यूकी भांबरीची दुसऱ्या फेरीत धडक

  • First Published :12-January-2017 : 01:20:50

  • मेलबोर्न : यूकी भांबरी याने बुधवारी आॅस्ट्रेलियन ओपन टेनिसच्या पात्रता फेरीत सातवा मानांकित स्टीफन कोजलोवविरुद्ध सरळ सेटमध्ये विजय मिळवित दुसऱ्या फेरीत धडक दिली. डेव्हिस चषकातील त्याचा सहकारी साकेत मिनेनी याला मात्र, पराभवाचे तोंड पाहावे लागले.

    ५३४ व्या स्थानावर असलेला यूकी टेनिस एल्बोमुळे २०१६ मध्ये अर्धे सत्र खेळू शकला नव्हता. त्याने ११६ वे रँकिंग असलेल्या अमेरिकेच्या प्रतिस्पर्धी खेळाडूवर ६-१, ६-४ ने विजय साजरा केला. जर्मनीचा पीटर जोजावजिक (१८९ वे रँकिंग) याने मिनेनीवर ६-०, ६-२ ने विजय नोंदविला. यूकी केवळ बेसलाइनवरच बलाढ्य नव्हता, तर त्याने नेटवरदेखील चमकदार कामगिरी केली. चेन्नई ओपनमध्ये यूकीने आपलाच सहकारी रामकुमार रामनाथन याच्याविरुद्ध हेच तंत्र अवलंबले होते.

    यूकीने २८ पैकी २० नेट गुण जिंकले, शिवाय प्रतिस्पर्धी खेळाडूची सहा वेळा सर्व्हिस मोडित काढली. त्याने स्वत: दोनदा सर्व्हिस गमावली. यूकीचा पुढील फेरीत सर्बियाचा पेद्जा क्रस्टिन याच्याविरुद्ध सामना होणार आहे.

    यूकी म्हणाला, ‘माझ्यासाठी ही चांगली सुरुवात आहे. स्पर्धेतील वाटचाल परिस्थितीवर अवलंबून असेल. मी भक्कम खेळाच्या जोरावर यशस्वी ठरलो.’ (वृत्तसंस्था)महत्वाच्या आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लोकमत अॅप: Android | IOS