बी कम्फर्टेबल

 • First Published :28-December-2016 : 16:29:23 Last Updated at: 28-December-2016 : 17:50:08

 • - प्राची खाडे

  सिनेमात किंवा सिरीअलमध्ये 

  जे घातलं जातं ते म्हणजे फॅशन

  हे गणित यंदा तरुण मुलामुलींनी

  मोडूनतोडून टाकलं.

  उलट, आम्ही जे घालू,

  जे वापरू, ज्यात कम्फर्टेबल वाटेल

  ते म्हणजे फॅशन असं म्हणत

  टाइट फिट कपड्यांना

  बायबाय करून टाकलं..

  तरुणांच्या विशेषत: कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलामुलींच्या फॅशन्सवर आता पूर्वीसारखा सिनेमातल्या किंवा एखाद्या मालिकेतल्या पात्राच्या स्टाइलचा शिक्का नसतो. असते ती निव्वळ तरुणांची फॅशन. त्याला शिक्का बसलाच तर तो फार तर अमक्या तमक्या वर्षाची फॅशन असा बसू शकतो. कॉलेजात शिकणाऱ्या मुलामुलींच्या फॅशनमध्ये त्यांची स्वत:ची स्टाइल, आवडनिवड डोकावत असते. त्यांच्या स्टाइलवर त्यांची स्वत:ची ‘सिग्नेचर’ असते. म्हणूनच एखाद्या कॉलेजमध्ये जरी डोकावलं तरी फॅशन्सचे अनेक स्टाइल स्टेटमेण्ट भेटतात. ते स्टेटमेण्टही काहीएक विशिष्ट कमेंट करत असते. २०१६ या वर्षातही तरुण फॅशन/स्टाइलनंही हेच केलं. 

  गेल्या काही वर्षांपासून तरुणांच्या वागण्या-बोलण्यात जो मोकळेपणा दिसतो आहे तोच त्यांच्या पेहेरावात, राहणीमानात दिसतो आहे. यावर्षी हाच मोकळेपणा तरुणांनी त्यांच्या अंगाखांद्यावर मिरवला. 

  अर्थात, हा जो मोकळेपणा त्यांच्या फॅशनमध्ये होता तो नेमका होता. त्यात ‘काहीही’ या कॅटेगिरीतलं काहीही नव्हतं. ‘मला जे सूट होईल ते’, ‘मी ज्यात छान दिसेल ते’ आणि तेच या मुलांनी परिधान केलं, कॅरी केलं. आणि हेच २०१६ च्या तरुण फॅशनचं एक वैशिष्ट्य होतं. डोळ्यांवरच्या ग्लासेसपासून पायातल्या शूजपर्यंत ‘आय लाइक इट अ‍ॅण्ड आय अ‍ॅम कम्फर्टेबल विथ धिस’ हेच प्रत्येक तरुणाला, त्यातही विशेषत: मुलींना सांगायचं होतं असं दिसलं. आणि हाच यावर्षीचा फॅशनचा ट्रेण्ड होता असं म्हणता येईल !

  तरुणांनी कशी घडवली स्वत:ची फॅशन?

  * मोकळेपणासह यंदा फॅशनच्या जगाचे ‘आॅरगॅनिक आणि नॅचरल’ हे विशेषही पाहायला मिळाले. रंग, डिझाइन, टेक्श्चर याबाबतीत मुलामुलींनी अधिकाधिक नॅचरल दिसण्याचा प्रयत्न केला. 

  * मी जाड आहे, मी बुटका किंवा बुटकी आहे पण मला फॅशन टाळून राहायचं नाही, मलाही मला सूट होईल ते सर्व घालायचं आहे हा मुलामुलींच्या मनातला निश्चय त्यांच्या पेहेरावात आणि त्यांच्या अ‍ॅक्सेसरीजमध्येही दिसला. असं काय आहे ज्यात मी छान दिसेल, स्मार्ट दिसेल हे शोधण्याचा कल फॅशनमध्ये दिसून आला. 

  * काही वर्षांपूर्वी कॉलेजमध्ये जायचं असं डोक्यात ठेवून कॉलेजच्या चौकटीतलीच फॅशन केली जायची. पण त्यामुळे फॅशनच्या जगातले बरेच हौशी मुलंमुली टाइट फिट फॅशनच्या वाटेनं जाऊन आपला कम्फर्ट हरवून बसायचे. पण आता मुला-मुलींनी कॉलेजच्या फॅशनची चौकट तोडून मोडून टाकली आहे. टाइट फिट, स्लिम फिट हे छान आहे पण ते जर मला छान दिसत नसेल, त्यात जर मला कम्फर्टेबल वाटत नसेल तर मग कशाला जा त्या वाटेनं, असं ठरवताना मुलंमुली दिसतात. कपड्यांमधला स्वत:चा कम्फर्ट झोन शोधून कम्फर्टेबल फॅशन करतात. कॉलेजमधले तरुण-तरुणी यंदा याच कम्फर्टेबल लूकमध्ये वावरत होते. 

  * आईवडिलांना विचारून, त्यांच्या आवडी-निवडीनं कपडे घालण्याचा काळ केव्हाच मागे पडला आहे. माझ्या आवडीचं, मला छान दिसणारं तरीही टे्रण्डी वाटेल असे कपडे आणि अ‍ॅक्सेसरीज घालणारे तरुण-तरुणी यंदा कॉलेजमध्ये, कॉलेजच्या कट्ट्यांवर, कॉफी शॉपमध्ये, संध्याकाळच्या पार्ट्यांमध्ये, कॉलेजच्या ट्रिपमध्ये इतकंच कशाला वर्कआउटच्या जागीही दिसले. 

