वर्धा, हिंगणघाट व पुलगावात अस्वच्छतेचा कळस

By admin | Published: November 1, 2014 02:05 AM2014-11-01T02:05:51+5:302014-11-01T02:05:51+5:30

मागील दोन महिन्यांपासून जिल्ह्यात कीटकजन्य आजाराने थैमान घातले आहे. याला सर्वस्वी ठिकठिकाणी असलेला अस्वच्छतेचा कळस कारणीभूत आहे.

The climax of uncleanness in Wardha, Hinganghat and Pulgaon | वर्धा, हिंगणघाट व पुलगावात अस्वच्छतेचा कळस

वर्धा, हिंगणघाट व पुलगावात अस्वच्छतेचा कळस

Next

वर्धा : मागील दोन महिन्यांपासून जिल्ह्यात कीटकजन्य आजाराने थैमान घातले आहे. याला सर्वस्वी ठिकठिकाणी असलेला अस्वच्छतेचा कळस कारणीभूत आहे. मात्र जनतेनीच घरात आणि परिसरात स्वच्छता पाळावी, असे आवाहन केले जात आहे. मात्र कीटकजन्य आजाराच्या रडारवर असलेले वर्धा, हिंगणघाट आणि देवळी तालुका प्रशासन स्वच्छता राबविण्यात कसूर करीत असल्याचे दिसून येत आहे. परिणामी नागरिकांना या आजाराचा सामना करावा लागत असल्याचे विदारक वास्तव पुढे आले आहे.
जिल्हा आरोग्य विभागाच्या लेखी सद्यस्थितीत या तिनही तालुक्यात कीटकजन्य आजाराचा फैलाव मोठ्या प्रमाणावर होत आहे. विशेष करुन वर्धा, हिंगणघाट आणि पुलगाव पालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर घाणीचे साम्राज्य असल्यामुळे डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणावर होत आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मात्र संबंधित पालिका प्रशासन याबाबत गांभिर्याने घेत नसल्याचे दिसून येते.
जिल्ह्यात डेंग्यूची लागण होताच जिल्हा आरोग्य विभागामार्फत ग्रामीण भागात मानवी साखळीच्या माध्यमातून जनतेला स्वच्छता राखण्याचा संदेश देण्यात आला. या अनुषंगाने बहुतांश नागरिकांमध्ये जागृतीही आली. अनेक घरात स्वच्छता राबिवण्यात आली. नुकताच दिवाळीचा सण झाल्यामुळे त्या पार्श्वभूमीवर जवळपास सर्वच घरात स्वच्छता करण्यात आली. मात्र शहर आणि ग्रामीण भागातील सार्वजनिक स्थळांचीच स्वच्छता करण्याची सवड ग्रामपंचायत व नगर पालिका प्रशासनाला मिळालेली नाही. असे नव्हे, तर जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष करण्यात आले, असे एकंदर चित्र आहे.
सर्वप्रथम देवळी तालुक्यातील पुलगाव शहरात डेंग्यूचा प्रकोप झाला. यानंतर पालिका प्रशासनाला जाग आली. यानंतर आता डेंग्यूचा शिरकाव हिंगणघाट आणि वर्धा शहरात होत आहे. मात्र अद्यापही या दोन्ही नगर प्रशासनात स्वच्छतेबाबत जनजागृती झाल्याचे शहरात ठिकठिकाणी बघायला मिळत असलेल्या उकिरड्यावरुन दिसून येते.
आॅक्टोबरमध्ये ८० पैकी ३९
नमुने पॉझिटिव्ह
जानेवारीपासून जिल्ह्यात १४७६ रुग्णांचे रक्त नमुने सेवाग्राम येथील प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. पैकी १९० नमुने डेंग्यू पॉझिटिव्ह आढळले. यामध्ये आॅक्टोबर महिन्यातील ८० रुग्णांच्या रक्त नमुन्यांचा समावेश होता. पैकी ३९ नमुने पॉझिटिव्ह आढळले आहे. यावरुन जिल्ह्यात डेंग्यूचा प्रकोप लक्षात घेण्यासारखा आहे. यातील बहुतांश रुग्ण हे वर्धा, देवळी आणि हिंगणघाट तालुक्यातील असल्याचे आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले. मात्र याबाबत तालुका व नगर पालिका प्रशासन उदासीनता बाळगून असल्याचे दिसून येत आहे.
आतापर्यंत चार जणांचा मृत्यू
आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाल्याची नोंद जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात झालेली आहे, यामध्ये चार मृत्यू डेंग्यू आजाराने तर एक मृत्यू इतर आजाराने झाल्याचेही विभागाचे म्हणणे आहे.(जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: The climax of uncleanness in Wardha, Hinganghat and Pulgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.