GET OUT एकेकटे चालायला लागा..

 • First Published :17-May-2017 : 15:57:06

 •  मे महिन्याचे १५ दिवस उलटून गेले..म्हणजे सुट्या संपतच आल्या म्हणायच्या. पाऊस आला की सोबत वेगवेगळ्या रिझल्टच्या सरीही घेऊनच येतो..आणि मग वाटतं, एवढी सुटी होती, पण कुठं फिरायला गेलो नाही. कसं जाणार फिरायला?

  घरच्यांनी नेलं नाही? मित्रांसोबत जाऊ दिलं नाही? पैसेच नव्हते?फिरायला जायचं तर परदेशात नाहीतर डायरेक्ट हिमालयात,तेवढे पैसे कुठून येणार?एकट्यानं जावं म्हटलं तर कोण जाऊ देणार? मुख्य म्हणजे कुठं जाणार?
  - शंभर प्रश्न!!
   
   
  पण उत्तर एकच, तुम्हाला पर्यटन आणि प्रवास यात फरकच कळलेला नाही. पर्यटनाला जातही असतील देश-विदेशात ट्रॅव्हल कंपन्यांसोबत, पण भटकायचं, प्रवास करायचा तर तो एकट्यानंही करता येतो. एकट्यानं/एकटीनंही एकेकटं फिरायचं तर त्यात फार धोका असतोहे तर साफ झूठ !फिरायचं तर खिशात पैसे लागतात हे तर एकदम सफेद झूठ!!मग फिरायचं तर काय लागतं?
  लागतो तो अ‍ॅटिट्यूड! धमक.
   
   
  माणसांशी बोलण्याचं कौशल्य.धोका ओळखण्याचा सेन्स.भरवसा ठेवण्याची हिंमत. आणि त्याहून सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लागते नजर! अवतीभोवती पाहण्याची. पाहून समजून घेण्याची. ती कमवावी लागते. आणि कमवायची तर घराबाहेर,
  निदान आपल्या गल्लीपासून सुरुवात करून आपलं शहर तरी आधी ‘पाहावं’ लागतं!
  ते तरी पाहिलंय का कधी? नाही???मग चालायला लागा..कसं जायचं?काय पाहायचं?? त्यातून काय मिळेल?मुळात एकट्यानं भटकायचंच कशाला? त्याचा उपयोग काय?
  आणि निघाच.. डायरेक्ट!!
  - आॅक्सिजन टीम oxygen@gmail.com
   
  - प्राची पाठक
  आपल्याला वाटतं ना फिरायला जावं? मग जायचं! त्यात कशाला हवी कुणाची सोबत. फिरायचं तर डायरेक्ट चोप्रा सिनेस्टाइल स्वित्झर्लण्डच गाठायचं असं कोण म्हणतं? पैसे पाहिजे, एसी गाडी पाहिजे, सोबत कुणी दोस्त पाहिजे, जेवणाचा थाटमाट आणि  राहण्याची उत्तम सोयच पाहिजे हे 
  असं तरी कुणी ठरवलं?फिरायला जायचं ना, मग जा!
  एकटे जा!आपला देश, आपलं राज्य,ते जाऊ द्या आधी आपलं शहर, आपली गल्ली तरी एकट्यानं भटकून या! एकट्यानंच का? कारण त्याशिवाय कळणार कशी एकटं फिरण्याची जादू? आणि ओळख तरी कशी होईल माणसांशी, भूगोलाशी  आणि मुख्य म्हणजे स्वत:शी!
  एकट्यानं फिरताना ते दिसतं, जे एरवी आपल्याला दिसत नाही; आणि ते जाणवतं, जे चुकून कधी घरबसल्या जाणवलं नसतं!
   
