कोल्हापुरात दंगल; प्रचंड तणाव

By admin | Published: June 1, 2014 02:44 AM2014-06-01T02:44:21+5:302014-06-01T02:46:40+5:30

पाच ते सहा हजारच्या संतप्त जमावाने तुफान दगडफेक करून २५०च्या वर दुचाकी तर ५० हून अधिक चारचाकी वाहनांची प्रचंड नासधूस केली

Riots in Kolhapur; Tremendous stress | कोल्हापुरात दंगल; प्रचंड तणाव

कोल्हापुरात दंगल; प्रचंड तणाव

Next

कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज व शिवसेनाप्रमुख कै. बाळासाहेब ठाकरे यांच्या आक्षेपार्ह प्रतिमा फेसबुकवर टाकल्याच्या घटनेनंतर कोल्हापुरात शनिवारी मध्यरात्री दंगल उसळली. शिवाजी चौकात जमलेल्या पाच ते सहा हजारच्या संतप्त जमावाने शहरातील बिंदू चौक, मटण मार्केट, महाद्वार रोड, शिवाजी चौक, अकबर मोहल्ला परिसर, देवल क्लब चौक, कसबा बावडा आदी ठिकाणी तुफान दगडफेक करून २५०च्या वर दुचाकी तर ५० हून अधिक चारचाकी वाहनांची प्रचंड नासधूस केली तसेच प्रार्थनास्थळावरही दगडफेक केली. दोन चारचाकी वाहने व एक चपलाचे दुकान पेटवून देण्यात आले. दगडफेकीत दोन पोलीस कर्मचारी तसेच एक छायाचित्रकार जखमी झाला. शहरातील परिस्थिती हाताबाहेर गेल्याने कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रितेश कुमार, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा रात्री सव्वाएकच्या सुमारास शिवाजी चौक येथे आले. त्यांनी जमावाला शांत राहण्याचे आवाहन केले. तरीही जोपर्यंत बदनामी करणार्‍या संशयिताला अटक होत नाही, तोपर्यंत येथून न हलण्याचा पवित्रा जमावाने घेतला. दरम्यान, उद्या रविवारी या निषेधार्थ हिंदूत्ववादींनी कोल्हापूर बंदची हाक दिली आहे. शनिवारी रात्री नऊच्या सुमारास हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना फेसबुकवर छत्रपती शिवाजी महाराज व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आक्षेपार्ह प्रतिमा फेसबुकवर टाकल्याचे समजताच ते तक्रार देण्यासाठी जुना राजवाडा व शाहूपुरी पोलीस ठाण्यात जमले. पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर कार्यकर्ते शिवाजी चौक येथे जमू लागले. घटनेची माहिती समजेल तसे शहराच्या प्रत्येक भागातून कार्यकर्ते जमल्याने पाच ते सहा हजारांचा जमाव शिवाजी चौकात जमला व प्रचंड घोषणाबाजी सुरू केली. तणाव पाहून पोलिसांनी कडक बंदोबस्त तैनात केला. यावेळी आमदार राजेश क्षीरसागर यांनी जमावासमोर कोल्हापूर बंदची हाक दिली. याचदरम्यान काही कार्यकर्ते भवानी मंडपच्या दिशेने धावत जाऊन प्रार्थना स्थळावर दगडफेक करू लागले. ही दगडफेक बराच वेळ सुरू होती. यानंतर संतप्त जमाव परिसरातील प्रत्येक गल्लीबोळात शिरून दगडफेक व वाहनांची मोडतोड करू लागला. यामध्ये बिंदू चौक, मटण मार्केट, महाद्वार रोड, शिवाजी चौक, अकबर मोहल्ला परिसर, देवल क्लब चौक या परिसरातील घरांवर दगडफेक करण्यात आली. तसेच दारात लावलेल्या चार चाकी व दुचाकी वाहनांची प्रचंड तोडफोड करण्यात आली. एकाच वेळी या परिसरात तोडफोड सुरू झाल्याने पोलिसांचीही धावपळ उडाली. त्यांनी लाठीमार करून जमावाला पांगविण्यास सुरुवात केली. यावेळी राज्य राखीव दलाच्या तुकड्यांना पाचारण करण्यात आले. दरम्यान, एका गटाने महाद्वार रोडवरील एका दुकानाला आग लावून तेथे लूट केली. तर दुसर्‍या गटाने देवल क्लबजवळ चिकन वाहून नेणारी जीप व एक मारूती मोटार पेटवून दिली. यावेळी काही तरुणांनी याच चौकातील अल्लादियाँ खाँ यांचा पुतळाही पाडला. रात्री उशिरापर्यंत तोडफोडीचे सत्र सुरू होते व शहरात प्रचंड तणाव होता. फक्त तोडफोड शिवाजी चौक, बिंदू चौक, महाद्वार रोड, भाऊसिंगजी रोड, मटण मार्केट परिसरातील हातगाड्यांसह लहान दुकानांची जमावाने मोठी तोडफोड केली; तर काही ठिकाणी हातगाड्या रस्त्यांवर उलट्या करून टाकल्या होत्या. या परिसरातील वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यात आले. अचानक दिवे बंद शिवाजी चौक येथील रात्री बाराच्या सुमारास अचानक दिवे बंद झाले आणि जोरदार दगडफेक करण्यात आली. यावेळी पोलिसांनी बळाचा वापर करत जमावाला पांगविण्याचा प्रयत्न केला. मात्र लाठीहल्ला होता हे पाहताच जमाव अधिकच आक्रमक झाला. कोण कुठे पळते हे कळतच नव्हते. अचानक दगडफेक झाल्यामुळे अनेकजण जखमी झाले. यामध्ये दैनिकांचे छायाचित्रकार व पत्रकारही जखमी झाले. आमदार राजेश क्षीरसागर पुन्हा शिवाजी चौकात आमदार राजेश क्षीरसागर रात्री सव्वाच्या सुमारास पुन्हा शिवाजी चौकात आपल्या कार्यकर्त्यांमध्ये येऊन जमावाला शांत राहण्याचे आवाहन करत होते. आपल्यामुळे इतरांना त्रास होऊ देऊ नका, शांततेने घरी जा, अशी विनंती ते करत होते. जमाव फेसबुकवर अपलोड करणार्‍या समाजकंटकाला तत्काळ अटक करावी अशी मागणी करीत होता. तेव्हा पोलीस त्यांचे काम करत आहेत. तुम्ही घरी जा, अशी विनंती आमदार राजेश क्षीरसागर, बजरंग दलाचे बंडा साळुंखे यांनी जमावाला केल्यानंतर रात्री दोनच्या सुमारास जमाव थोडा कमी झाला.

Web Title: Riots in Kolhapur; Tremendous stress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.