कळतच नाही, मी नक्की काय करू?

 • First Published :15-June-2017 : 17:59:14

 • प्राची पाठक
   
  ‘ध्येय ठरवा, ध्येय ठरवा’ हा धोशा मागे लागला की समजावं आता आपल्याकडून रॅट रेसमध्ये धावत सुटणं अपेक्षित आहे. अर्थात कुणी कळकळीनं सांगतं हे आपल्याला. कुणाकुणाला आपल्याकडून खूप अपेक्षाही असतात. 
  पण तरीही परफॉर्मन्स, एक्सलन्स, अचिव्हमेण्ट, परफेक्शन असे मोठे मोठे शब्द आपल्याला सुनावले जाऊ शकतात. एक ध्येय ठरव आणि त्यापाठी धाव, धावत सूट. यशाच्या शिखरावरच थेट जाऊन पोहोच. घोड्यासारखे इकडे तिकडे न बघता धाव. लगेच सगळे यश पदरात टाकून आण. आणलेले यश इतरांच्या समोर भिरकवा आणि त्यांचे डोळे तुमच्या यशाने दिपले की खुश व्हा. हे सारं म्हणजे आपलं यश का?
  आपल्याला ‘आपलं’ वाटणारं ध्येय वेगळं आणि इतरांनी आपल्यावर लादलेलं, आपल्यासाठी ठरवलेलं ध्येय यात फरक असतो हे कळायला हवं. आणि त्यात फरक करायला म्हणूनच आपण शिकायला हवं. आपल्याला नक्की काय हवंय ते समजून घ्यायला हवं.
  अनेकजण याच टप्प्यावर अडकतात, मला काय नक्की करायचंय हेच कळत नाही म्हणतात. पण ते कळायला हवं, शोधायला हवं.
   
  ध्येय? ते ठरवायचं कसं?
  सकाळी झोपेतून उठलात. एकदम फ्रेश वाटते आहे. नवा दिवस, नवी उमेद. आपण खूप ताजेतवाने झालो आहोत अशी कल्पना करा. हातात वेळ आहे, थकवा नाही, डोकं शांत आहे आणि करण्यासारखं काहीच नाही. आज उठून कुठं जावं, घरात काही काम काढावं का, नेमकं काय काम करावं, का करावं, कसं करावं, कोणतं काम महत्त्वाचं आहे लक्षात येत नाही. मग आपण उठतो आणि मित्रांना, मैत्रिणींना भेटायला जातो. नेट आॅन करतो. सोशल मीडियावर कोणाचं काय सुरू आहे, शोधत राहतो. तरीही वेळ उरतोच. कंटाळा येतो आयुष्याचा. 
  कल्पना करा, असा वेळ किती भयानक अंगावर येतो. कॉलेजची सुटी, नोकरी शोधण्यामधला वेळ, दोन जॉब्स बदलताना मध्ये मिळणारी गॅप. हातात वेळ असून केलं काहीच नाही, होत काहीच नाही असा अनुभव आलाय ना? सगळी सुटी संपून गेली, कशालाच वेळ झाला नाही, वेळ सर्रकन निघून गेला असा अनुभव नेहमीचाच असतो. आपल्या सर्वांच्याच आयुष्यात.
  मग अशावेळी काय करायचं?
  त्यावेळी स्वत:ला एकच सांगायचं..
  आपण एकटे नाही. अनेकांचं असं होतं. प्रत्येक जण आपापल्या परीने काहीतरी मार्ग काढतो त्यावर मात करायचा. एक दिशा ठरवतो. त्या दिशेनं प्रवास करणं आव्हान म्हणून स्वीकारतो. काही टप्पे आखतो. मेहनत घेऊन एकेक टप्पा पार करत जातो. आपल्याला तो मार्ग अजून सापडायचा असतो इतकंच. पण तो सापडणारच नाही, असं नाही. असं नसतं. कित्येकदा आपण असा ठरावीक विचार फुलवत नाही. आपल्या मनात त्यावर चर्चा घडत नाही. आला दिवस, गेला दिवस असंच आपलं होतं.
  कसं ठरवायचं मग आपलं ध्येय? एकदम परफेक्ट आणि आपल्याला साजेसे असे फायनल ध्येय काय हे कसं कळणार आपल्याला? अगदी ‘लॉक किया जाये’ असं ध्येय? की तेही चाचपडत शोधावं लागणार? बदलावं लागणार?
  सगळ्यात आधी एक कागद पेन घेऊन बसायचं आणि मनात येईल ते त्यावर लिहून काढायचं. नुस्ते की वडर््स लिहिले तरी चालतील. हे काही कुणाला तपासायला द्यायचं नाही की दाखवायचं नाही. त्यामुळे चुका झाल्या तरी कोणी ओरडणार नाहीये. मुळात, मनातलं उतरवताना चूक/बरोबर असं काही नसतं असं स्वत:ला सांगूनच टाकायचं. ही काही निबंध स्पर्धा नाही की कसला रिपोर्ट लिहायचा नाही. पुढील वर्षभरात आपलं आयुष्य कसं असावं, काय काय असावं त्यात असं आपल्याला वाटतं, कोणत्या क्षेत्रात काम करायचं आहे, का, कसं, आपण सध्या त्यात कुठे आहोत? जे मनात येईल ते आणि जसं येईल ते लिहून काढायचं. आपण काय लिहिलं आहे, ते नीट बघायचं. विचार करायचा.
  अशी सवय लावून घ्या. 
  तुम्हाला नक्की काय हवं, हे शोधण्याचा, सापडण्याचा रस्ता तरी खुला होईल.. सापडत जाईल आपलंच आपल्याला काहीतरी!
   
