‘त्या’ अनाथ मुलींना देवदूत तारणार काय?

 • First Published :12-January-2017 : 00:20:53

 • लोकमत मदतीचा हात : आई-वडिलांचे छत्र हरपले

  इंद्रपाल कटकवार भंडारा

  वडील पुरात वाहून गेले, आई काल देवाघरी निघून गेली. आता कुणाकडे पाहून जगायचे असा निरागस व तेवढाच हृदयस्पर्शी सवाल कोवळ्या मुलींच्या डोळ्यामध्ये ज्वालासारखा धगधगत होता. ही वस्तूस्थिती आहे. भंडारा तालुकयातील पिंडकेपार (टोली) येथील जयश्री आणि ज्योती यांची आई वडीलांचे छत्र हरपलेल्या या दोन्ही अनाथ मुलींना कुणी देवदूत तारणार काय? दानशुर समोर येणार काय? असा प्रश्न निरुत्तरीत आहे.

  जीवनात वास्तव काय असते याची अनुभूती ही दोन्ही मुली अनुभवत आहे. जयश्री १३ वर्षांची तर ज्योती ९ वर्षांची आहे. पिंडकेपार टोली येथे चंद्रमोती झोपडीत राहणारे चांदेकर कुटूंबीय. शंकर दलपत चांदेकर असे घरमालकाचे नाव.

  १३ आॅगस्ट २०१३ ची गोष्ट. नित्यनियमाप्रमाणे शंकर हा रिक्क्षा घेवून भंडाऱ्याला आले. रात्री ८ वाजताच्या सुमारास परत येत असताना गणेशपूर पिंडकेपार पुलावर पाच फुट पाणी होते. रिक्क्षा घेवून पुल ओलांडू शकत नाही म्हणून पायी निघाले. पाण्याचा प्रवाह व अचाक वाढल्याने शंकर चांदेवार वाहून गेले. तीन दिवसांनी मृतदेह आढळला. घरचा कमावता आधार पुरुष अकस्मात निघून गेला.

  दोन मुलींच्या पालनपोषणाची जबाबदारी मृतक शंकर यांच्या पत्नी उर्मिला यांच्यावर आली. मोलमजूरी करुन उदरनिर्वाह सुरु होता. मात्र नियतीला कदाचित हेही मान्य नसावे ज्या मंगहवारी १३ आॅगस्ट २०१३ दिवशी बाबा गेले तोच मंगळवार दिवस या दोन्ही बहिणीसाठी काळा दिवस ठरला. उर्मिला शंकर चांदेकर याचा काल मंगळवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास हृदयविकाराने मृत्यू झाला. अठराविश्व दारिद्रय असलेल्या चंद्रमोळी झोपडीत पुन्हा डोंगर कोसळला.

  जयश्री ही बेला येथील सावित्रीबाई फुले विद्यालयात आठव्या वर्गात तर ज्योती ही पिंडकेपार येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दुसऱ्या इयत्तेत शिक्षण घेत आहेत. दोन वेळी पोट कसे भरायचे असा यक्ष प्रश्न उभा असतांना शिक्षण, भावी आयुष्य जगायचे कसे हा प्रश्न निरुत्तरीत आहे.

  दानशूर मिळेल का?

  कुणी दानशुर व्यक्ती, स्वयंसेवा संस्था, संघटनानी यासाठी पुढे येण्याची गरज आहे. ज्या दानशुरांना या अनाथ मुलींची मदत करायची असेल त्यासाठी खालील दिलेल्या बँकेच्या शाखेत मदत दिली जावू शकते. जयश्रीचे बँक आॅफ महाराष्ट्र गणेशपूर शाखेत खाते असून खाता क्रमांक (६०१४७४०७२२८) असा आहे.

महत्वाच्या आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लोकमत अॅप: Android | IOS
vastushastra
aadhyatma