वासरांची अवैध वाहतूक दोन आरोपी अटकेत

  • First Published :17-February-2017 : 00:16:45

  • पारोळ : वज्रेश्वरी रोडवरून शिरसाडच्या दिशेने वासरांची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली. तसेच ही वासरे गोरक्षण संस्थेच्या स्वाधीन केली. ही वाहतूक होणार असल्याची माहिती मिळताच बजरंग दल, विश्व हिंदू परिषद व भारतीय गोवंश रक्षण संवर्धन परिषदेच्या कार्यकर्त्यांनी मांडवी पोलिसांना दिली. त्यानुसार सापळा लाऊन तपासणी केली असता या टेम्पोत विना परवाना सहा वासरे आढळून आली.

    पोलिसांनी वाहन जप्त करून चालक सचिन जनार्दन नाईक २८ रा. भुईगाव, निर्मळ, वसई पश्चिम व पांडू माया भोईर ५० रा. गायगोठा, निंबवली, गणेशपुरी यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले.

    ही वासरे शहापूर, खर्डी या भागातून वाहनात भरून नालासोपारा पश्चिमेतील वाझा मोहल्ल्यामधील शरीफ काझी व नाझीर शेख यांच्याकडे पोहचविण्यात येणार होती. अशी माहिती पोलिसांना चौकशी दरम्यान मिळाली. पोलिसांनी ही वासरे सकवार येथील जीवदया मंडळाच्या गोशाळेत दिली असून या दोन आरोपींवर गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरु केला आहे.

महत्वाच्या आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लोकमत अॅप: Android | IOS