  * यावर्षीच्या कॉलेजमधल्या फॅशनविश्वावर सोशल साइट्सचा प्रभाव प्रामुख्यानं दिसला. सेल्फी काढून पोस्ट करण्याचा टे्रण्ड यंदाही जोरात असल्यामुळे आपल्या फोटोवरही छान, परफेक्ट, स्मार्ट, नॅचरल लूकिंग यासारख्या कमेण्ट्स मिळवण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न यंदाही तसाच होता. सोशल साइट्समुळे तरुणांना त्यांची फॅशन फिरवायला अवकाश मिळाला. पुण्यामधली आपली मैत्रीण तिच्या कॉलेजमध्ये काय घालून गेली हे तिच्या नाशिकच्या मैत्रिणीला व्हॉट्सअ‍ॅप आणि फेसबुकवरच्या पोस्टमुळे पाहायला मिळत होतं. त्यामुळे एकमेकींना स्वत:ला सूट होईल अशा फॅशन ट्रिक्स वापरण्याची संधी मिळाली. 

  * कम्फर्टेबल पेहेरावामुळे वागण्या-बोलण्यात आणि एकूणच व्यक्तिमत्त्वातही आत्मविश्वास येतो. तो आत्मविश्वास तरुणांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये प्रामुख्यानं दिसला. 

  तरुणींच्या फॅशन्समध्ये इन काय होतं?

  * बोहेमियन टॉप्स, क्रॉप टॉप्स याला मुलींनी विशेष पसंती दिली. वरवर ढगळे दिसणारे हे टॉप्स आॅफ शोल्डरमध्येही मिळत असल्यानं हे घालून अधिक फॅशनेबल दिसण्याचा पर्यायही मुलींना मिळाला. 

  * फ्रॉॅक्स, जिप्सी, डेनिम स्कर्ट आणि त्यावर टाइट फिट किंवा ढगळे टॉप्स यालाही मुलींनी पसंती दिली. 

  * टाइट फिटची छुट्टी करून रेग्युलर साइजचे, लार्ज स्कर्ट, घेरदार डे्रसेस, घेरदार फ्रॉक्स, पार्टी गाऊन्स, घेरदार वनपीस यांना पसंती.

  * कम्फर्टेबलला प्रामुख्यानं पसंती असल्यामुळे मुलींनी जे निवडलं त्यात प्रत्येक साइजची मुलगी छान दिसू शकत होती.

  तरुणांनी फॅशन म्हणून काय मिरवलं?

  * तरुणांनी कॉलेजमध्ये आणि कॉलेजच्या बाहेरही चौकटीचे, रेघाळे शर्ट घालून, तर कधी टी-शटर््स तर कधी कॅज्युअल जॅकेट घालून कधी फॉर्मल तर कधी इनफॉर्मल दिसण्याचा प्रयत्न केला. पॅण्ट्समध्ये जर्गर, चीनोन (कॅज्युअल पॅण्ट) जॉगर्स जीन्स वापरून पाहिल्या.

  * शर्ट पॅण्ट्स निवडताना कॅज्युअल तेच स्टायलिश कसं दिसेल हे शोधण्याचा प्रयत्न केला. 

  कानात-गळ्यात काय चमकलं?

  * कॉलेजमधल्या मुलामुलींनी यंदा हातात घड्याळापेक्षाही फिटनेस बॅण्ड घालायला पसंती दिली. फिटनेस बॅण्ड हा एकाच वेळी घड्याळाचं, मोबाइल रिसीव्हरचं आणि आरोग्याच्या दृष्टीनं अ‍ॅलर्ट करण्याचं काम करतो. वेगवेगळ्या कलर आणि डिझाइनच्या कॉम्बिनेशनमध्ये मिळणाऱ्या फिटनेस बॅण्डला विशेष पसंती होती.

  * हातात नुसते फिटनेस बॅण्ड न घालता मुलामुलींनी त्यांना सूट होईल असे आणि आवडतील असे ब्रेसलेट्सही घातले. फिटनेस बॅण्ड विथ ब्रेसलेट्स ही स्टाइल यंदा खास होती.

  * हायहिल्सपेक्षा कम्फर्ट फील देणारे शूज यंदा एकदम फेव्हरेट होते. 

  * चष्मा हा तसा अडचणीचा वाटणारा मुद्दा. पण चष्म्यालाही तरुणांनी फॅशनच्या जगात नेऊन ठेवल्यामुळे नंबरचा चष्मा नसला तरी झिरो नंबरचे चष्मे, थीक फ्रेम्स, प्रोफेसर चष्मा आणि गांधी ग्लासेसच्या स्टाइलमध्ये वापरले. 

  * ब्लॅक चोपर रिंग्ज, चेन विथ स्मॉल पेडण्ट हे नाजूकसाजूक यंदाही फॅशनच्या जगात होतंच.

  फॅशन इन कंटिन्यूटी

  २०१६ मध्ये २०१५ ची फॅशनही कंटिन्यू झाली. कम्फर्ट आणि स्टाइल याचा विचार करून मुलींनी पलाजोचा जुना टे्रण्ड वर्षभर वागवला. पलाजोवर लूज टॉप, आॅफ शोल्डर टॉप, टाइट टॉप आणि हिल्स घालून मुलींनी स्टायलिश दिसण्याचा प्रयत्न केला. बॉटमला पलासो लूक असलेले जम्प सूट कॉलेजच्या विशेष दिवशी आणि पार्टीच्या ठिकाणी मुलींनी प्रामुख्यानं घातले. हे सारं २०१७ च्या दिशेनंही बऱ्यापैकी पुढे सरकेल असं दिसतं.

  ( शब्दांकन- माधुरी पेठकर)

महत्वाच्या आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लोकमत अॅप: Android | IOS

महत्वाच्या बातम्या