Mothers Day : आईबद्दल बरंच काही सांगून जाणारं गुगलचं 'क्यूट' डुडल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2018 02:09 PM2018-05-13T14:09:01+5:302018-05-13T14:09:01+5:30

गुगलचं होमपेज उघडताच, आई डायनोसॉर आणि बेबी डायनोसॉर एकत्र चालले असल्याचं चित्र समोर प्रकट होतं आणि ते पाहून खूप गंमत वाटते.

Google celebrates 'Mother's Day' with a doodle | Mothers Day : आईबद्दल बरंच काही सांगून जाणारं गुगलचं 'क्यूट' डुडल

Mothers Day : आईबद्दल बरंच काही सांगून जाणारं गुगलचं 'क्यूट' डुडल

Next

मुंबईः आत्मा आणि ईश्वर यांचं मीलन म्हणजे आई. आपल्याला जन्म देणाऱ्या, या जगात आणणाऱ्या, चालायला-बोलायला आणि जगायला शिकवणाऱ्या आईची महती शब्दांत सांगणं अशक्यच आहे. पण, मदर्स डे - अर्थात मातृदिनानिमित्त गुगलनं तयार केलेलं डुडल, आई-मुलाच्या हळव्या नात्याबद्दल बरंच काही सांगून जातं. 

गुगलचं होमपेज उघडताच, आई डायनोसॉर आणि बेबी डायनोसॉर एकत्र चालले असल्याचं चित्र समोर प्रकट होतं आणि ते पाहून खूप गंमत वाटते. मन प्रसन्न होतं आणि चेहऱ्यावर स्मितहास्य उमटतं. कारण, आईचं प्रेम, ममत्व, तिला वाटणारी बाळाची काळजी हे सगळे भाव त्यातून सहज जाणवतात. आपला हात घट्ट धरून चालणारी आई डोळ्यांपुढे उभी राहते. 

'अरे हो, जरा धीर धर, मला काय चार हात आहेत का?', हे वाक्य आपण सगळ्यांनीच लहानपणी ऐकलं असेल. आई डायनोसॉरच्या पाठीवरचे हातांचे  चार ठसे पाहून आपल्या आईचा तो 'डायलॉग' आठवतो आणि खुदकन हसू येतं. पण खरोखरच, आई जितकी कामं करते आणि ज्या वेगानं करते, ती पाहिली तर तिला चार हात आहेत की काय असंच वाटतं. 

गुगल डुडलमध्ये आई डायनोसॉर हिरव्या रंगात रंगवण्यात आलीय. हा रंग सुरक्षेचं, मातृत्वाचं प्रतीक मानला जातो. तर, बेबी डायनोसॉरचा पिवळा रंग आनंद, सकारात्मकता, ऊर्जा, खरेपणा आणि निष्ठेचं प्रतीक आहे. 

1908 मध्ये अमेरिकेत पहिल्यांदा 'मदर्स डे' साजरा करण्यात आला होता. त्यानंतर, गेल्या अनेक वर्षांपासून, आईबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी अनेक देशांमध्ये मातृदिन साजरा होतो.

Web Title: Google celebrates 'Mother's Day' with a doodle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.