१०४ गावे होणार कॅशलेस

  • First Published :10-January-2017 : 00:02:23 Last Updated at: 10-January-2017 : 00:02:50

  • जालना : नोटाबंदीनंतर निर्माण झालेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी तसेच गावे कॅशलेस करण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या आवाहनाला बँकांनी प्रतिसाद दिला आहे. जिल्ह्यातील १०४ बँकांनी १०४ गावे दत्तक घेतली असून, ही गावे कॅशलेस करण्यासाठी बँकांनी पुढाकार घेतला आहे.

    गतवर्षी ८ नोव्हेंबर रोजी हजार व पाचशे रूपयांच्या झालेल्या नोटाबंदीनंतर व्यवहार ठप्प झाले होते. दोन हजार रूपयांचे सुटे नसल्याने व्यापाऱ्यांसह नागरिक हातबल झाले होते. एकूणच नोटाबंदीनंतर निर्माण झालेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी व रोखी ऐवजी आॅनलाईन अथवा कॅशलेस व्यवहार करण्यासाठी जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे यांनी बँक अधिकाऱ्यांना सर्वच बँकांना आवाहन केले होत. जिल्ह्यातील १०४ राष्ट्रीयीकृत बँकांच्या शाखांना गावे कॅशलेस करण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. एका बँकेने एक म्हणजेच १०४ गावे पहिल्या टप्प्यात कॅशलेस होणार आहेत.

    लगेच गावे कॅशलेस होणार नसली तरी मध्यमवयीन व युवा पिढीने कॅशलेस व्यवहार करण्यास सुरूवात केल्याचे चित्र आहे. या सर्व गावांत बँकांकडून कॅशलेस व्यवहार किती सोयीस्कर आणि सोपा आहे याबाबत शिबिराच्या माध्यमातून पटवून दिले जात आहे. काही बँकांनी या गावात डेबिट कार्ड, रूपे कार्डचे वाटप केले आहे. त्यामुळे ज्या ग्रामस्थांकडे एटीएम कार्ड नव्हते ते त्यांना देऊन व्यवहार कसे करावेत याबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे. प्रत्येक बँकेने ग्राहकांची गरज व मागणीनुसार डेबिट व रूपे कार्ड दिले आहेत.यासोबत घरबसल्या बँकेचे व्यवहार करता यावेत म्हणून माबाईल बँकिंग, आॅनलाईन बँकिंगचे कशी करावी याचे नियमित मार्गदर्शन करण्यात येत आहे. जे ग्राहक मोबाईल बँकिंग करू शकतात त्यांच्या मोबाईलमध्ये ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. बँकेचे अ‍ॅपही उपलब्ध असून ग्राहकही वेळेची बचत तसेच कॅशलेस व्यवहार करण्यासाठी प्रतिसाद देत आहेत. (प्रतिनिधी)महत्वाच्या आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लोकमत अॅप: Android | IOS