११ गावांनी केली टॅँकरची मागणी

  • First Published :08-January-2017 : 00:11:10 Last Updated at: 08-January-2017 : 00:13:42

  • जाफराबाद : तालुक्यातील तब्बल अकरा गावच्या ग्राम पंचायतींनी जानेवारी महिन्यापासून गावास टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरु करण्याची मागणी प्रशासनाकडे केली केल्याची माहिती पंचायत समितीच्या टंचाई आढावा बैठकीत देण्यात आली.

    पंचायत समिती ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या वतीने पाणीटंचाई कृती आराखडा व निवारणासंदर्भात येथे नुकतीच आढावा बैठक पार पडली. यावेळी तालुक्यातील ७३ ग्रामपंचायतीमधील पिण्याच्या पाणी समस्येबाबत चर्चा करण्यात आली. बैठकीस सभापती रामताई चौतमोल, कृषी सभापती लिलाबाई लोखंडे, तहसीलदार अनंत पाटील, गटविकास अधिकारी डॉ. अरूण चौलवार, तालुका कृषी अधिकारी सूर्यकांत सांगावे, पाणी पुरवठा अभियंता अंभोरे, झरे, पं. स. सदस्या लिलाबाई लहाने, विभाग प्रमुख, सरपंच, ग्रामसेवक उपस्थित होते. यावेळी वाणखेडा, जानेफळ पंडित, सोनिगरी, भराडखेडा, बेलोरा, येवता, चापणेर, धोंडखेडा, कुंभारी, गोंधनखेडा, चिंचखेडा या अकरा गावांचा जानेवारी ते मार्च या तिमाही अंदाजपत्रकात समावेश करावा तसेच पुढील एप्रिल ते जून या कालावधीत वडाळा, भोरखेडा, पिंपळगाव कड, सावरखेडा, भातोडी, तोंडोळी, गाढेगव्हान, डाहकेवाडी या आठ गावांत संभाव्य टंचाई निवारणार्थ उपाययोजना करण्याची मागणीही सरपंच, ग्रामसेवकांनी केली. टँकरद्वारे पाणीपुरवठ्यासाठी काही खाजगी विहिरींचे अधिग्रहण करावे लागणार असल्याची माहिती यावेळी पुढे आली. मागील वर्षात तालुक्यातील १०१ गावांपैकी जवळपास ९५ गावांत भीषण पाणीटंचाई निर्माण झाली होती. यंदा पाणी परिस्थिती समाधानकारक असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)महत्वाच्या आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लोकमत अॅप: Android | IOS