  ‘ए क्या बोलती तू, 
  आती क्या खंडाला.. ’
  - असं म्हणता येईल असं कोणीतरी आपल्यासोबत असावं, त्याच्या / तिच्यासोबत भटकायला जावं, असं वाटतं ना?
  खंडाळा जाऊ देत, गेला बाजार ‘किसी डिस्को में जाये, किसी होटल में खाये’ निदान इतकं तरी कुणासोबत भटकायला जावं असं वाटतंच. 
  ‘चला फिरायला जाऊ’ असं जेव्हा जेव्हा मनात येतं, तेव्हा तेव्हा ते कुणाच्या तरी सोबत करायचं आहे, ग्रुपमध्ये करायचं आहे असंच आपलं प्रोग्रामिंग होऊन गेलेलं असतं. डोक्यात कोरून ठेवलं जसं! 
  एकट्यानं सहजच उठून सिनेमा बघायला जावं, एखाद्या कार्यक्र माला जावं, चित्र प्रदर्शन बघायला जावं, दोन दिवस फिरायला जावं असं फारसं मनात येत नाही. कारण तसं करणं म्हणजे दिमाग का दही! एकटाच कुणी फिरताना दिसला, तर यार याचा देवदास झाला की काय अशी शंका येते; इतके लोक घोळक्या घोळक्याने फिरत असतात. सगळे कसे ‘आओ मिलो चले!’ मगच सिलसिले वगैरे सुरू होतात. तोवर आपली गाडी पटरीवरून हलतच नाही. कोणी आओ मिलो चले म्हणायला नसेल, तर पळून जावंसं वाटतं अगदी. ‘पळून जाणं’ ही एकच गोष्ट अगदी मनापासून एकट्यानं करू शकतो, असं वरचेवर आपल्याला वाटत असतं. फार तर कोणी प्रेमात वगैरे पडून पळून जायचा विचार करतील. पण ‘अकेला किधर घूम रहा हैं’ ची भीती बाळगून असतोच आपण. 
  आधीच आपण धडपडून करिअर वगैरेच्या मागे लागलेलो असतो. एक रु टीन शोधत असतो. ‘स्टेबल व्हा आयुष्यात’ चं तुणतुणं लोकांनी आपल्या कानीकपाळी लावलेलं असतं. अशा सगळ्यात फिरायला कुठून वेळ काढणार? आधी परीक्षांचे पहाड असतात समोर, खिशात दिडकी नसते. पुढे नुकतीच नोकरी वगैरे कशीबशी लागलेली असते, तर सुटीचा प्रश्न येतो. फिरणं करू की सावकाश, रिटायर होईपर्यंत ते लांबतं मग! 
  नंतर मग उलटं बोलणारे लोक सापडतात. ‘तरु ण असतानाच फिरायला पाहिजे जगात कुठेही. स्वस्त आणि मस्त फिरून होतं. अंगात ऊर्जा असते’. आपण हे वाक्य घोकतो आणि बाकीच्या रेट्यात परत विसरून जातो. कॉलेजच्या ग्रुपमधले, नातेवाइकांतले, नोकरीतले कलिग्ज वगैरे कोणी सोबत आले असते तर गेलोही असतो, असंही मनात आणतो. मग ‘ते आपल्याला त्यांच्यात घेतील का’, आणि ‘आपल्यात नको बाबा असले लोक’ चं गणित मांडत बसावं लागतं. ह्याला घ्या, त्याला नाही सांगा, कोणी आपल्याला नाही सांगितले म्हणून रु सून बसा, दुखावले जा, दुसऱ्यांच्या ट्रिपचे सेल्फी डोळे विस्फारून बघत बसा.. इतकंच उरतं मग आयुष्यात. 
  हे सारं करून कधी घोळक्यात जायचं म्हटलं तर त्यात एक कुणीतरी डॉमिनेटिंग असतोच. त्याला सगळ्यातले सगळे कळते अशा थाटात तो इतर लोकांना प्लॅन्स देत असतो. फिरायला गेल्यावर ग्रुपचा ताबा घेऊन टाकतो. इतर आळशी होतेय ना परस्पर काम म्हणून हो ला हो करत बसतात. प्लॅन्स बनताना कोणीतरी त्याला हवं तसं बनवते. मग आपण आशाळभूत नजरेने पाहत बसायचे ते सगळे. काश, आपण इकडे गेलो असतो तर म्हणायचं मनातच आणि जायचं दुसऱ्याच्या प्लॅन्सनुसार. स्वत: पुढाकार न घेतल्याची किंमत असते ती. ग्रुपमध्ये फिरल्यानं गाडी करून गेले, तर खर्च कमी होतो प्रत्यक्ष प्रवासाचा, इतकाच फरक असतो. पण ग्रुप म्हणून इतर लोकांच्या आवडीनिवडी सांभाळत बसावं लागतंच. कुणाला काय आवडतं, कुणाला काही आवडत नाही. एखाद्याला म्युझिअम बघायचं असतं, तर दुसऱ्याला काय तुटकी-फुटकी मडकी, तीच ती हत्यारे बघत फिरायचं असे म्युझिअमबद्दल वाटत असतं. कुणाला प्राणिसंग्रहालयात जायचं असतं, तर कुणाला ते लहान मुलांचं काम वाटतं. प्राणी सगळीकडे सारखेच. या प्राणिसंग्रहालयात असं विशेष काय आहे वेगळं म्हणूनदेखील कोणी तो प्लॅन फिस्कटून टाकतं. कुणाला तळ्याकाठी बसायचं असतं, तर कोणी म्हणते, ‘शी, तिथं कसलं तळं, नुसता कचरा आहे तिकडं. टपोरी पोरं फिरत असतात. नकोच ते’. 
  त्यात फिरायला जायचं म्हणजे पैसेदेखील खूप लागणार, असंही मनात येत असतंच. आता कुठे आपण शिकून नोकरीला लागत असतो. काहींचे शिक्षण सुरू असते. कुणाला घरात पैसे मागावे लागणार असतात. त्यात मौजमजेला किती पैसे कुणाकडे मागणार किंवा स्वत: खर्च करणार, ही मर्यादा असतेच. म्हणजे मग आपण परत स्वप्नंच बघायची. पाठीला लावलेली सॅक, त्यात पाण्याची बाटली, थोडा खाऊ, स्पोर्ट शूज पायात, हातात कॅमेरा, डोक्यावर कॅप. सगळा लवाजमा फक्त एकेक करून जमा करून ठेवायचा. पैसे साचतील तेव्हा जाऊ. वेळ मिळेल, ग्रुप जमेल तेव्हा जाऊ. खयाली पुलाव जोरदार. मग कोणी भारीतले अ‍ॅप्स डाउनलोड करतं. त्यात कसे सगळे रस्ते दिसतात. पत्ता विचारायची गरजच नाही. काय काय सोयी, प्रौढीने सांगते आपल्याला. कसेबसे सॅकपासून सगळं जमलं की आपलं गाडं अ‍ॅपपाशी अडतं मग. ते शिकायला हवं. जणू काही रस्ता चुकूच नाही, असा नियम आहे! कुणाला रस्ता विचारला, तर महापाप होणार आहे. ‘शी, रस्त्यावरच्या अनोळखी माणसांशी काय बोलायचं’, असा काही नियम आहे का असंही आपण स्वत:ला विचारत नाही. अनोळखी लोकांपासून सावध राहा, असं किती सातत्यानं आपण लहानपणापासून इतरांकडून ऐकत असतो. सगळे जणू आपल्यालाच लुटायला येणार आहेत, इतका सावधपणा काय कामाचा? कोणी बरोबर असलेलं चांगलं, जोडीला आहे कुणी तुझ्या, सोबत कोण आहे ही वाक्यं कानात वाजत असतात ती वेगळीच. 
