व्हिडीओ चित्रीकरण करता येणार आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसाठी यात १३ मेगापिक्सल्सचा कॅमेरा असेल. हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या ओरिओ आवृत्तीवर आधारित इएमयुआय ८.० या युजर इंटरफेसवर चालणारा असेल. नेव्ही ब्ल्यू आणि मिडनाईट ब्लॅक या रंगांच्या पर्यायांमध्ये हा स्मार्टफोन ८ जानेवारीपासून अमेझॉन इंडिया या शॉपींग पोर्टलवरून ग्राहकांना खरेदी करता येणार आहे.

ऑनर व्ह्यू १० मॉडेलमध्ये फोर-जी व्हिओ-एलटीई नेटवर्क सपोर्टसह ब्ल्यू-टुथ, वाय-फाय, जीपीएस, मायक्रो-युएसबी, युएसबी टाईप-सी, एनएफसी, फिंगरप्रिंट स्कॅनर आदी फिचर्स आहेत. तर यात अ‍ॅक्सलेरोमीटर, गायरोस्कोप, ग्रॅव्हीटी, अँबिअंट लाईट सेन्सर्सदेखील प्रदान करण्यात आले आहेत. 

Web Title: Honor View 10 Smartphone Announcement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.