आशा वर्कर्स करणार शौचालयांचे सर्र्वेेक्षण

  • First Published :11-January-2017 : 00:10:38 Last Updated at: 11-January-2017 : 00:13:57

  • गजेंद्र देशमुख  जालना

    स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शहर हागणदारीमुक्त करण्यासाठी नगर पालिका प्रशासन कामाला लागले आहे. ज्या नागरिकांनी शौचालय बांधले आहेत त्याचे सर्वेक्षण आता आशा वर्कर्स मार्फत होणार आहे. या कामासाठी बिल कलेक्टरचीही मदत घेण्यात येणार आहे. त्यामुळे नगर पालिकेला शौचालय कामाचा परिपूर्ण अहवाल प्राप्त होणार आहे.

    स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शहरात तेरा हजार शौचालये बांधण्यात येणार आहेत. त्यापैकी अडीच हजार शौचालयांची कामे पूर्ण झाली आहेत. दुसऱ्या टप्प्यातील सुमारे चार हजार दोनशे लाभार्थींना पहिल्या टप्प्याचे सहा हजार प्रमाणे अडीच कोटी रूपयांचे संबंधितांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांनी दिली.

    फेब्रुवारी महिन्यात सेफ्टी टँक तर मार्च महिन्यात पूर्ण शौचालयाचे काम पूर्ण झाल्यावर दुसरा हप्ता देण्यात येणार आहे. प्रत्येक लाभार्थीस १७ हजार रूपयांचे अनुदान मिळणार आहे. दुसऱ्या टप्प्याचे अनुदान वाटप झाल्याने हे काम गतीने पूर्ण करणार असल्याचे खांडेकर यांनी स्पष्ट केले. मंगळवारी आशा वर्कर्सची बैठक मुख्याधिकाऱ्यांनी घेतली. त्यात शौचालय कामांचे सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. नगर पालिकेंतर्गत ५३ आशा वर्कर्स आहेत. ज्या लाभार्थींने अनुदान घेतले आहे त्याची संपूर्ण पाहणी करून माहिती पालिका अधिकाऱ्यांना आशा वर्कर्स देतील. त्यासोबतच जनजागृती करण्याचे कामही होणार आहे. काही सेवाभावी संस्थांचीही याकामी मदत घेण्यात येणार आहे. ३१ मार्चपर्यंत शहर हागणदारी मुक्त होईल असा विश्वास खांडेकर यांनी व्यक्त केला.

महत्वाच्या आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लोकमत अॅप: Android | IOS
vastushastra
aadhyatma