  बरं अनेकांना वाटतं की ट्रीपला जायचं म्हणजे गाडी-घोडे हवेतच. म्युझिक सिस्टीम हवी त्यात. ही भारीतली गाणी. पायी जाणं, एकटीने/एकट्याने जाणं, स्थानिक बसने फिरणं, शेअर टॅक्सी/रिक्षाने जाणं, सायकलवर जाणं, कधी बाइक नेणं असे आॅप्शन्स चटकन मनात येत नाहीत. बाइक मनात आली, तर ती पण एकदम स्पोर्ट्स बाइक पाहिजे नाहीतर रॉयल एखादी. सगळे कसे फोटोजेनिक छान छान दिसले पाहिजे. एकदम हिरोसारखे. प्रवासातले टक्केटोणपे अजिबात जाणवले नाही पाहिजेत. प्रवासात चेहरा जराही काळवंडायला नको. गोरंगोमटं, चिकणं दिसायचं. कडक इस्त्रीचे, स्वच्छ कपडे दिसायला हवेत, असलं बालिश काहीतरी आपण पाहिलेलं असतं. ऐकलेलं असतं. तेच मनात घोळवत बसतो मग आपण!
  मग कारणांची यादी असतेच आपल्याकडे पुढे करायला.
  घरातून बाहेर पडलं की खाण्यापिण्याचा खर्च होणार आणि राहायला हॉटेल बुक करायचं तर आधीपासून सगळं केलं पाहिजे, त्याचाही वेगळा खर्च होणार. आपण किती दिवस किंवा किती तास बाहेर आहोत, कुठे आहोत, तिकडे खायला काही मिळेल की नाही याचा विचार करून छोटीशी शिदोरी आपल्यासोबत नेणं म्हणजे एकदम डाउन मार्केट. आपण कसे जाऊ तिकडे पिझ्झा शॉपमध्येच थेट पोहोचलो पाहिजे किंवा भारीतल्या एखाद्या हॉटेलात! चांगलंचुंगलं खायला फिरायचं नाही, तर कशाला फिरायचं मग? असा वर अजून एक युक्तिवाद! दुसरीकडून ‘घरच्यासारख्या जेवणाचा अट्टाहास’देखील बाळगायचा. कटकट नको म्हणून एखादी ट्रॅव्हल कंपनी बुक करून तिच्यासोबत फिरायचं आणि त्यांनी कसं इतक्या दुर्गम ठिकाणीदेखील महाराष्ट्रीयन अन्न खायला दिलं याचं कौतुक करायचं. काय छान खायला प्यायला दिलं कोणी, हा फोकस आहे की नेमकं कुठं फिरायला गेलो, तिथे काय पाहिलं, काय जाणवलं तिकडे, हा फोकस आहे? सगळा गोंधळच.
  ट्रिपला चला म्हटले की सगळ्यांना एकदम स्वित्झर्लंडला का जायचं असतं?
  तुमच्या गावात, गावातल्या तुमच्या भागात, तुमच्या तालुक्यात, शेजारच्या तालुक्यात, तुमच्या जिल्ह्यात, राज्यात काही बरं सापडत नाही की काय? इतकं कसं रटाळ मुक्काम पोस्ट आहे आपलं असंच वाटत ना? सगळे एकदम दूर दूर. परक्याच ग्रहावर भारीतली फिरायची ठिकाणं. कुलू मनाली, नाहीतर कन्याकुमारी. आसपास काही दिसतं की नाही? 
  नाही? 
  नसेल दिसत आणि फिरायला जायचं म्हटलं की सोबतीसह वर दिलेली सगळी गाऱ्हाणी तुम्ही सांगत असाल तर मग जाणार कधी फिरायला? आणि गेलात तरी पाहणार काय? एन्जॉय कसं करणार तुमचं फिरणं?
  तेव्हा फिरायचं असेल तर मनात साचलेलं हे सगळं डिलीट मारून, मनाची पाटी कोरी करून एकट्यानं फिरायला जाणार का? (मुलगी असाल तर) एकटीने फिरायचं धाडस करणार का?
  विचारा स्वत:ला!
  कारण हे नुसतंच थ्रिल नाही, हे फिरणं म्हणजे आपल्या मनात डोकवायची उत्तम संधी असते. सगळा कस पणाला लागतो. सहजच घडलेलं, आखून रेखून न केलेलं हे भटकणं. मनात आलं, उठले, थोडीशी तयारी केली, काही सामान, खाऊ घेतला, थोडेसे पैसे गाठीशी आणि वाट मिळेल तिकडे फिरून आले. कधी जवळ, कधी दूर. कधी एकाच दिवसाची ट्रिप, कधी तीन- चार दिवसांची. कधी असंच वाटेत कुणी सोबत घेतलं. ती नवी साथ. कधी एकट्यानं फिरलं. कधी अचानक कोणी सोबत यायला तयार झाले मैत्रीतले, ती संगत. अनोळखी प्रदेश पालथं घालणं, अनोळखी लोकांशी बोलणं, परिसराचं ज्ञान मिळवणं, दिशा समजणं, भूगोलाचा वस्तुपाठ मिळणं, बाहेर फिरून स्वत:ला आतून ओळखायची संधी मिळणं असं सगळं पॅकेज असतं हे. त्यांना फिरस्ते म्हणतात. स्वस्त आणि मस्त पॅकेज. अनेक गोष्टी शिकायची संधी. त्यासाठी मेंदू थोडा खर्च होतो म्हणा. एनर्जी लागते. फिटनेसवर काम करावं लागतं.
  पण शरीर- मनाचं सर्व्हिसिंग करायचं असेल, तर असं एकटं वर्षातून एकदा तरी फिरलंच पाहिजे. फिरलं की कळेल काय जादू असते त्यात!!
  एकट्यानं फिरण्यासाठी फक्त आणि फक्त आपण आणि फिरण्याची प्रबळ इच्छा, इतकंच गरजेचं असतं. पैसा, वेळ, भीती सगळे मुद्दे गळून पडतात मग. 
  मुक्कामापेक्षा मुक्काम गाठायचा रस्ताच काय भारी असतो, ते सुविचारात लिहायची किंवा गाण्यात ऐकायची गरजच पडत नाही मग!
  आपण तसं प्रत्यक्ष जगू शकतो, फिरू शकतो, आपल्या पायावर... 
  आणि अनोळखी प्रदेश पालथा घालता घालता स्वत:लादेखील नीटच ओळखू लागतो.
  आतून-बाहेरून स्वओळख... 
  म्हणजेच, ‘एकला चलो रे!’ 
   
