स्मार्टफोनच्या डिस्प्लेखाली असेल सेल्फी कॅमेरा

By शेखर पाटील | Published: January 25, 2018 12:03 PM2018-01-25T12:03:27+5:302018-01-25T12:04:35+5:30

लवकरच स्मार्टफोनच्या डिस्प्लेखालीच सेल्फी कॅमेर्‍याची सुविधा देण्यात याणार आहे. सॅमसंगने दाखल केलेल्या पेटंटच्या माध्यमातून ही माहिती समोर आली आहे.

Future Samsung smartphones could feature selfie camera under the display, patent suggests | स्मार्टफोनच्या डिस्प्लेखाली असेल सेल्फी कॅमेरा

स्मार्टफोनच्या डिस्प्लेखाली असेल सेल्फी कॅमेरा

Next

अलीकडच्या काळात 'बेझललेस डिस्प्ले' म्हणजेच कडा विरहीत डिस्प्ले लोकप्रिय होत आहेत. याच्या माध्यमातून युजरला वाढीव आकारमानाचा स्क्रीन वापरता येतो. तसेच याचा लूकदेखील अतिशय आकर्षक असतो. सॅमसंग कंपनीने गेल्या वर्षी सादर केलेल्या गॅलेक्सी एस८ आणि एस८ प्लस या दोन्ही स्मार्टफोनपासून बेझललेस डिस्प्लेच्या वापरास प्रारंभ केला आहे. आता याच प्रकारच्या डिस्प्लेला अजून नवीन आयाम देण्यासाठी नवीन पेटंट दाखल करण्यात आले आहे. यात डिस्प्लेच्या वरील बाजूस असणारा सेल्फी कॅमेरादेखील डिस्प्लेखाली देण्यात येणार आहे. याच्या सोबत कॉल ऐकण्यासाठी देण्यात येणारा स्पीकरदेखील डिस्प्लेखाली असणार आहे. याच्या माध्यमातून आगामी कालखंडात खर्‍या अर्थाने परिपूर्ण डिस्प्ले वापरता येणार आहे.

सॅमसंग कंपनीने दाखल केलेल्या पेटंटमध्ये डिस्प्लेच्या खाली सेल्फी कॅमेरा आणि स्पीकर असणार आहे. यासोबत प्रॉक्झीमिटी आणि अँबिअंट लाईट सेन्सरदेखील याच ठिकाणी असतील. यासाठी डिस्प्लेवर अतिशय बारीक आकाराचे चार छिद्रे देण्यात आलेली असून यातून अनुक्रमे फ्रंट कॅमेरा, स्पीकर आणि प्रॉक्झीमिटी व अँबिअंट लाईट सेन्सर काम करतील. विशेष म्हणजे डिस्प्लेच्याच खालील बाजूस फिंगरप्रिंट स्कॅनर दिलेले असेल. गत मे महिन्यात हे पेटंट सादर करण्यात आले होते. याला मंजुरी मिळाली असून ते प्रसिध्द करण्यात आले असून यामुळे याबाबतची माहिती जगासमोर आली आहे. सॅमसंग कंपनी पुढील महिन्यात बार्सिलोना शहरात होणार्‍या ‘मोबाईल वर्ल्ड काँग्रेस’मध्ये आपले गॅलेक्सी एस९ आणि एस९ प्लस हे उच्च श्रेणीतील स्मार्टफोन्स सादर करण्याचे संकेत आधीच मिळाले आहेत. २६ फेब्रुवारी रोजी याचे अनावरण करण्यात येणार आहे. यात या पेटंटमधील फिचर्स असतील का? याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

( छायाचित्र कॅप्शन :- सॅमसंगच्या पेटंटमध्ये याबाबत दिलेले रेखाटन)

Web Title: Future Samsung smartphones could feature selfie camera under the display, patent suggests

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.