विज्ञान जत्रेत शेकडो विद्यार्थ्यांचा सहभाग

  • First Published :08-January-2017 : 00:05:38 Last Updated at: 08-January-2017 : 00:08:11

  • अणदूर : तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथे हॅलो मेडिकल फाऊंडेशन, विज्ञान वाहिनी, दुर्गादेवी ट्रस्ट, पुणे संचलित ग्रामीण विज्ञान केंद्र, अणदूरच्या वतीने ६ व ७ जानेवारीला दोन दिवसीय विज्ञान जत्रेचे आयोजन करण्यात आले होते. या जत्रेत शेकडो विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.

    जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी धिकारी आनंद रायते यांच्या हस्ते जत्रेचे शुक्रवारी उद्घाटन झाले असता, शनिवारी बक्षीस वितरणाने समारोप करण्यात आला. दरम्यान, शनिवारी सकाळी शिवारफेरीच्या माध्यमातून पक्षी व निसर्ग निरीक्षणासाठी पळस निलेगाव प्रकल्प बाभळगाव येथे विद्यार्थ्यांनी पक्षी व निसर्ग पाहण्याचा आनंद लुटला. प्रश्नमंजुषेमध्ये ५वी ते ७वी प्राथमिक गटामध्ये प्रथम- स्नेहा चंद्रवर्धन खंदाडे (लातूर), मोहिनी बळीराम कसबे (बाभळगाव), तर द्वितीय पार्थ व्यंकट कदम (अणदूर), श्रीराम विठ्ठल जाधव (शिरगापूर) यांनी मिळविला. माध्यमिक गटामध्ये समृद्धी भारतराव जगताप (नांदुरी), विवेक नागेश बऱ्हाणपूरकर (चपळगाव), आकाश दत्तात्रय गायकवाड (किलज), कार्तिक दरबाजी सरडे (नळदुर्ग), अजिंक्य दीपक चव्हाण (सलगरा मड्डी), प्रणिता प्रकाश सुरवसे यांना वरील दोन गटात प्रथम तर श्रावण उटगे (लातूर), अभिषेक भस्मे (अणदूर), ऐश्वर्या चाबुकस्वार (चिवरी) यांनी द्वितीय क्रमांक मिळविला.

    यानंतर माजी पोलीस आयुक्त सुरेश कंदले, महादेव नरे, डॉ. अशोक कदम, मनोहर घोडके यांच्या हस्ते विज्ञान साहित्य प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. यावेळी विविध प्रकारच्या ५० प्रयोगांचे सादरीकरण करण्यात आले. यात प्राथमिक गटामध्ये प्रथम- मॅजिकबोट- फिनिक्स इंग्लिश स्कूल, अणदूर, द्वितीय- जि.प.प्रा. शाळा आरळी (बु), तर तृतीय जि.प. प्रा. शाळा नळदुर्ग यांनी पटकावले आहेत. माध्यमिक गटामध्ये प्रथम- जवाहर विद्यालय अणदूर, द्वितीय- राजीव गांधी विद्यालय हंगरगा (नळ), तर तृतीय- भैरवनाथ विद्यालय चिकुंद्रा यांनी पटकावला आहे.

    दरम्यान, विज्ञान जत्रेतील यशस्वी स्पर्धकांना जि.प.चे उपाध्यक्ष सुधाकर गुंड यांच्या हस्ते बक्षीस वाटप केले. यावेळी सुरेश कंदले, डॉ. शुभांगी अहंकारी, डॉ. अशोक कदम, महादेव नरे, सोमानी क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आले. विज्ञान जत्रेचे आयोजन डॉ. शशिकांत अहंकारी यांनी केले होते.

    यशस्वीतेसाठी दुर्गादेवी ट्रस्ट, पुणे येथील विश्वस्त कुलदीप जोशी, प्रा. दीपक बोरनाळे, भगीरथ कुलकर्णी आदींनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन बसवराज नरे यांनी केले. आभार डॉ. शुभांगी अहंकारी यांनी मानले. विज्ञान जत्रेसाठी प्रसन्न कंदले, बालाजी जाधव, प्रबोध कांबळे, जावेद शेख, गुलाब जाधव, संध्या रणखांब, भारती मिसाळ, नागिनी सुरवसे, इम्तियाज खान, अ‍ॅनिमेटर, भारत वैद्य आदींनी परिश्रम घेतले. विज्ञान जत्रेमध्ये शेकडो विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविल्याचे आयोजकांनी सांगितले. (वार्ताहर)महत्वाच्या आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लोकमत अॅप: Android | IOS