  न भरकटता,
  भटकताना काय घडतं?
  एकट्यानं फिरणं, विविध ठिकाणी पायी भटकणं आणि न भरकटता योग्य वाट पकडून राहणं हे एक उत्तम मेडिटेशन आहे!
  साधं पाच मिनिटांवर आणि ओळखीच्याच ठिकाणी जायचं असेल, तरी अनेक जण एकमेकांना सोबत घेऊन फिरतात. कळप वृत्ती बायकापोरींमध्ये जरा जास्तच! सगळीकडे सोबत पाहिजे. शाळेत, कॉलेजात, आॅफिसात, एवढंच काय तर काहीजणी टॉयलेटला जातानादेखील एकमेकींना सोबत घेऊन जातात. रोजची ओळखीची जागा, तिथे कशाला पाहिजे कुणाची सोबत? अर्थात, याचा अर्थ एकेकटं आणि ठरवून प्रवास करणारे पुरु षदेखील थोडेच असतात. तेही घोळक्यातच जास्त असतात. कामाच्या निमित्तानं फिरतात की लोक. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी तीन- चार- पाच तास एकट्यानं प्रवास करून जातात. बारा-पंधरा तास एकट्यानं/एकटीने विमान प्रवास करतात, कुणाच्या घरी पोहोचतात. पण ते वेगळं आणि खास ठरवून, वेळ काढून, अनोळखी जागी चार-पाच-सहा दिवस एकट्यानं/एकटीनं जाऊन राहणं वेगळं. म्हणून मुलीच्या जातीनं असं फिरू नाही, सुरक्षेचं काय वगैरे मनात आणून घरीच बसायचं नाही. धोक्याचं भान ठेवून घ्यायची रिस्क म्हणजे कॅल्क्युलेटेड रिस्क. तिची मजा असते वेगळी. खूप काही शिकतो आपण त्यातून. 
   
