IPL 10 - तळाशी असलेल्या गुजरात लायन्सचा सामना कोलकाताशी

 • First Published :21-April-2017 : 14:29:14 Last Updated at: 21-April-2017 : 14:37:11

 • - आकाश नेवे

  आयपीएलच्या दहाव्या पर्वात आज रात्री ८ वाजता तळाशी असलेल्या सुरेश रैनाच्या गुजरात लायन्स संघाची गाठ केकेआरशी पडणार आहे. विजयाच्या हॅट्ट्रिकनंतर केकेआर आता गुणतालिकेत आघाडीवर आहे. तर संघातील खेळाडूही चांगलेच फॉर्ममध्ये आहे. तर त्याउलट परिस्थिती गुुजरात लायन्सची आहे. रवींद्र जडेजा, अरॉन फिंच, ड्वेन स्मिथ हे गेल्या सामन्यात अपयशी ठरले.

  कोलकाता नाईट रायडर्सने आतापर्यंत पाचपैकी चार सामन्यांत विजय मिळवला आहे, तर गुजरातला फक्त एका सामन्यात विजय मिळाला आहे. केकेआरने सांघिक खेळ करत विजय खेचून आणला. कर्णधार गौतम गंभीर मनीष पांडे शानदार फॉर्ममध्ये आहे. दिल्ली विरोधात त्याने नाबाद ६९ धावा केल्या होत्या, तर युसुफ पठाणनेदेखील ५९ धावा केल्या होत्या.

  दुसरीकडे सुरेश रैनाच्या नेतृत्वाखाली गुजरात लायन्सला फलंदाजीत आणि गोलंदाजीत अपयशाचा सामना करावा लागत आहे. फिरकीपटूंनी तर घोर निराशा केली.

  आजच्या सामन्यानंतर केकेआरला ईडनवरच आरसीबीविरुद्ध सामना खेळायचा आहे. संघाची कामगिरी पाहता फारसे बदल होतील, असे वाटत नाही. अशा वेळी बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसन याला सातत्याने राखीव बाकावर बसावे लागत आहे. आंद्रे रसेलचे स्थान घेणारा कोलिन डी ग्रॅण्डहोमे हा अपयशी ठरल्याने शाकिबला संधी मिळू शकते. केकेआरचे फिरकीचे त्रिकूट सुनील नारायण, कुलदीप यादव आणि युसुफ पठाण सामन्यात रंगत आणतात. याच फिरकीने सनरायजर्स हैदराबादवर केकेआरला १७ धावांनी विजय मिळवून दिला होता.

  पॉइंट्स टेबल

  रैनापुढे आव्हान राहील, ते संघात संतुलन साधण्याचे. ड्वेन स्मिथ आणि अ‍ॅरोन फिंच हे अपयशी ठरल्याने जेसन राय आणि जेम्स फॉल्कनर यांना संधी मिळू शकते. मात्र, ड्वेन ब्राव्हो जखमी असल्याने संघाच्या समस्येत भर पडली. स्टार आॅल राऊंडर रवींद्र जडेजा ‘क्लिक’व्हावा अशी संघाची अपेक्षा असेल. आरसीबीविरुद्ध ५७ धावा मोजूनही तो बळी घेऊ शकला नव्हता. केरळचा युवा वेगवान गोलंदाज बासिल थम्पी याने भेदक मारा करीत ख्रिस गेलला बाद केले होते. केरळचा हा युवा गोलंदाज गुजरात संघाची एक भक्कम बाजू ठरत आहे. त्याने आपल्या भेदक माऱ्याने हैदराबाद आणि बंगळुरूच्या फलंदाजांना चांगलेच अडचणीत आणले होते. थम्पी जवळपास १३५ ते १४० किमी वेगाने मारा करतो. केकेआरला थम्पी आणि अ‍ॅड्र्यु टे यांच्यापासून सावध राहावे लागेल. मॅक्क्युलमने बंगळुरू विरोधात दमदार अर्धशतक केले होते. युवा इशान किशननेदेखील मोक्याच्या वेळी दमदार खेळी केली होती. या दोघांना इतर फलंदाजांची साथ लाभली नाही. गुजरातच्या या लायन्सची एकत्र मोट बांधून संघाला विजयाकडे नेण्याचे आव्हान कर्णधार म्हणून सुरेश रैनासमोर आहे.महत्वाच्या आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लोकमत अॅप: Android | IOS

महत्वाच्या बातम्या