स्पेशल आॅलिम्पिकमध्ये जिंकले रजत आणि कांस्यपदक

By admin | Published: August 7, 2015 02:40 AM2015-08-07T02:40:52+5:302015-08-07T02:40:52+5:30

अश्विनी इतर मुलांसारखी सामान्य नव्हती. निसर्गाने तिच्या बौद्धिक विकासात कमतरता ठेवली होती.

Silver and bronze medals won at the Special Olympics | स्पेशल आॅलिम्पिकमध्ये जिंकले रजत आणि कांस्यपदक

स्पेशल आॅलिम्पिकमध्ये जिंकले रजत आणि कांस्यपदक

Next

अश्विनीची गगनभरारी
रिता हाडके  नागपूर
अश्विनी इतर मुलांसारखी सामान्य नव्हती. निसर्गाने तिच्या बौद्धिक विकासात कमतरता ठेवली होती. मात्र जिद्द आणि मेहनतीच्या भरवशावर अश्विनीने असामान्य कामगिरी करीत सर्वांना थक्क करणारी गगनभरारी घेतली. संत्रानगरीच्या दिव्यज्योती मतिमंद स्पेशल शाळेची १९ वर्षीय अश्विनी अटाळकर हीच ती स्पेशल मुलगी. अश्विनीने मतिमंदपणावर मात करीत अमेरिकेच्या लॉस एंजेलिस -कॅलिफोर्निया येथे नुकत्याच झालेल्या ‘स्पेशल आॅलिम्पिक्स वर्ल्ड समर गेम्स’मध्ये रजत आणि कांस्यपदक पटकावले. आॅलिम्पिकमधल्या रनिंग आणि गोळाफेक स्पर्धेत तिने ही कामगिरी केली. तिच्या गगनचुंबी यशाने अशक्य असे काहीच नाही, हेच दाखवून दिले.
मेहनतीने मिळाले यश
भारतीय संघटनांकडून स्पेशल आॅलिम्पिक वर्ल्ड समर गेम्ससाठी जेव्हा अश्विनीची निवड केली तेव्हाच विजय मिळविण्याचा संकल्प तिने केला. स्पर्धेसाठी दिवस-रात्र प्रॅक्टिस करून अश्विनीने हे असामान्य यश मिळविले. लॉस एंजेलिस-कॅलिफोर्निया येथे झालेल्या स्पेशल आॅलिम्पिक वर्ल्ड समर गेम्समध्ये अश्विनीने १०० मीटर दौड स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवून रजतपदक जिंकले, तर गोळाफेक स्पर्धेत तिसऱ्या स्थानी येऊन कांस्यपदक जिंकण्यात यशस्वी झाली. याशिवाय ४ बाय १०० मीटर रिले दौड स्पर्धेत चौथ्या स्थानी येणाऱ्या भारतीय दलाची ती सदस्य ठरली. स्पर्धेत जगातील विविध देशांच्या सात हजार स्पर्धकांनी वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये सहभाग घेतला होता. या यशामुळे अश्विनीच्या आनंदाला पारावार उरला नाही. लोकमतशी बोलताना तिच्या चेहऱ्यावरचा आनंद स्पष्ट दिसत होता. शाळेतील मैत्रिणींकडूनही तिचे अभिनंदन केले जात आहे.
देशाला दिले सुवर्णपदक
विशाल नाईक यांच्या मार्गदर्शनात सॉफ्ट बॉल स्पर्धेमध्ये भारतीय दलाने सुवर्णपदक जिंकले.
आई-वडिलांची चिंता मिटली
काहीच दिवसांपूर्वी अश्विनीचे वडील विनायक अटाळकर व आई आशा यांना तिच्या भविष्याची मोठी चिंता लागली होती. ती मतिमंद राहू नये म्हणून त्यांनी असंख्य प्रयत्न केले, मात्र त्यांना यश आले नाही. त्यांनी अश्विनीला गुमथी येथील दिव्यज्योती मतिमंद स्पेशल शाळेत दाखल केले आणि येथूनच तिच्या खेळाला नवी उभारी मिळाली.
पंतप्रधान घेणार अश्विनीची भेट
दिव्यज्योती मतिमंद स्पेशल शाळेचे कोच विशाल नाईक यांनी सर्व विजेत्यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केल्याचे सांगितले. तारीख निश्चित झाल्यानंतर अश्विनी त्यांच्या भेटीला दिल्लीला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: Silver and bronze medals won at the Special Olympics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.