पाकच्या खेळाडूंच्या प्रतिभेला सलाम

 • First Published :19-June-2017 : 23:48:18

 • व्हीव्हीएस लक्ष्मण लिहितात...

  चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाकिस्तानने जेतेपदाला गवसणी घालताना मोठा संदेश दिला आहे. जर तुमच्याकडे कौशल्य आहे, दृढनिश्चिय आहे आणि शिखर गाठण्याचा निर्धार आहे तर तुमच्यासाठी काहीच अशक्य नाही.

  दोन आठवड्यांपूर्वी पाकिस्तानचा संघ कमकुवत असल्याचे भासत होते. सलामी लढतीत भारताविरुद्ध मोठ्या फरकाने पराभव स्वीकारावा लागल्यानंतर त्यांचे वन-डे क्रमवारीतील स्थान (आठवे स्थान) योग्य असल्याचे भासत होते. संघासाठी पुढचा मार्ग खडतर व अडथळ्यांचा होता. अशा परिस्थितीमध्ये पाकिस्तानच्या खेळाडूंना जो आत्मविश्वास दाखविला तीच त्यांची जेतेपदानंतर खरी ओळख निर्माण करणारी ठरली. संघात जेतेपद पटकावण्याची क्षमता असल्याचे त्यांनी सिद्ध केले.

  अंतिम लढतीच्या दिवशी पाकिस्तानचे प्रशिक्षक मिकी आर्थर यांच्यासोबत चर्चा झाली. त्यांनी सांगितले की, भारताविरुद्धच्या पराभवानंतर खेळाडू दु:खी झाले होते. पराभवामुळे ते निराश झाले होते, पण त्याच्यासोबत त्यांच्या हृदयावर मोठा आघात झाला होता. मिकी आर्थर यांनी खेळाडूंना संदेश दिला की, ‘यापेक्षा वाईट स्थिती तुमची होऊ शकत नाही. निकालाची पर्वा न करता बेदरकारपणे खेळा, आनंद साजरा करा आणि संघासाठी सर्वोत्तम खेळण्याचा प्रयत्न करा.’

  प्रशिक्षकाच्या सल्ल्याने चमत्कार झाला. सर्वकाही गमावल्यानंतर बेदरकारपणे पुनरागमन करणे पाकिस्तान क्रिकेटची विशेषता ठरली आहे. याची प्रचिती युवा सलामीवीर फखर जमानने केवळ एका लढतीमध्ये आपल्या आकर्षक फलंदाजीद्वारे दिली. त्याने पहिल्या १० षटकांमध्ये आक्रमक खेळी करताना दुसऱ्या टोकावर उभ्या असलेल्या अझहर अलीला संयमी फलंदाजी करण्यास बाध्य केले. त्याचसोबत त्याने मधल्या फळीतील फलंदाजांना प्रेरित केले. जर शहजादच्या स्थानी युवा सलामीवीराला संधी मिळाली नसती तर कदाचित ओव्हलवर यशाची ही गाथा लिहिली गेली नसती.

  पाकिस्तानच्या विजयात त्यांच्या गोलंदाजांची भूमिका महत्त्वाची ठरली. विशेषता हसन अलीची. ५० षटकांच्या क्रिकेटमध्ये विजय मिळवण्यासाठी मधल्या षटकांमध्ये बळी घेणे आवश्यक आहे, असे आम्ही वारंवार म्हटले आहे आणि हसन अलीने ही जबाबदारी योग्यपणे सांभाळली आहे. स्पर्धेत सहभागी संघांमध्ये पाक असा एकमेव संघ आहे की, त्यांचा रिव्हर्स स्विंग मारा प्रभावशाली ठरला आहे. सरफराज अहमदने मोहम्मद आमिर व जुनेद खान यांच्यावर विश्वास दाखवित त्यांचा चांगला वापर केला आहे. त्याचसोबत हसनने मधल्या षटकांमध्ये चांगली गोलंदाजी करीत संघाला यश मिळवून दिले.

  सरफराजचे नेतृत्व चांगले झाले. धाडसी निर्णय घेण्याची तयारी असल्याचे त्याने दाखवून दिले. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध इमाद वसीम व मोहम्मद हफीज यांनी चमकदार गोलंदाजी केली तर श्रीलंकेविरुद्ध सरफराज व आमिर यांनी संयमी खेळी करीत संघाला विजय मिळवून दिला. सर्वंच खेळाडू यशस्वी ठरत असतील तर पाकला रोखणे कठीण असते. याची प्रचिती १९९२ च्या विश्वकप स्पर्धेत अनुभवायला मिळाली. पाकिस्तानला भारताच्या तुलनेत विजेतेपदाची अधिक गरज होती. भारतीय संघाने या स्पर्धेत वर्चस्व गाजवले, पण अंतिम लढतीत खेळाडू अपयशी ठरले. त्यामुळे भारताला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. (गेमप्लॅन)महत्वाच्या आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लोकमत अॅप: Android | IOS