असा मिळवा आपल्या घराचा 'डिजिटल आधार' !

By शेखर पाटील | Published: November 17, 2017 12:07 PM2017-11-17T12:07:37+5:302017-11-17T12:08:07+5:30

लवकरच देशातील प्रत्येक भौगोलिक पत्त्याला डिजिटल ओळख मिळणार असल्याचे केंद्र सरकारतर्फे संकेत मिळाले आहेत. यात प्रत्येक स्थानाला सहा अक्षरांचा युनिक पत्ता मिळणार आहे. जाणून घ्या ही प्रणाली नेमकी कसे कार्य करणार ते ?

Get your home 'Digital Support'! | असा मिळवा आपल्या घराचा 'डिजिटल आधार' !

असा मिळवा आपल्या घराचा 'डिजिटल आधार' !

Next

देशातील प्रत्येक व्यक्तीला आधारच्या माध्यमातून युनिक म्हणजेच एकमेवद्वितीय ओळख मिळालेली आहे. याच पद्धतीनं प्रत्येक घर, कार्यालय वा अन्य कोणत्याही भौगोलिक ठिकाणाला डिजिटल ओळख प्रदान करण्यासाठी डाक विभागाने तयारी सुरू केली आहे. यासाठी 'मॅप माय इंडिया' या नेव्हिगेशन क्षेत्रातील आघाडीच्या स्वदेशी कंपनीसोबत करार करण्यात आला आहे. याच्या अंतर्गत दिल्लीसह परिसरात ही प्रणाली कार्यान्वित झाली आहे. याला बहुतांश तज्ज्ञांनी पत्त्यांचा डिजिटल आधार म्हणून संबोधले आहे. येत्या काही महिन्यांमध्ये ही सिस्टीम पूर्ण देशभरात लागू होणार असल्याने आपण ती जाणून घेणे औचित्याचे ठरणार आहे.

काय आहे eLoc ? 

मॅप माय इंडिया कंपनीने ई-लोकेशन म्हणजेच eLoc ही अभिनव प्रणाली तयार केली आहे. याअंतर्गत देशातील 7 हजार शहरे आणि सुमारे सहा लाख खेड्यांमधील कान्याकोपर्‍याला डिजिटल पत्ता प्रदान करण्याची सुविधा देण्यात आली आहे. यात वैयक्तिक, व्यावसायिक तसेच शासकीय वास्तूंचा समावेश असेल. कुणालाही याचा अगदी मोफत वापर करता येईल. आजवर एखाद्या ठिकाणाचा पत्ता हा: **घर/प्लॉट/फ्लॅट क्रमांक, *** कॉलनी/नगर/इमारत, अमुक-तमुक परिसर, ***शहर  आणि *****पीन कोड क्रमांक या फॉर्मेटमध्ये दिला जातो. मात्र या सर्वांच्या ऐवजी अवघ्या सहा इंग्रजी अक्षरांमध्ये ( उदाहरणार्थ 8GDTYX वा  MMI000 ) प्रत्येक ठिकाणाला या प्रणालीच्या अंतर्गत डिजिटल ओळख मिळेल.

याचा उपयोग काय ?

ई-लोकेशन (eLoc) हे मॅप माय इंडियाचे अ‍ॅप अथवा संकेतस्थळावरून मिळवता येईल. यातील सर्च कॉलममध्ये सहा अक्षरांमधील डिजिटल पत्ता टाकल्यानंतर ते ठिकाण नकाशावर दिसेल. विशेष म्हणजे संबंधीत स्मार्टफोन युजर त्या पत्त्यावर कसा जाऊ शकतो? याचे पथदर्शनच (नेव्हिगेशन) त्याला दिसेल. तसेच याजवळची (निअरबाय) महत्त्वाची ठिकाणेही या नकाशावर दिसतील. म्हणजेच लांबलचक भौगोलिक पत्त्याऐवजी अवघ्या सहा अक्षरांमधील डिजीटल पत्त्याचा पर्याय अत्यंत आटोपशीर आणि सोयीस्कर राहणार आहे. यामुळे डाक खात्याचेही डिजिटायझेशन होईल. पोस्टमनला हा पत्ता स्मार्टफोनमधील अ‍ॅपवर टाकल्यानंतर संबंधीत भौगोलिक स्थानाचा लागलीच उलगडा होणाार असल्यामुळे डाक वितरणातही अडचण येणार नाही. हा डिजीटल युनिक क्रमांक विविध शासकीय योजनांच्या यशस्वी अंमलबजावणीसह लॉजिस्टीकमध्ये अचूकता आणण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

डिजिटल पत्ता कसा मिळवणार ?

मॅप माय इंडियाचे संकेतस्थळ आणि स्मार्टफोनमध्ये कुणीही आपले घर/कार्यालय/दुकान आदींसह अन्य वास्तूंसाठी सहा अक्षरी डिजिटल पत्ता मिळवू शकतो. यासाठी आपल्याला  http://www.mapmyindia.com/eloc  या युआरएलवर जाऊन संबंधित ठिकाण मॅप माय इंडियाच्या डाटाबेसमध्ये आहे की नाही? याचा शोध घ्यावा लागेल. यावर संबंधित ठिकाण नसल्यास https://maps.mapmyindia.com/add-a-place येथे जाऊन संबंधित पत्ता नकाशावर टाकावा लागेल. यानंतर आपल्या हा अक्षरांमधील युनिक पत्ता मिळू शकतो. मॅप माय इंडियाच्या स्मार्टफोन अ‍ॅपमध्येही ही सुविधा आहे.  विशेष म्हणजे या सर्व सेवा अगदी मोफत आणि वापरण्यासाठी सुलभ आहेत.

Web Title: Get your home 'Digital Support'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.