   
  चांदसितारे टाइप्स नको प्रॅक्टिकल काय ते बोला!
   
  आपण आपल्या आयुष्याचं किंवा आयुष्याच्या एका टप्प्याचं ध्येय काय असं लिहिणार आहोत तर ते लिहितानाही थोडं भान ठेवायला हवं..
  जे लिहितोय ते आपल्याबद्दल आहे की जग सुधारायच्या बाता आहेत, ते बघायचं.
  दुसऱ्या कोणाला मी ठीक करूनच राहीन असा काही सूर आहे का आपला तेही बघायचं. 
  आपण जे ध्येय म्हणून लिहित आहोत, ते ‘माझ्यासाठी/तुझ्यासाठी तारे तोडून आणेन’ या प्रकारचं नाही ना, तेही बघायचं. आपला आवाका तपासायची सवय करायची. हे करताना ‘मला हे जमणार नाही’ हे तुणतुणंदेखील नको आणि ताटात एकदम खूप पदार्थ घेऊन खाणं असंही नको.
  ही कसरत जमली पाहिजे. सरावानं ती येते. 
  या टप्प्यात सुरुवातीला जे जे ध्येय ‘जग जिंकेन’ प्रकारचे असेल, स्वत:बद्दल थेट नसेल, एकदम खूप मोठं स्वप्नं स्वरूपाचं असेल ते बाद करायचं. आपली ध्येयाची लिस्ट याच टप्प्यावर सजग राहून एडिट करायची. स्वत:बद्दल असलेलं, ‘सध्यापुरतं’, आपल्या आवाक्यात आहे असं वाटणारं, वास्तवात साध्य करता येऊ शकणारं ध्येय आपल्यासाठी निवडायचं. तारे तोडून आणेन, पृथ्वीवर फुलांचा गालिचा अंथरेन वगैरे कल्पनारम्य बडबड नको. जरा प्रॅक्टिकल अंदाज घेतलेला बरा..
   
   
  नो  नकारघंटा
  अजून एक खबरदारी घ्यायची. हे करणार नाही, ते करणार नाही, अमुक खोडून काढेन, तमुक कमी करेन असं नकारात्मक लिहित सुटायचं नाही. मी अमुक करेन, तमुक बदलून पाहीन अशा स्वयंसूचना द्यायच्या. मनाला ‘नको, नाही, नो, नो, नेव्हरच्या’ नकारघंटेत गुंतवायचं नाही. 
  मी हे करेन, याऐवजी ते करून पाहीन असं ठरवायचं. फेसबुकवर वेळ घालवणार नाही, अशा एखाद्या ध्येयापेक्षा मी अमुकसाठी वेळ देईन असं ठरवायचं. मग फेसबुक असो की नसो, फरक पडत नाही. अमुक गोष्टीसाठीचा वेळ मनात एका सकारात्मक नोटवर बाजूला पडतो. ती गोष्ट करून बघावीशी वाटते.
  आहे ना सोपं.
  करून तर बघू.
   
  ( मनमोकळं जगण्याचा ध्यास असलेली प्राची मानसशास्त्रात सुवर्णपदक विजेती आहेच, शिवाय सूक्ष्मजीवशास्त्राची तज्ज्ञ आणि पर्यावरणाची अभ्यासक आहे.)
   


महत्वाच्या आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लोकमत अॅप: Android | IOS