शिवनामाच्या गजरात कुणकेश्वरनगरी दुमदुमली

By admin | Published: February 24, 2017 11:37 PM2017-02-24T23:37:53+5:302017-02-24T23:37:53+5:30

यात्रोत्सवास प्रारंभ; आकर्षक रोषणाईने मंदिर परिसर उजळला; दर्शनासाठी रांगा

Kunkeshwar Nagari Thunderstorm in the Gwalior of Shivnama | शिवनामाच्या गजरात कुणकेश्वरनगरी दुमदुमली

शिवनामाच्या गजरात कुणकेश्वरनगरी दुमदुमली

Next


कुणकेश्वर : ‘हर हर महादेवऽऽ’ च्या जयघोषात श्री क्षेत्र कुणकेश्वरच्या यात्रेस शुक्रवारी पहाटे सुरुवात झाली. पारंपरिक धार्मिक विधी पार पडल्यानंतर शासकीय पूजा जिल्हाधिकारी उदय चौधरी व आमदार नीतेश राणे यांच्या हस्ते पार पडली.
श्रींच्या आरतीनंतर ताबडतोब भाविकांसाठी दर्शनरांगा खुल्या करण्यात आल्या. रात्री उशिरापासूनच भाविकांनी रांगेमध्ये गर्दी केली होती. मंदिर तसेच मंदिराच्या सभोवताली केलेली विद्युत रोषणाई, आकर्षक फुलांची मांडलेली आरास यामुळे संपूर्ण मंदिर व परिसर उजळून निघाला होता. कुणकेश्वरचे देदीप्यमान रूप पाहून शिवभक्त धन्यता मानत होते.
पूजेच्यावेळी प्रांताधिकारी नीता सावंत, अतिरिक्त उपजिल्हाधिकारी डॉ. शाम घोलप, देवगड तहसीलदार वनिता पाटील, गटविकास अधिकारी विजय चव्हाण, उपनगराध्यक्ष योगेश चांदोस्कर, कुणकेश्वर सरपंच नयना आचरेकर, एकनाथ तेली, सभापती रवींद्र जोगल, नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य सावी लोके व पंचायत समिती सदस्य निकिता कदम, देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष पुंडलिक नाणेरकर, आदी मान्यवर व ग्रामस्थ तसेच देवस्थान कमिटी सदस्य उपस्थित होते.
यावर्षी प्रथमच भाविकांना लवकरात लवकर श्रींच्या दर्शनाचा लाभ घेता यावा यासाठी सुलभ दर्शन रांगांची व्यवस्था देवस्थान ट्रस्टमार्फत करण्यात आली होती. कमीत कमी वेळेत दर्शन मिळत असल्यामुळे भाविकांमधून समाधान व्यक्त होत होते. त्याचबरोबर रांगेमधून दर्शन घेणाऱ्या भाविकांसाठी माध्यमिक विद्यामंदिर कुणकेश्वरचे शिक्षक व विद्यार्थीवृंद मोफत पाण्याची व्यवस्था करत होते. तसेच इतर दानशूर व्यक्ती व संस्थांच्या माध्यमातून सरबत, प्रसाद वाटप करण्यात येत होते. भक्तनिवास शेजारील इमारतीतील सुनियोजित दर्शन रांगांमुळे गर्दीवर नियंत्रण मिळविणे सहज शक्य होत होते. प्रशासनाकडूनही चोख बंदोबस्त करण्यात आला होता. वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी कुणकेश्वरकडे येणाऱ्या सर्व मार्गांवर ठिकठिकाणी पोलिस चौक्या उभारल्या होत्या. आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत आणि शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी सायंकाळी उशिरा दर्शन घेतले.
पोलिस अधीक्षकांचे जातीनिशी लक्ष
जिल्हा पोलिस अधीक्षक अमोघ गावकर, उपजिल्हा अधीक्षक प्रकाश गायकवाड व उपविभागीय पोलिस अधिकारी पद्मजा चव्हाण हे स्वत: उपस्थित राहून बंदोबस्तावर जातीने लक्ष देत होते. त्याचबरोबर कुणकेश्वर सेवा मंडळ मुंबई व स्थानिक स्वयंसेवक कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी विशेष खबरदारी घेताना दिसत होते. आरोग्य विभागाचे कर्मचारीही सतर्क राहून सेवा बजावताना दिसत होते. एलईडी स्क्रीनच्या माध्यमातून यात्रेचे प्रक्षेपण होत असल्याने भाविकांना शिवदर्शनाचा लाभ घेता येत होता. भाविकांची कुठलीही गैरसोय होऊ नये यासाठी देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष व इतर पदाधिकारी जातीने लक्ष देत आहेत. भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी दिशादर्शक फलक लावण्यात आले आहेत. देवगड तारामुंबरी-मिठमुंबरी पूल पादचाऱ्यांसाठी खुला झाल्यामुळे देवगड येथून येणाऱ्या भाविकांमधून समाधान व्यक्त होत होते.

Web Title: Kunkeshwar Nagari Thunderstorm in the Gwalior of Shivnama

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.