पैशाचं नवं गणित

By admin | Published: November 17, 2016 05:10 PM2016-11-17T17:10:58+5:302016-11-17T17:10:58+5:30

नोटाबंदी विषयावर वाद घातला असेल तुम्ही, पण व्यक्तिगत आयुष्यात तुम्हाला तुमच्या पैशाचं नियोजन करता येतं का? आपला पैसा कसा वाढेल, यासाठीची अर्थसाक्षरता आहे तुमच्याकडे? ती नसेल, तर वेळीच शिकून घ्या..

New money calculation of money | पैशाचं नवं गणित

पैशाचं नवं गणित

Next
- पी.व्ही. सुब्रमण्यम

स्मार्ट असाल तर पैशाचं नियोजन शिकून घ्या, तुम्हीही श्रीमंत होऊ शकाल!

हजार-पाचशेच्या नोटाबंदीवर एव्हाना यथेच्छ चर्चा तुम्ही केली असेल, फॉरवर्ड करकरत सोशल मीडियावर वाद घातले असतील..
ते ठीक आहे, मात्र ते करताना निदान यानिमित्तानं तरी तुम्ही स्वत:च्या बचत आणि गुंतवणुकीच्या सवयी तपासून पाहिल्या आहेत का?
निदान त्यातल्या काही बेसिक गोष्टी तरी तुम्हाला माहिती आहेत का?
तुम्ही विशीत असाल, तर देशाच्या अर्थव्यवस्थेवर ठाम चर्चा करताना निदान पर्सनल फायनान्स म्हणजेच व्यक्तिगत आर्थिक जीवनातल्या काही गोष्टी तरी माहिती असाव्यात आणि त्या आचरणात आणायचा प्रयत्नही तुम्ही करायला हवा.
कारण हेच वय असं असतं ज्या काळात तरुण मुलांवर जबाबदाऱ्या कमी असतात. खर्चाच्या वाटा कमी असतात. घराची जबाबदारी नसते किंवा अनेकांवर कमी असते.
नवीन नोकरी असते, हातात नव्यानं पैसा येऊ लागलेला असतो.
पण त्या पैशाचं रोप नीट वाढीस लावण्याचं प्रशिक्षण मात्र नसतं. त्यामुळे पाच आकडी पगार घेणाऱ्यांनाही अनेकदा आपल्या पैशाचं नियोजन नीट करता येत नाही. त्यामुळे पैसा खर्च होतो, बॅँकेत पडून राहतो आणि गरजेच्या वेळी हाताशी उपलब्ध नसतो.
आपल्या पैशानं आपल्याला स्वयंपूर्ण बनवावं असं वाटत असेल तर त्यासाठी हे काही नियम लक्षात ठेवा..
आणि मनापासून ते तंतोतंत पाळा..
या चांगल्या सवयी आणि अत्यंत बेसिक माहिती अंगीकारली तर तुमचाही पैसा वाढीस नक्की लागेल..
तुम्ही स्मार्ट असाल, तर श्रीमंत नक्की व्हाल..

