Unfollow द फ्रेण्ड

 • First Published :15-June-2017 : 17:51:08 Last Updated at: 15-June-2017 : 17:51:38

 • निशांत महाजन
   
  मित्र तसे आपल्याला जानसे प्यारेबिरे असतात. त्यांचं आपण ऐकतो. पण काही मित्र अनेकदा आपल्याला ‘लाज’ आणतात. अगदी चारचौघात शोभा करतात आपली. आणि असं त्यावेळी कळत नाही की कुठं तोंड लपवावं. एरवीच्या जगात मग आपण अशा मित्रांनाही सुनावतो काहीबाही, पण आॅनलाइन जगात. फेसबुकवर आपले काही मित्र आपली अशी जाहीर शोभा करतात. त्यातून आपल्यालाच खाली मान घालावी लागते. त्यामुळे आताशा ट्रेण्ड आहे, अशा मित्रांनाच फेसबुकवर अनफॉलो करण्याचा. त्यांना कळत नाही, पण आपल्या टाइमलाइनवर त्यांचं काही दिसतही नाही. आणि आपल्या परवानगीशिवाय ते आपल्याला टॅगही करू शकत नाहीत. पण इतकं करतात काय हे मित्र? ही यादी पाहा, आणि तुमचे मित्रही असंच काही वागतात का हे तपासून पहा..
  १) आचरट, अश्लील भाषेत मजूकर लिहितात. ना शेंडाबुडखा काहीही लिहितात. आणि त्यात आपल्याला टॅग करतात. 
  २) आपल्या पर्सनल गोष्टी फेसबुकवर लिहित बसतात. आपल्या म्हणजे, त्यांच्या, आपल्या, दोघांच्या, ग्रुपच्याही. 
  ३) आपल्या टाइमलाइनवर येऊन वाट्टेल ते प्रश्न विचारतात. काहीही बोलतात. फालतू जोक मारतात.
  ४) आपली खासी दोस्ती हे दाखवण्याच्या नादात आपला अपमान करतात. काहीही टोमणे मारतात.
  ५) आपल्याला कुठल्याही नावानं किंवा घरगुती नावानं संबोधतात.
  ६) उघडेवाघडे कसेही फोटो टाकतात.
  ७) आपल्याच वॉलवर येऊन आपल्या एखाद्या दुसऱ्या मित्राला टार्गेट करतात.
  ८) आपल्या मैत्रिणींशी चावटपणा करतात, सलगी करतात, त्यांच्याशी फ्लर्ट करतात किंवा त्यांना अपमानास्पद बोलतात.
  ९) हे एवढं किमान करणाऱ्या मित्रमैत्रिणींशी आधी बोलून पाहावं. त्यांनी ऐकलं तर ठीक, नाहीतर त्यांना अनफॉलो करावं. अनफ्रेण्ड करू नये.
  १०) सध्या हा अनफॉलो ट्रेण्ड मोठा आहे. तुम्हीही तपासून पाहा तुम्हाला कुणी अनफॉलो केलेलं नाही ना, ते!
   


महत्वाच्या आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लोकमत अॅप: Android | IOS