जे प्रत्यक्ष दिसणं अवघड, ते ‘अनुभवण्या’साठी...

 • First Published :17-May-2017 : 15:36:35

 •  - प्रज्ञा शिदोरे 

  जागतिकीकरण म्हणजे नक्की काय? जो शब्द आपण सतत वापरतो त्याचा आपल्या जगण्यावर नक्की काय परिणाम होतो आहे? आपण अनेक वेळा जागतिकीकरण म्हणजे काय याबद्दल बरंच ऐकलं असेल. कदाचित शाळेत जागतिकीकरण शाप की वरदान असा निबंधदेखील लिहिला असेल. पण त्याचे परिणाम नक्की कोणकोणत्या क्षेत्रांवर होत असतात, याबद्दल अतिशय सोप्या शब्दात आणि सहज समजेल अशा शब्दांमध्ये तुम्ही ऐकलं आहे का? आणि तेही मराठी भाषेमध्ये!! नाही ना? या आणि अशाच संकल्पनांचा ऊहापोह करण्यासाठी ‘विचारवेध’ संस्थेने एक यूट्यूब चॅनल सुरू केलं आहे. १९९४ पासून २००७ पर्यंत, १४ वर्षे, विचारवेध संमेलन आयोजित होत असे. सातारा येथील आंबेडकर अकॅडमीतर्फेकिशोर बेडकिहाळ आणि त्यांचे सहकारी निरनिराळ्या गावांत, तेथील कार्यकर्त्यांच्या सहयोगाने हे संमेलन आयोजित करत. समाजाच्या प्रगतीसाठी निर्भीड आणि सखोल विचारमंथन करण्याचा विचारवेध संमेलनांचा ऐतिहासिक वारसा आहे. वार्षिक संमेलनांच्या बरोबरच विचारवेध ही विविध माध्यमांतून लोकांपर्यंत पोचणारी सातत्याची चळवळ आहे, असे तिथल्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. लोकांच्या विचारांना अभिव्यक्ती देणारे माध्यम आहे. यूट्यूबच्या माध्यमातून ‘विचारवेचे’ ही छोटी भाषणे सर्वांना सहज उपलब्ध करून देत आहेत. तर, यामधलेच एक भाषण श्रुती तांबे यांचे. साधारण १९-१९ मिनिटांच्या या भाषणात त्यांनी जागतिकीकरणाच्या सामाजिक परिणामांवर चर्चा केली आहे. श्रुती तांबे या सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणे येथे पदव्युत्तर वर्गांना ‘समाजशास्त्र’ हा विषय शिकवतात. त्यांच्या संशोधनाच्या विषयांमधला जागतिकीकरण आणि त्याचे होणारे सामाजिक परिणाम हा तसा जिव्हाळ्याचा विषय. प्राध्यापक तांबे असं म्हणतात की, जागतिकीकरणाचे पैलू हे आर्थिक, सामाजिक, तंत्रज्ञानात्मक आहेत. आणि भारतात जागतिकीकरण म्हटले की त्याची सुरुवात आपण १९९० पासून करतो. पण काही युरोपीय समाजशास्त्रज्ञांच्या मते जागतिकीकरणाच्या लाटा असतात. आणि या लाटा गेली अनेक शतके येत राहिल्या आहेत. आतापर्यंत अशा सहा लाटा आल्या, असे त्या सांगतात. या व्हिडीओमध्ये त्यांनी या सहा लाटांचे थोडक्यात वर्णन केलं आहे. आपल्या फारसं लक्षात येण्याच्या आत आपल्या खाण्यापिण्याच्या सवयीचं, मनोरंजनाच्या कल्पनांचं कसं जागतिकीकरण झालं आहे याचे दाखलेही ते त्यांच्या या छोट्या भाषणामधून देतात. जागतिकीकरण म्हणजे काय हे समजून घ्यायचं असेल तर हा व्हिडीओ पाहा..

   
  वाचा : इंटरनेटच्या जंजाळातून ‘निवडून’ नक्की वाचावं, असं काही...
  रोजच्या रोज सोशॉलॉजी
  आपल्या रोजच्या जगण्यातलं समाजशास्त्र समजून सांगणारा एक भन्नाट ब्लॉग
  जागतिकीकरणाच्या परिणामांचा अभ्यास हा समाजशास्त्र या ज्ञानशाखेमध्ये येतो. आणि आपण आताच वाचलं तसं याचा परिणाम अनेक गोष्टींवर सतत जाणवत राहतो. यावर अमेरिकेतील एका समाजशास्त्रज्ञांच्या गटाने मस्त ब्लॉग तयार केला आहे. 
  या ब्लॉगचं नाव ‘एव्हरीडे सोशॉलॉजी’. त्यांच्या ब्लॉगची सुरुवात करतानाच त्यांनी एक गमतीदार प्रश्न विचारला आहे. तो म्हणजे, ‘जर, समाजशास्त्रज्ञांनी या जगावर राज्य केलं तर?’ आणि लगेच त्याच्या दुसऱ्या वाक्यात ते म्हणतात की ते कदाचित कधीच शक्य होणार नाही. पण हे समाजशास्त्रज्ञ एक गोष्ट उत्तम करू शकतात ती म्हणजे विविध घटनांवर भाष्य करणं. आणि हे भाष्य हेच या ब्लॉगचं वैशिष्ट्य आहे. 
  यामध्ये त्यांनी त्यांच्या लेखकांना काही बंधने घालून घेतली आहेत. ती म्हणजे एक, आता या क्षेत्रात होत असलेल्या सर्व नव्या संकल्पना आणि शोध याचं भान लेखकानं ठेवायला हवं. दुसरं म्हणजे, जड शब्द, मोठमोठाल्या संकल्पना अजिबात वापरायच्या नाहीत कारण या लेखांची भाषा सर्वसामान्य लोकांना सहज समजेल अशी असायला हवी आणि तिसरं म्हणजे आपलं लेखन रंजक हवं. 
  हे नियम पाळून समाजशास्त्रज्ञांनी अ‍ॅमेझॉन या वेबसाइटवर आपण का खरेदी करतो यासारख्या विषयापासून ट्रम्पला सत्ता हातात आल्या आल्या शस्त्रास्त्रांचा वापर का करावासा वाटतो यावर भाष्य केलेलं आहे. 
  तेव्हा आपल्या आसपासच्या घटनांकडे लक्षपूर्वक पाहता येण्यासाठी हा ब्लॉग वाचायलाच हवा!

  (pradnya.shidore@gmail.com )महत्वाच्या आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लोकमत अॅप: Android | IOS