   
  नेमकं बोलण्याची कला
  शिका फुकटात
  ‘माइंडफुलनेस’ हा एक शब्द आहे मानसशास्त्रात. आपण जे काही काम करतोय, त्याबद्दल पूर्ण जागरूक, सतर्क असणं, वर्तमानात असणं, डोकं भरकटू न देता जे करतो आहोत तिथं असणं. वर्गात लेक्चरला बसायचं आणि लक्ष बाहेरच्या झाडावर किंवा वहीत काहीतरी चित्र काढत बसलो आहोत, असं नाही. रटाळ रडगाणं फाट्यावर! आपण काय शिकतो आहोत, कोण शिकवतं आहे असा पूर्ण फोकस शिकण्यावर. मगच त्यातली मजा कळते. प्रश्न पडतात. उत्तरं मिळतात. एकट्यानं फिरताना हाच माइंडफुलनेस जोमात कामाला लागतो. दैनंदिन ताणाच्या गोष्टींपासून आपल्याला दूर नेतो. कचकच कटते यार आयुष्यातली जरा वेळ तरी. प्रत्येक गोष्ट नीट लक्ष देऊन करावी लागते एकट्यानं फिरताना. जबाबदारी कुणावर सोपवून चालत नाही. कुठून कुठे जायचं, कसं जायचं, त्या-त्या ठिकाणी भेटणारे लोक, तिथे किती वेळ घालवायचा, आर्थिक व्यवहार, आपल्या आवडीनिवडी, आपली सुरक्षा, पोटात कावळे ओरडायला लागले तर काय खाणार, कुठे खाणार, किती खाणार, किती पैसे देणार हे आणि असं बरंच ‘भान’ ठेवावं लागते. ते भान जागरूक ठेवणं म्हणजेच मेडिटेशन! 
  असे सोलो प्रवास खरोखर आनंददायी असतात. आत्मविश्वास वाढवितात. संवादकौशल्य वाढतं. कम्युनिकेशन स्किलची प्रॅक्टिकल परीक्षा ना बॉस! ताण नसलेली परीक्षा. चुकलं तर चुकलं. पुढचा अनोळखी माणूस पकडायचा. त्याला माहिती विचारायची. दुसऱ्याशी बोलताना होणारी चूक सुधारायची. नेमक्या शब्दांत आपला प्रश्न विचारता आला पाहिजे. उत्तर मिळवायची तडफड केली पाहिजे. मग जास्त चपखल शब्द कळतात. आपले प्रश्न आधी नीट कळतात. आपल्याला हवेय काय, जायचंच कुठं हे परफेक्ट समजतं. अशातूनच निर्णय घेण्याची सवय लागते. विचारांची क्लॅरिटी मिळाली ना फुकट! क्लास न लावता. 
  आपण घेतलेल्या निर्णयातून बरंवाईट घडलं तर ते दुसऱ्याच्या माथी मारता येत नाही. निर्णय सर्वस्वी आपले असतात. आपण घेतलेल्या निर्णयांची जबाबदारी आपण घ्यायची सवय लागते. स्वत:ला समजून घेण्यासाठी, स्वत:मध्ये डोकावण्यासाठी तर एकेकटे प्रवास म्हणजे वरदानच! ‘तुम्ही म्हणाल ते’, ‘काहीही चालेल’ अशी वाक्यं वापरायची वेळच येत नाही. सगळे आपल्यालाच म्हणायचं असतं आणि काहीही चालेल काहीही कामाचं नसतं. स्पेसिफिक बोलायची सवय करावीच लागते. नाहीतर, जायचं आहे मुंबईला आणि आपण म्हणतोय, ‘कुठंही पाठवा, त्यात काय? काहीही चालेल!’ एरवी आपण असे व्हेग समोरच्याशी बोलत असतो कायम. त्याची गंमत कळते. ‘भावा, जायचंय कुठं, स्पेसिफिक बोल’, ह्याचं महत्त्व कळतं. मुख्य म्हणजे, बोल राणी, मनातले बोल. बोलून प्रश्न सुटतात, ह्यावर विश्वास ठेव!
   
