इंडियन्स विजयाच्या ‘एक्स्प्रेस वे’वर

By admin | Published: September 15, 2014 02:19 AM2014-09-15T02:19:49+5:302014-09-15T02:19:49+5:30

पहिल्या लढतीत मानहानिकारक पराभव पत्करणाऱ्या मुंबई इंडियन्सने चॅम्पियन्स लीग टी-२०च्या दुसऱ्या क्वालिफायर लढतीत विजयाची ‘एक्स्प्रेस’ पकडली

Indian victory over 'Express Way' | इंडियन्स विजयाच्या ‘एक्स्प्रेस वे’वर

इंडियन्स विजयाच्या ‘एक्स्प्रेस वे’वर

Next

रायपूर : पहिल्या लढतीत मानहानिकारक पराभव पत्करणाऱ्या मुंबई इंडियन्सने चॅम्पियन्स लीग टी-२०च्या दुसऱ्या क्वालिफायर लढतीत विजयाची ‘एक्स्प्रेस’ पकडली. आज, रविवारी झालेल्या लढतीत इंडियन्सने मायकल हसी, लेंडल सिमन्स आणि कर्णधार किरॉन पोलार्ड यांच्या झंझावाताच्या बळावर साउथर्न एक्सपे्रसवर नऊ विकेट्स राखून दणदणीत विजय साजरा केला. विजयासाठी १६१ धावांचे लक्ष्य मुंबईने १६.२ षटकांत अवघ्या एक विकेटच्या मोबदल्यात पूर्ण केले. या विजयाबरोबर मुंबईने खात्यात चार गुणांची भर टाकली असली, तरी त्यांना अखेरच्या क्वालिफायर लढतीत नॉर्थन डिस्ट्रिकविरुद्ध विजयाच्या ‘एक्स्प्रेस’वरील प्रवास कायम राखण्याची गरज आहे.
मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून साउथर्न एक्स्प्रेसला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. अचूक मारा करून सुरुवातीला मुंबईच्या गोलंदाजांनी एक्स्प्रेसवर चांगलाच अंकुश ठेवला. नवव्या षटकापर्यंत एक्स्प्रेसला तीन बाद ५० धावांवर रोखून ठेवले होते. चौथ्या षटकात जसप्रीत बुमराह याने एक्स्प्रेसचा सलामीवीर कुसल परेराला अवघ्या आठ धावांवर माघारी धाडले. त्यापाठोपाठ कर्णधार किरॉन पोलार्डने यशोधा लंकाला बाद करून दुसरा धक्का दिला. अर्धशतकाच्या उंबरठ्यावर आल्यावर एक्स्पे्रसला २३ चेंडूंत तीन चौकारांसह एक षट्कार खेचून ३० धावा करणाऱ्या गुनाथिलंकाला जलाल सक्सेना याने बाद करून मोठा धक्का दिला. त्यानंतर प्रग्यान ओझाने जेहान मुबारकला त्रिफळाचीत केले. ११व्या षटकांत त्यांची अवस्था चार बाद ६५ धावा होती. त्यानंतर मात्र अ‍ॅन्गेला परेरा आणि सिक्कुगे प्रसन्ना या जोडीने संयमी खेळ करून संघाला सावरण्याचा प्रयत्न केला, परंतु दोघांमधील समन्वयाच्या अभावामुळे प्रसन्ना धावबाद झाला. त्यानंतर परेराने फरवीज महरूफ याच्यासह सहाव्या विकेटसाठी ५८ धावांची भागीदारी करून संघाला दीडशेसमीप पल्ला गाठून दिला. २८ चेंडूंत २८ धावा करणाऱ्या परेराला तडाखेबाज खेळ करून महरूफने उत्तम साथ दिली. त्याने २२ चेंडूंत तीन चौकार आणि दोन षट्कार खेचून ४१ धावा चोपल्या. लसिथ मलिंगाने परेराला बाद करून ही जोडी तोडली. तोपर्यंत एक्स्प्रेसने निर्धारित २० षटकांत सहा बाद १६१ धावा करून मुंबईसमोर तगडे आव्हान उभे केले होते.
या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेले मुंबईचे सलामीवीर लेंडल सिमन्स आणि मायकल हसी यांनी एक्स्प्रेसच्या गोलंदाजांना बदडवून काढले. या दोघांच्या तुफान फटकेबाजीचे उत्तर प्रतिस्पर्धी संघाला सापडलेच नाही. सिमन्स आणि हसी यांनी चौफेर फटकेबाजी केली. त्यांनी १२व्या षटकांत शतकी आकडा पार करून मुंबईचा विजय निश्चित केला. १५व्या षटकात पाथिरानाने हसीला बाद करून एक्स्प्रेसला दिलासा दिला खरा, परंतु त्यानंतर आलेल्या पोलार्डने वेळ न दवडता तुफान बॅटिंग केली. (वृत्तसंस्था)

Web Title: Indian victory over 'Express Way'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.