जालना बसस्थानकाचे रूपडे पालटणार..!

  • First Published :11-January-2017 : 00:08:50 Last Updated at: 11-January-2017 : 00:13:29

  • हरी मोकाशे जालना

    वाऱ्याच्या झुळुकानेच फिरणारे बहुतांशी पंखे, रात्रीच्यावेळी काजव्याप्रमाणे चमकणारे काही विद्युत दिवे आणि बसण्यासाठी मोडतोड झालेले आसन. अशी जालन्याच्या बसस्थानकाची अवस्था आहे. परंतु, प्रवाशांना होणारा हा त्रास आता लवकरच दूर होणार आहे. एक कोटीच्या खर्चातून स्थानकाचा चेहरा- मोहराच बदलला जाणार आहे.

    ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ असे ध्येय उराशी बाळगून असलेल्या एसटी महामंडळाच्या शहरातील बसस्थानकास सध्या विविध समस्यांनी घेरले आहे. स्थानकात येणाऱ्या बसचे स्वागत खड्ड्यांनी होते. काही वर्षांपूर्वी स्थानकाचे डांबरीकरण करण्यात आले असले तरी ते पूर्णपणे करण्यात न आल्याने अर्धवट झालेले डांबरीकरणही काही प्रमाणात उखडले आहे. तसेच प्रवाशांना बसण्यासाठी असलेल्या सिमेंट क्राँकिटच्या आसनाची दैना उडाली आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत उन्हातून आलेल्या प्रवाशांना थंड हवा मिळावी म्हणून पंखे बसविण्यात आले असले तरी त्यातील बहुतांशी पंखे आजघडीला बंद आहेत. त्याचबरोबर स्थानकातील काही विद्युत दिवे बंद आहेत. परिणामी, रात्रीच्यावेळी आलेल्या प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. तसेच ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग पडलेले आहेत. जालना आगारात ८० बसेस असून स्थानकातून दररोज विविध आगारांच्या ६७५ बसेस धावतात. त्यामुळे प्रवाशांची वर्दळ असते. स्थानकात मुलभूत सुविधा नसल्याने प्रवाशांना समस्यांना सामोरे जावे लागते. दरम्यान, शासनाने जालना स्थानकाच्या विकासासाठी १ कोटी रुपये उपलब्ध करुन दिल्याने आठवडाभरात स्थानकाच्या नूतनीकरणास सुरुवात होणार आहे.महत्वाच्या आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लोकमत अॅप: Android | IOS