मालेगाव महापालिकेच्या आरोग्याधिकाऱ्यास नोटीस

By admin | Published: March 28, 2017 01:56 AM2017-03-28T01:56:51+5:302017-03-28T01:57:11+5:30

नाशिक : राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेचा दुसरा टप्पा येत्या २ एप्रिल रोजी होणार असून, त्यासाठी आरोग्य विभागाने तयारी सुरू केली आहे़

Notice to the Health Officer of Malegaon Municipal Corporation | मालेगाव महापालिकेच्या आरोग्याधिकाऱ्यास नोटीस

मालेगाव महापालिकेच्या आरोग्याधिकाऱ्यास नोटीस

Next

नाशिक : राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेचा दुसरा टप्पा येत्या २ एप्रिल रोजी होणार असून, त्यासाठी आरोग्य विभागाने तयारी सुरू केली आहे़ या मोहिमेसाठी सोमवारी (दि़ २७) जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीत होऊन प्रथम टप्प्याचा आढावा घेण्यात आला़ पल्स पोलिओ मोहिमेत निर्धारित उद्दिष्टापैकी कमी उद्दिष्ट्यपूर्ती केल्याप्रकरणी मालेगाव महापालिकेचे अधिकारी डॉ़ डांगे यांना जिल्हाधिकाऱ्यांनी नोटीस काढल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे़ विशेष म्हणजे या बैठकीला डांगे अनुपस्थित होते़
मालेगाव महापालिका क्षेत्रामध्ये गतवर्षी १ लाख २५ हजार बालकांचे लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. मात्र त्यापैकी १ लाख १६ हजार बालकांनाच  पोलिओ डोस पाजण्यात आले़ यामुळे सुमारे ९ हजार बालके या डोसपासून वंचित राहिली़ या मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी शंभर टक्के उद्दिष्ट देण्यात आल्याचे अपर जिल्हाधिकारी कान्हुराज बगाटे यांनी बैठकीत सांगितले़ दरम्यान, या बैठकीस डॉ़ डांगे हे अनुपस्थित राहिल्याने त्यांना नोटीस काढण्यात आली आहे़ रविवारी (दि़२) राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम होत असून, त्यासंबंधीचा आढावा घेण्यासाठी अपर जिल्हाधिकारी कान्हुराज बगाटे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली़
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीस जागतिक आरोग्य संघटनेचे प्रतिनिधी डॉ. कमलाकर लष्करे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे, जिल्हा आरोग्यधिकारी डॉ. सुशील वाकचौरे, नाशिक महापालिकेचे आरोग्याधिकारी डॉ. विजय डेकाटे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. जी. एम. होले, निवासी आरोग्याधिकारी डॉ. अनंत पवार व डॉ. खाडे आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)
५४ हजार बालकांना पाजणार डोस  जिल्हा रुग्णालयाच्या अखत्यारीतील ९ तालुक्यांमध्ये ५३ हजार ९६० बालकांना पल्स पोलिओचे डोस पाजले जाणार असून, त्यासाठी १९७ बूथ तर पुढील पाच दिवसांसाठी १२६ पथके तयार करण्यात आली आहेत. या पथकाकडून ८४ हजार घरातील बालकांना पोलिओचे डोस दिले जाणार आहेत़ जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून ४ लाख २४ हजार बालकांचे लसीकरण केले जाणार असून, त्यासाठी सुमारे ३ हजार २१७ बूथचे नियोजन करण्यात आले आहे.

Web Title: Notice to the Health Officer of Malegaon Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.