  एकटं फिरण्यात धोका नसतो?
  डिस्कव्हरी किंवा अजून कुठे-कुठे आपण बघतो. काहीही सामान न घेता कोणी फिरत असतो. जे मिळेल ते खातो. कुठेही झोपतो. अगदी तसं नाही, पण कमीत कमी सामानात फिरायला शिकायचं. म्हणजे, प्लॅन्स करणं आलं. आपल्या गरजेचा विचार करणं आलं. पर्यटन आणि फिरस्ती/यात्रा यात फरक आहे, ते कळतं मग. पर्यटन महागडं, घोळक्यातलं आणि ठरलेलं असतं बहुतांश. फिरस्त्यांना सापडेल ती वाट असते. त्या वाटेनं तसं फिरायचं. स्थानिकांबरोबर गप्पा मारायच्या. त्यांचे खाद्यपदार्थ, संस्कृती, पेहराव समजून घ्यायचे. नवी भाषा शिकायचा प्रयत्न करायचा. असे सगळे फिरस्त्यांना करता येते. धोक्याचे म्हणाल, तर एकट्या पुरु षाला जितका धोका असतो, त्यापेक्षा थोडा जास्त धोका एकट्या स्त्रीला असतो, असे म्हणू. पण धोका कुठेही असतोच. घरातल्या घरात बसूनदेखील धोका असतोच. घराच्या छप्पराच्या विश्वासानेच आपण घरात वावरत असतो ना? ते आता कोसळेल, तेव्हा कोसळेल, असे करत राहिलो तर स्वत:च्या घरातसुद्धा शांत बसता येणार नाही. फिरायला जायचं तर दूरच. तर धोक्याचीदेखील जबाबदारी घेण्यासाठी एकट्यानं घराबाहेर पडायला हवंय! एकटं फिरणं आपल्याला माणसं ओळखायला शिकवतं. मन खंबीर करतं. 
   
