उमविचा भामटा कर्मचारी निलंबित

  • First Published :30-May-2014 : 20:53:51 Last Updated at: 31-May-2014 : 08:21:18

  • जळगाव : सुरत येथील माजी उपमहापौरांना गंडविल्याप्रकरणी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा कर्मचारी भैयासाहेब पाटील यास निलंबित करण्यात आले आहे.

    कुलगुरू प्रा. सुधीर मेश्राम मॅक्सिकोला रवाना होण्यापूर्वी त्याच्या निलंबनाचे आदेश कुलसचिव अशोक महाजन यांनी काढले होते. भैयासाहेब पाटील याने सुरतचे माजी उपमहापौर डॉ. रवींद्र पाटील यांच्या मुलाला एमबीबीएस शाखेला प्रवेश मिळवून देईल, असे खोटे आश्वासन दिले होते. डॉ. पाटील यांच्याकडून त्याने ७ लाख रुपये घेतले होते. प्रत्यक्षात प्रवेश घेताना डॉ. पाटील यांच्या मुलाला प्रवेश मिळू न शकल्यामुळे डॉ. पाटील यांनी भैयासाहेबाकडे पैसे परत द्यावे, अशी मागणी केली. मात्र, त्याने नकार दिल्याने डॉ.पाटील यांनी सुरत पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला होता. त्यानुसार न्यायालयाने सुरुवातीला त्याला दोन दिवसाची पोलीस कोठडी व त्यानंतर १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली होती.

    नियमानुसार कारवाई

    ४८ तासापेक्षा कारागृहात राहिलेल्या शासकीय कर्मचार्‍याला निलंबित करण्याचा नियम आहे. त्यातच कुलगुरू प्रा. मेश्राम यांनी भैयासाहेब पाटील याचे रेकॉर्ड ग्रंथपालांकडे मागितले होते. त्यानुसार कुलसचिव अशोक महाजन यांनी काढलेल्या आदेशात भैयासाहेब पाटील या कर्मचार्‍याला निलंबित केले आहे. पुढील आदेश येईपर्यंत त्यांचे निलंबन कायम राहील, असे आदेशात म्हटल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.महत्वाच्या आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लोकमत अॅप: Android | IOS