नजर बदलत जाते तेव्हा..

 • First Published :15-June-2017 : 18:01:58

 • मीनाज लाटकर
   
  बी.कॉम. केलं, अकाउंटंटची नोकरीही लागली. पण त्यात मन रमेना. ठरवलं, पुण्यात जायचं, पत्रकार व्हायचं. आणि कोल्हापूर सोडून पुण्याकडे निघाले. त्यानंतर..
   
  मी कोल्हापुरातून माझं बी.कॉम. पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. लगेचच अकाउंटंट म्हणून जॉब करू लागले. पण त्या नोकरीत मन रमत नव्हतं. मी कोल्हापुरात अनेक सामाजिक उपक्रम, व्याख्यानं, चर्चासत्र अशा कार्यक्र मांना जायचे. येणारे वक्ते, विचारवंत हे पुण्यातूनच आलेले असायचे. त्यामुळे पुण्यातल्या सामाजिक वातावरणाचं आकर्षण व ओढ होती. अशा कार्यक्र मातूनच सामाजिक प्रश्नांची जाणीव होऊ लागली. मी मुस्लीम स्त्रियांच्या प्रश्नांवर लिहू लागले. त्यातूनच मी पत्रकार होण्याचे ठरवलं तेही पुण्यातूनच.
  खरं तर पुण्याला मी पहिल्यांदा तीन वर्षांपूर्वी २८ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर या काळात फुले वाड्यावर एक व्याख्यानमाला घेतली जाते त्यासाठी आले होते. पहिल्यांदा फुले वाडा पाहिला त्यावेळी एकच विचार आला जोतिबा-सावित्री माईने मुलींची शाळा सुरू केली पण त्या काळात शाळेत शिकायला येणाऱ्या मुली त्यांना मानलं पाहिजे. इतका विरोध असूनही कशा येत असतील? तेव्हा मलाही वाटलं लोक काय म्हणतील हा विचार सोडून द्यायचा आणि शिक्षण घ्यायचं.
  वयाच्या २५ व्या वर्षानंतर मी पत्रकारितेचं शिक्षण घेण्याचे ठरवलं. पण निमशहरी मध्यमवर्गीय वातावरणात हा निर्णय पचणं थोडं अवघड होतं.
  या वयात मुलींच्या लग्नाशिवाय दुसरा कोणताच निर्णय महत्त्वाचा असू शकत नाही असं मुलीच्या आईवडिलांना, नातेवाइकांना वाटत असतं. पण शेवटी मी माझ्या घरच्यांना समजवण्यात यशस्वी झाले. पुण्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (रानडे इन्स्टिट्यूट) मध्ये प्रवेश घेतला. 
  माझं आयुष्यातलं हे पहिलं स्थलांतर. ते मला दुनियादारी शिकवून गेलं. कोल्हापुरातून पुण्यात येऊन एक वर्ष झालं. शहरी मानसिकता काय असते याचे अनुभव सातत्याने आले. आजच्या काळात तुमची भाषा, तुमचे कपडे, तुमचं इंग्लिश बोलणं यावरून तुमची पारख केली जाते. तुम्ही किती मॉडर्न आहात, हुशार आहात हे ठरवलं जातं. हे कुणी जाणूनबुजून करत असतं असं नाही, तर शहरी मानसिकतेतून ते जन्माला आलेलं असतं.
  पुण्यात आल्यावर सर्वात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे राहण्याची सोय. उशिरा प्रवेश झाल्यामुळं हॉस्टेलमध्ये जागाच शिल्लक नव्हत्या. तात्पुरती सोय म्हणून काश्मीरच्या मुलींसोबत राहण्याची संधी मिळाली. हा अनुभव तर अनेक गैरसमज दूर करून मनात नवीन प्रश्न उपस्थित करणारा होता. काश्मीरबद्दल, तिथल्या लोकांबद्दल वेगळेच समज होते. पण प्रत्यक्षात काश्मिरी मुलींसोबत राहिल्यामुळे त्यांची आपुलकी, प्रेमळ वागणुकीमुळे काश्मीरबद्दल मनात वेगळीच आस्था निर्माण झालीे. 
  पुढे एका हॉस्टेलमध्ये प्रवेश मिळाला. हॉस्टेलमध्ये राहण्याचा तर अनुभव खूपच भन्नाट होता. प्रत्येक मुलगी घरी किती वेगळं राहत असते आणि हॉस्टेलमध्ये किती वेगळं राहते याचा अनुभव आला. माझ्या हॉस्टेलमध्ये तशा ग्रामीण भागातील मुलीच राहतात. पण शहरात आल्यावर आपला पेहराव बदलणं, भाषा बदलणं, मेकअप अशा भौतिक गोष्टी स्वीकारून कुठंतरी बाह्य रूपाने शहरी व्यवस्थेचा भाग होण्याचा सातत्यानंं प्रयत्न करताना दिसतात. पण मुळात आपण आधुनिक बनण्यासाठी आपलं राहणीमान महत्त्वाचं की विचार हीच गोष्ट अनेकांच्या लक्षातही येत नाही.
  मात्र पुण्यासारख्या शहरात खूप मोकळं वाटतंय मला. इथलं सांस्कृतिक, सामाजिक वातावरण खूप काही शिकवून गेलं. मुलां-मुलींचं मोकळेपणानं जगणं हे स्वीकारलंय या शहरानं. ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. इथं मुली सहज जाऊन चहा टपरीवर चहा पिऊ शकतात, खाऊपिऊ शकतात. आधी पुणेरी पाट्यांबद्दल फक्त व्हॉट्सअ‍ॅपवर विनोद ऐकत आले होते. पण प्रत्यक्ष पाहिल्यावर विनोदसुद्धा खरे असतात याचा अनुभव आला. एफसी रोडबद्दल तर खूप ऐकलं होतं. पण प्रत्यक्ष तो झगमगाट पाहून आपण कोणत्या जगात राहतो असं वाटतं. पण याच रोडच्या पलीकडे असणारं माझ्या कॉलेजचं वैचारिक वातावरण हेच मला या शहराचं वैशिष्ट्य वाटतं. 
  गावाकडच्या लोकांना व्यवहार शिकवतात ही शहर. आपण कधी इतके व्यवहारी झालो हे कळतदेखील नाही. आपलं घर, जेवण, पैसे या सर्वांची नव्याने किंमत कळू लागते. शिक्षणाची तर हजारो दारे इथं उघडी आहेत. अनेक वेगवेगळे कोर्स इथं आल्यावर कळले. इतक्या संधी उपलब्ध आहेत याची उशिरा माहिती झाली त्यामुळे जरा वाईटही वाटतं. या वातावरणानं माणूस म्हणून जगण्याचा व्यापक दृष्टिकोन दिला आहे. इथं रोज भेटणारे लोक, व्याख्यानं, नाटक, माहितीपट, कार्यक्र म अशी वैचारिक मेजवानी मला पुण्याशिवाय दुसरीकडे कुठंच मिळाली नसती. पत्रकारितेचं शिक्षण तर माझं माणूसपण समृद्ध करणारे ठरलं. घरदार सोडून मोठ्या शहरात आल्यापासून खूप वेगळी स्वप्नं बघू लागले. 
  आताच माझ्या स्थलांतराला एक वर्ष पूर्ण झालं. गावाकडच्या स्किल्स घेऊन पुण्याला आपलंसं करून घेण्याचा प्रयत्न अजूनही सुरू आहे.
   


महत्वाच्या आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लोकमत अॅप: Android | IOS