  कुठं जायचं भटकायला
  हे ठरवायचं कसं?
  फिरायला जायचं म्हटलं की लगेच मोठी शहरं, विदेश असं कशाला आठवायला हवं?
  आपण आपल्याच शहरात ठरवून, शहर बघायला म्हणून फार कमी वेळा घराबाहेर पडतो. येऊन जाऊन मॉल्स नाहीतर मल्टिप्लेक्स हे काय फिरणं आहे?
  आपलंच शहर, आपलाच भाग पायी एकट्यानं पिंजून काढायला काय खर्च येणार आहे? असा कितीसा धोका त्यात असणार आहे? असं करायला खरोखर कोणी सोबत नाही, म्हणून अडून बसायची गरज असते का? की भारीतले अ‍ॅप्स लागतात कोणते? पण असं फिरून फार फ्रेश होतं मन. 
  मग इतर लहानमोठी शहरं शोधायची. आपल्या शेजारचे तालुके बघायचे. त्यांची माहिती वाचायची. एरवी फेसबुक-व्हॉट्सअ‍ॅपवर पडीक असतो आपण, तर तिथेही चौकशी करायची. कुठे कुठे काय काय बघायला आहे अशी. स्थानिक लोकांची मदत घ्यायची. त्या-त्या ठिकाणचे प्रसिद्ध पदार्थ खाऊन बघायचे. तिथले बाजार पिंजून काढायचे पायी. वेगळे कारखाने असतील, तर भेट द्यायची. 
  मग नंतर अजून परीघ विस्तारत न्यायचा. राज्याबाहेर, देशाबाहेर जायचे. बजेट बघून, वेळ बघून. अगदीच हट्टाने सगळीकडे एकटेच फिरणार, असंही करायचं नाही मग. निवडक सोबतीने एकत्र फिरूनदेखील आपण कितपत कुणासोबत अ‍ॅडजस्ट करू शकतो, याचा अंदाज येतो. दोन वेगळे दृष्टिकोन मिळतात. अ‍ॅप्सला फटकावून ठेवायचीदेखील गरज नाही. पण त्यांच्यावरच फक्त अवलंबून राहायचे नाही. नाहीतर नेट कनेक्शन तुटलं, फोनची बॅटरी संपली, तर फसली यार ट्रिप? जीव नुसता कासावीस नेटची रेंज यायला, फोन सुरू व्हायला. इतकं फोनवर अवलंबून राहायचं नाही. डोकं वापरायला शिकायचं. ते सगळ्यात भारीतलं अ‍ॅप असतं. सहजच मिळालेलं. त्याची कदर कोण करणार? 
   
  prachi333@hotmail.com
  (मनमोकळं जगण्याचा ध्यास असलेली प्राची मानसशास्त्रात सुवर्णपदक विजेती आहेच, शिवाय सूक्ष्मजीवशास्त्राची तज्ज्ञ आणि पर्यावरणाची अभ्यासक आहे.)
   


महत्वाच्या आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लोकमत अॅप: Android | IOS