भारताच्या सर्व योजना अपयशी ठरल्या

  • First Published :19-June-2017 : 23:45:56

  • अयाझ मेमन, संपादकीय सल्लागार

    चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारताला पाकिस्तानकडून खूप मोठा पराभव पत्करावा लागला. साहजिकच भारतीय पाठीराखे निराश झाले असतील आणि ते सहाजिकच आहे. कारण, अंतिम सामन्याआधी भारतीय संघाचा प्रवास पाहिला तर ते नक्कीच जेतेपद राखतील अशीच पक्की खात्री होती; पण अंतिम सामन्यादिवशी सर्व गोष्टी चुकीच्या झाल्या.

    नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजीचा निर्णय चुकीचा होता असे आता वाटते; पण पाकिस्तानला इतका मोठा विजय मिळेल, अशी कोणालाही कल्पना नव्हती. तसेच भारताची गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्ही अपयशी ठरेल, असेही कोणाला वाटले नसेल. क्रिकेटविश्वात भक्कम फलंदाजी मानल्या जाणाऱ्या भारताकडून केवळ हार्दिक पांड्याने एकाकी झुंज दिली. त्यात, आयसीसी क्रमवारीमध्ये पाकिस्तान आठव्या स्थानी, तर भारत टॉप थ्रीमध्ये आहे. यामुळेही हा पराभव अत्यंत निराशाजनक ठरला; पण सर्वच गोष्टी एकाचवेळी अपयशी ठरणे हा निव्वळ योगायोग ठरला आणि हे खेळामध्ये होत असते. जेव्हा बलाढ्य संघ लहान संघाकडून पराभूत होतो, तेव्हा त्या संघाच्या सर्वच योजना फोल ठरतात.

    हेच नेमके भारताच्या बाबतीत झाले. टीम इंडियाच्या सर्व योजना फोल ठरल्या, तर पाकिस्तानने आखलेल्या सर्व योजना यशस्वी झाल्या. बऱ्यापैकी फलंदाजी असलेला पाकिस्तान ३३८ धावा उभारेल याचा विचारही कोणी केला नव्हता. फखर झमानकडे मोठी धावसंख्या उभारण्याची क्षमता होती. त्याने तशीच खेळी केली आणि महत्त्वाचे म्हणजे त्याला नशिबानेही साथ दिली. एका नोबॉलवर तो बाद झाला होता. यानंतर बघता बघता ३३८ धावा झाल्या. या धावांचा कोणी विचारही केला नव्हता. कारण भारताची योजना होती की, जरी पाकिस्तानने प्रथम फलंदाजी केली तर त्यांना २५०-२६० धावांमध्ये रोखता येईल; पण भुवनेश्वर कुमार, हार्दिक पांड्या यांचा अपवाद सोडल्यास भारताचे सर्वच गोलंदाज अपयशी ठरले. खास करून फिरकीपटूंनी निराशा केली. यानंतर मोहम्मद आमिरने भेदक मारा करताना अव्वल तीन फलंदाज बाद करून भारताच्या फलंदाजीला खिंडार पाडले. यानंतर भारत सामना किती धावांनी हरणार हेच पाहणे शिल्लक राहिले होते.

    पाकिस्तानने हा सामना मोठ्या जोखमीने खेळला. फखर जमनने खूप मोठी जोखीम घेत फटकेबाजी केली. आमिर, हसन अली यांनी मोठी गुणवत्ता दाखविली. या मोठ्या रिस्कचे पाकिस्तानला जबरदस्त विजयाच्या रूपाने बक्षीसही मिळाले. भारतीय संघ हरला हे खरे असले तरी, मी फार निराश नाही. कारण, माझ्या मते हा संघ अजूनही खूप मजबूत आहे. चॅम्पियन आहे. एक दिवस खेळ खराब होतो आणि खेळामध्ये असे होत असते.महत्वाच्या आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लोकमत अॅप: Android | IOS