श्रीकांत आॅस्टे्रलिया सिरीजसाठी सज्ज

  • First Published :19-June-2017 : 23:50:52

  • सिडनी : रविवारी इंडोनेशिया ओपन सुपर सिरीजचे दिमाखदार विजेतेपद पटकावल्यानंतर भारताचा स्टार शटरल किदाम्बी श्रीकांत मंगळवारपासून सुरु होत असलेल्या आॅस्टे्रलिया सुपर सिरीज स्पर्धेसाठी सज्ज झाला आहे. त्याचप्रमाणे ‘फुलराणी’ सायना नेहवाल महिला गटात आपले जेतेपद कायम राखण्याच्या उद्देशाने कोर्टवर उतरेल. सलग दोन स्पर्धांच्या अंतिम फेरीत धडक मारलेला श्रीकांत सध्या चांगल्या फॉर्ममध्ये असून बुधवारी तो पहिला सामना पात्रता फेरीतून मुख्य फेरी गाठणाऱ्या खेळाडूविरुद्ध खेळेल.

    जकार्तामध्ये आॅलिम्पिक रौप्य पदक विजेता ली चोंग वेई आणि सुवर्ण विजेता चेन लोंगला पराभूत करणारा एचएस प्रणॉय पात्रता फेरीत मंगळवारी जपानच्या काजुमासा साकाईविरुध्द लढेल. इंडोनेशिया ओपनच्या उपांत्य फेरीत प्रणॉयला साकाईविरुध्द पराभूत व्हावे लागले होते. यानंतर याच साकाईला नमवून श्रीकांतने बाजी मारली होती.

    महिला गटात सायना नेहवाल आणि पी. व्ही. सिंधू या भारताच्या आॅलिम्पिक पदक विजेत्या खेळाडूंचा मार्ग सोपा नसेल. पहिल्याच सामन्यात इंडोनेशिया ओपन उपविजेती कोरियाच्या सुंग जी ह्यूनचे कडवे आव्हान सायनापुढे असेल. त्याचवेळी, इंडोनेशिया ओपन जिंकलेल्या जपानच्या सयाको सातोविरुध्द सिंधूचा सलामीचा सामना होईल. (वृत्तसंस्था)महत्वाच्या आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लोकमत अॅप: Android | IOS