Asus Zenfone live price cut | असुस झेनफोन लाईव्हच्या मूल्यात कपात

मे 2017 मध्ये असुस कंपनीने झेनफोन लाईव्ह हा स्मार्टफोन ९,९९९ रूपये मूल्यात लाँच केला होता. याचे मूल्य मध्यंतरी एक हजार रूपयांनी कमी करण्यात आले होते. आता यात पुन्हा एकदा एक हजार रूपयांची कपात करण्यात आली आहे. परिणामी ग्राहकांना हा स्मार्टफोन ७,९९९ रूपयात खरेदी करता येणार आहे. याची खासियत म्हणजे या स्मार्टफोनमध्ये सेल्फीवर रिअलटाईम ब्युटिफिकेशनची प्रक्रिया करत याचे लाईव्ह स्ट्रीमिंग करण्याची सुविधा आहे. यासाठी यात सेल्फीचे ब्युटिलाईव्ह अ‍ॅप इनबिल्ट स्वरूपात प्रदान करण्यात आले आहे. यामुळे या स्मार्टफोनमधील फ्रंट कॅमेर्‍याच्या मदतीने कुणी सेल्फी काढल्यानंतर त्याच्यावर विविध पध्दतीने प्रक्रिया करत त्याचा दर्जा सुधारण्यात येतो. यानंतर या प्रतिमा/व्हिडीओचे सोशल मीडियात स्ट्रीमिंग करण्याची सुविधादेखील यात देण्यात आली आहे. याला उत्तम दर्जाच्या ड्युअल मायक्रोफोनची जोड देण्यात आली आहे. 

असुस झेनफोन लाईव्ह हे मॉडेल अँड्रॉइडच्या मार्शमॅलो आवृत्तीवर चालणारे असून यावर झेनयुआय ३.५ प्रदान करण्यात आला आहे. यात पाच इंच आकारमानाचा आणि एचडी म्हणजेच १२८० बाय ७२० पिक्सल्स क्षमतेचा २.५ डी वक्राकार आयपीएस डिस्प्ले प्रदान करण्यात आला आहे. डोळ्यांच्या सुरक्षेसाठी यावर ब्ल्यु-लाईट फिल्टर दिलेले आहे. याची रॅम दोन जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज १६ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने १२८ जीबीपर्यंत वाढविता येईल. फोर-जी व्हिओ-एलटीई नेटवर्क सपोर्टसह यात वाय-फाय, ब्ल्यु-टुथ, जीपीएस, एफएम रेडिओ आदी फिचर्स असतील.

आसुस झेनफोन लाईव्ह हा स्मार्टफोन २६५० मिलीअँपिअर प्रति-तास इतक्या क्षमतेची बॅटरीने सज्ज आहे. तर यात १३ आणि ५ मेगापिक्सल्स क्षमतांचे कॅमेरे प्रदान करण्यात आले आहे. यातील मुख्य कॅमेर्‍यामध्ये एफ/२.० अपार्चर आणि एलईडी फ्लॅश असेल. तर फ्रंट कॅमेर्‍यात सॉफ्ट एलईडी फ्लॅश, एफ/२.२ अपार्चर आणि ८२ अंशातील वाईड अँगल व्ह्यू असणारी लेन्स देण्यात आलेली आहे. हा स्मार्टफोन भारतीय ग्राहकांना ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पध्दतींमध्ये खरेदी करता येईल.


Web Title: Asus Zenfone live price cut
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.