१) बचत करणं ही चांगलीच सवय आहे. पण तुम्हाला श्रीमंत व्हायचं असेल तर बचतीपेक्षाही तुम्ही गुंतवणूक जास्त केली पाहिजे. बचत करणं ही एक पारंपरिक चांगली सवय आहे, मात्र गुंतवणूक करण्याची सवय शिकून घ्यायला पाहिजे. ती सवय हाताला आणि मेंदूला लागली तर आर्थिक स्वातंत्र्याच्या दिशेनं ते तुमचं पहिलं पाऊल असेल.
२) तुमची जी टेक होम सॅलरी असेल, म्हणजे दरमहा जेवढा निव्वळ पगार तुमच्या हातात पडतो त्यातून किमान २० ते ३० टक्के बचत तुम्ही करायला हवी. पण या काळात तुम्ही आईबाबांच्या घरात राहताय, फार काही खर्च नाहीत म्हणजे घरभाडं, घरखर्च इत्यादि. तसं असेल तर या काळात तुम्ही जास्तीत जास्त बचत करायला हवी. कारण ते शक्य आहे.
३) मनी मॅनेजमेण्ट नावाची एक गोष्ट असते. बिझनेस मॅनजमेण्ट ते अर्थशास्त्र हे सारं शिकणाऱ्या अनेकांना व्यक्तिगत आयुष्यात ते जमत नाही. त्यामुळे पैशाचं व्यवस्थापन शिका. समभागातली गुंतवणूक, दीर्घकालीन गुंतवणूक, चक्रव्याढ व्याजाचं वाढतं गणित हे सारं शिकून घ्या.
४) दीर्घकालीन गुंतवणुकीत मोठा आनंद असतो. पैसा वाढीस लावता आला पाहिजे, त्यासाठी तुमच्यासाठीच्या योग्य योजना समजून घ्या. अभ्यास करा.
५) घरच्यांना सांगा की, लग्न करू. आनंदानं करू, पण त्यावर भरमसाठ पैसा खर्च करणार नाही. त्या पैशाचं भविष्यासाठी योग्य नियोजन करू. 
६) लग्न करतानाही पैशासंदर्भात आपले विचार जमतात का, हे ताडून पहा.
७) पैशासंदर्भात शिकायचं कसं, योजना कशा समजून घ्यायचा असा प्रश्न एव्हाना तुम्हाला पडला असेल तर त्यासाठी मदतीला इंटरनेट आहे. ते वापरा. अनेक साइट्स पर्सनल फायनान्सची माहिती देतात, त्या पाहा. Khan Academy, Coursera यासारख्या साइट्स सुरुवातीला भेट देऊन, विषय समजून घ्या.
८) तुम्ही जे काम करता आहात, त्यातलं शिक्षण घेत राहा. लोकांना सेवा देताना ती अशी द्या की, तुमच्या क्षेत्रात तुम्ही जोडलेली माणसं हीदेखील तुमची गुंतवणूक ठरेल. तुमचं काम हीदेखील तुमची ओळख आणि गुंतवणूक असेल. त्यामुळे माणसांशी चांगलं वागणं हीदेखील एक दीर्घकालीन गुंतवणूक आहे.
९) आॅनलाइन व्यवहार कसे करतात ते शिकून घ्या. ईएमआय, फोन बिल, वीज बिल, एसआयपी हे सारं आॅटोमॅटिक खात्यातून जाईल असं पाहा. त्यासाठीचा सेटअप लावा. म्हणजे आॅनलाइन व्यवहारांची भीती कमी होईल. ते कसे करतात हे कळेल.
१०) तुमच्या सेव्हिंग अकाउण्टमध्ये फार पैसे न ठेवता ते इनव्हेस्टमेण्ट अकाउण्टला आॅनलाइन शिफ्ट करा. त्याची योग्य गुंतवणूक करा.
११) आपले उत्पन्न कर कमी करा, त्यासाठीची योग्य गुंतवणूक करा. 
१२) मुख्य म्हणजे ज्यांची गरज नाही, त्या वस्तूंवर खर्च कमी करा. त्यासाठी असं काही मन मारावं लागत नाही.
१३) मित्रांना इम्प्रेस करायचं, स्टेटस म्हणून, हौस म्हणून महागडे कपडे, वस्तू खरेदी करू नका. ते पैसे वाचवा.
१४) मेडिकल इन्शुरन्स करून घ्या. तो दरवर्षी नियमित करा. योग्य जीवन विमाही करून घ्या. नियमित त्याचे हप्ते भरा.
१५) मिळतं म्हणून पर्सनल लोन घेऊ नका, हप्त्यानं वस्तू घेण्याची सवयही कमी करा. कर्ज घ्यायचंच असेल तर घरासाठी मोठं कर्ज घ्या. पण मोठं म्हणजे किती मोठं, एवढ्या मोठ्या घराची खरंच गरज आहे का, यासाठी विचार करा.
१६) हे एवढं जरी सुरुवातीला व्यक्तिगत आयुष्यात जमलं तरी श्रीमंत होण्यासह आर्थिक स्वातंत्र्याच्या दिशेनं आपण वाटचाल करू शकू.. 

- पी. व्ही. सुब्रमण्यम
(लेखक सुप्रसिद्ध आर्थिक सल्लागार आहेत.)

pvsubramanyam@gmail.com 

Web Title: New money calculation of money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.