गर्भपात गैरप्रकारांच्या तक्रारी दफ्तरी दाखल

  • First Published :21-March-2017 : 05:35:07

  • पुणे : महापालिकेकडे गर्भपात केंद्रामध्ये होत असलेल्या गैरप्रकारांबाबत तक्रारी दाखल होऊनही त्यावर कारवाई न करता त्या दफ्तरी दाखल करण्यात आल्याचा आरोप लेक लाडकी संस्थेचे समन्वय गणेश बोऱ्हाडे यांनी केला आहे. याप्रकरणी कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी आरोग्य प्रमुख डॉ. एस. टी. परदेशी व उपआरोग्यप्रमुख डॉ. अंजली साबणे यांच्याविरुद्ध कारवाई करावी अशी मागणी बोऱ्हाडे यांनी महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांच्याकडे केली आहे.

    कसबा पेठ, भवानी पेठ व नारायण पेठेतील ३ हॉस्पिटलनी गर्भपात कायदा १९७१च्या विविध कलमांचा भंग केल्याप्रकरणी त्यांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. त्यानुसार आरोग्यप्रमुख डॉ. एस. टी. परदेशी यांनी त्यांना नोटिसा बजावल्या होत्या. त्यापैकी भवानी पेठेतील हॉस्पिटलकडून २१ आठवड्यांचा गर्भपात करण्यात आल्याने त्यावर योग्य ती कारवाई करावी अशा सूचना अतिरिक्त आरोग्य संचालकांकडून देण्यात आल्या होत्या. मात्र त्यांच्यावर कारवाई न करता त्या दफ्तरी दाखल करण्यात आल्या अशी तक्रार बोऱ्हाडे यांनी आयुक्तांकडे केली आहे.

    गेल्या ४ वर्षांत गर्भपात केंद्राविरुद्ध एकही तक्रार दाखल नसल्याची माहिती १५ दिवसांपूर्वी उपआरोग्य प्रमुख डॉ. अंजली साबणे यांनी दिली होती. यापार्श्वभूमीवर गर्भपात केंद्रांविरुद्ध दाखल झालेल्या तक्रारींची कागदपत्रे बोऱ्हाडे यांनी सादर केली आहेत.

    गणेश बोऱ्हाडे म्हणाले, ‘‘गर्भपात कायद्यामध्ये नोटिसा देण्याची तरतूद नाही, तरीही हॉस्पिटलना नोटिसा देण्यात आल्या. त्यानंतर त्रुटी आढळून येत नसल्याचे कारण देत गर्भपात केंद्रांविरुद्ध कारवाई करण्यात आलेली नाही.’’ (प्रतिनिधी)

महत्वाच्या आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लोकमत अॅप: Android | IOS

महत्वाच्या बातम्या