१७ शिक्षक निलंबित

  • First Published :11-November-2014 : 15:35:50

  • नांदेड : जिल्हा परिषदेतील बहुचर्चित बोगस बदली आदेश प्रकरणात दोन मुख्याध्यापकांसह १७ शिक्षकांना शिक्षणाधिकारी एकनाथ मडवी यांनी निलंबित केले. 
    जिल्हा परिषदेत बदल्यांमध्ये लाखो रूपयांची उलाढाल होते हे सर्वo्रुतच आहे. मात्र कोणतीही प्रशासकीय कार्यवाही पूर्ण न करता, संचिका न करता जिल्हा परिषदेतील काही मंडळींनी बदलींचे आदेश काढले. हे आदेश नुसते निघालेच नाही तर या आदेशाची अंमलबजावणीही झाली. ही बाब जेव्हा उघडकीस आली तेव्हा जिल्ह्यातील सर्व बदली आदेश, आपसी बदली, जिल्हा बदली याबाबतची कागदपत्रे मुख्य कार्यकारी अधिकारी काळे यांनी गटशिक्षणाधिकार्‍यांकडून मागवून घेतली. या आदेशाची चौकशी केल्यानंतर यातील बोगस आदेश पुढे आले. 
    उपशिक्षणाधिकारी एम. डी. पाटील यांच्या समितीने या आदेशांची छाननी करताना संबंधित शिक्षकांचे जबाब नोंदवून घेतले. त्यात बदली आदेश कसे मिळाले याचा उलगडा झाला आहे. जिल्हा परिषदेत काम करणार्‍या शिक्षकांकडून हे आदेश मिळाले असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर संबंधितांना निलंबित करण्याची कारवाई जिल्हा परिषदेने उशिरा का होईना केली आहे.
    त्यात लोहा तालुक्यातील दापशेड येथील जि. प. शाळेचे मुख्याध्यापक के. व्ही. जोशी, मुखेड तालुक्यातील सावरगाव पी. येथील एस. एस. मुजावर, लोहा तालुक्यातील कलंबर जि. प. शाळेतील रवींद्र बळीराम घोलप, माळाकोळी येथील ए. व्ही. जायभाये, देगलूर तालुक्यातील करडखेड येथील गणेश शंकरराव पांचाळ, बन्नाळी येथील वीणा भगवानराव पांडे, गोगोतांडा येथील एस. बी. जान्ते, नायगाव तालुक्यातील रातोळी येथील व्ही. के. जमजाळ, बिलोली तालुक्यातील हिप्परगामाळ येथील शेख मन्सूर खमरूसाब, टाकळी बु. येथील अरूण संभाजी डाकोरे, डोणगाव येथील व्ही. यु. भोगाजे, भोकर येथील छाया नारायण जोशी, मुदखेड तालुक्यातील नागेली येथील अनिता दामोदर बंडेवार, अर्धापूर तालुक्यातील खैरगाव येथील डी. एल. कदम आणि हिमायतनगर तालुक्यातील टेंभी जि. प. शाळेतील शिक्षक एस. एन. भिसे यांना बदली प्रकरणात कार्यालयीन पद्धतीचा अवलंब न करता परस्पर आदेश घेतल्याबद्दल निलंबित करण्यात आले आहे. 
    बोगस बदली प्रकरण उघडकीस आल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे यांनी राजकीय हस्तक्षेप झुगारत कारवाई सुरू केली आहे. ही कारवाई शेवटपर्यंत नेण्यासाठी काळे यांना अडथळ्यांची शर्यत पार पाडावी लागणार आहे. /(प्रतिनिधी) ■ जिल्हा परिषदेच्या अर्धापूर येथील पिंपळगाव येथील शाळेत कार्यरत असलेल्या डब्ल्यू. आर. गिते आणि रूस्तुम बी. पवार यांची जोडी जि. प. त या प्रकरणानंतर चांगलीच चर्चेत आली होती. गिते हे एका वरिष्ठ अधिकार्‍याचे वर्गमित्र तर पवार हे एका पदाधिकार्‍याचे स्वीय सहायक. या दोघांनाही या प्रकरणात निलंबित करण्यात आले आहे. त्यात पवार यांनी तब्बल ११ शिक्षकांचे बदली आदेश कार्यालयीन पद्धतीचा अवलंब न करता काढले. त्यात गणेश पांचाळ, वीणा पांडे, एस. बी. जान्ते, डी. एल. कदम, व्ही. यु. भोगाजे, शेख मन्सूर, खमरूसाब, के. व्ही. जोश्ी, एस. एस. भिसे, छाया जोशी, अनिता बंडेवार आणि अरूण डाकोरे यांचा समावेश आहे. तर गिते यांनी रवींद्र घोलप, ए. व्ही. जायभाये आणि के. व्ही. जोशी यांच्या बदलीचा समावेश आहे.
महत्वाच्या आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लोकमत अॅप: Android | IOS
vastushastra
aadhyatma