सातवांनाही भावली गढाळ्याची शाळा

 • First Published :16-November-2016 : 18:03:11

 • हिंगोली : औंढा नागनाथ तालुक्यातील गढाळा शाळेला खा.राजीव सातव यांनी भेट दिली असता शाळेतील गुणवत्ता पाहून तेही अवाक् झाले. वर्षातील संपूर्ण ३६५ दिवसही भरणाऱ्या या शाळेत फाडफाड इंग्रजी बोलणारे, संगणक सहज हाताळणारे व सर्वच विषयांमध्ये गुणवत्ताधारक विद्यार्थी पाहून खासदारांनी ही शाळा मराठवाड्यात मॉडेल बनविण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्धार केला.

  गढाळा येथील शाळेला ग्रामस्थांच्या मदतीचा मोठा हातभार आहे. मुलांच्या शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या शैक्षणिक साधनांसाठी लोकसहभाग उभारून आपल्या मुलांचे भवितव्य घडविण्याचा त्यांनी ध्यास घेतला आहे. शाळेला शिक्षकही त्याच परंपरेतील लाभल्याने ही शाळा जि.प. शाळा असूनही खाजगी शाळांना लाजवेल, अशा स्थितीत आहे. गुणवत्तेच्या शिखरावर जाण्यासाठी मागील काही वर्षांची मेहनत त्यामागे आहे. या शाळेची महती ऐकल्यानंतर खा.राजीव सातव यांनीही तेथे भेट दिली. प्रत्यक्ष वर्गावर जावून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. फाडफाड इंग्रजी बोलणारे, संगणक सहज हाताळणारे विद्यार्थी इतरही बाबतीत मागे नव्हते. केवळ भेट देण्यासाठी गेलेले खा.सातव तेथे तब्बल दोन तास रमले. त्यानंतर त्यांनी ग्रामस्थांचीही बैठक घेतली. तर या शाळेला एक वर्गखोली व वॉटर फिल्टर खासदार निधीतून देण्याचा निर्धार व्यक्त केला. तर यानंतरही या शाळेसाठी मदत करण्याची तयारी दाखविली. ग्रामस्थ व शिक्षकांच्या परिश्रमाचेही त्यांनी कौतुक केले. ही शाळा अशीच प्रगतीच्या शिखरावर राहिली तर शहरी विद्यार्थी येथे शिकायला येतील. ही शाळा मराठवाड्यात अग्रेसर राहण्यासाठी कधीही मदतीचा हात पुढेच राहील, अशी ग्वाहीही दिली.

  यावेळी त्यांच्यासमवेत बापूराव घोंगडे, संतोष खंदारे, शेषराव थोरात, भागोराव थोरात, मुख्याध्यपक उत्तम वानखेडे, शिक्षक सिद्धेश्वर रणखांब व ग्रामस्थ उपस्थित होते.

  २00८ पासून उपक्रम

  ही शाळा २00८ पासून एकप्रकारे निवासी आहे. सध्या १ ते ५ वीपर्यंत ८१ विद्यार्थी आहेत. येथील मुले रात्री शाळेतच झोपतात. मुलींना घरी पाठविले जाते. शाळेत सात संगणक, पूर्णपणे रंगरंगोटी, अवांतर ज्ञानासाठी पुस्तके अशी गुरुकुलाप्रमाणे सोय आहे.

  मुलांना फायदा

  या शाळेतील मुलांना सकाळी ४.३0 वाजेपासून अभ्यास, व्यायाम आदींसाठी उठविले जाते. तर चौथी स्कॉलरशिप, नवोदयची तयारीही करून घेतली जाते. मागील वर्षी नवोदयला तीन, चिखलदरा इंग्रजी शाळेत सात मुलांना प्रवेश मिळाला. क्रीडाप्रबोधिनीलाही संधी मिळाली. स्कॉलरशिपही मिळाले.

  व्यसनापासून दूर

  ही मुले जास्तीत-जास्त वेळ शाळेतच राहतात. त्यामुळे व्यसनाधिनतेपासून दूर आहेत. मुख्याध्यापक वानखेडे व रणखांब या दोघांवरच शाळेचा डोलारा आहे. दोघांपैकी एकजण मुक्कामी असतो. ते नसतील तर ग्रामस्थांपैकी कोणावर तरी जबाबदारी असते. मात्र शाळा कधी बंद पडू दिली नाही. ३६५ दिवस शाळा सुरू राहतेच.महत्वाच्या आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लोकमत अॅप: Android | IOS