‘समाजसेवेमध्ये पत्रकारिता महत्वाची’

  • First Published :10-January-2017 : 05:41:33

  • विक्रमगड : समाजातील दुर्बल घटकांना, सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणे, आपल्या लेखणीच्या माध्यमातून अडचणी सोडवण्याचे महत्वाचे काम लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असणारे पत्रकार करीत असल्याने समाजसेवेमध्ये पत्रकाराचा मोलाचा वाटा असल्याचे मत श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांनी ‘राजकीय पक्ष व त्यांच्या माध्यमांकडून अपेक्षा’ या चर्चासत्रात मांडले.

    पत्रकारदिनी मराठी पत्रकार परिषद पालघर जिल्हाशाखेने विक्रमगड तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुकसाळे या ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाची सुरुवात दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन करण्यात आली. या चर्चासत्रात भाजपाचे प्रदेश प्रतिनिधी बाबजी काठोळे,राष्ट्रवादीचे पालघर जिल्हाध्यक्ष सुनील भुसारा, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख उत्तम पिंपळे, भाजपा युवामोर्चा पालघर जिल्हाध्यक्ष सुशील औसरकर आदी राजकीय प्रतिनिधिंनी सहभाग घेतला होता तसेच मराठी पत्रकार परिषद पालघर जिल्हाशाखेचे जिल्हाधक्ष संजीव जोशी यांनी संघटनेच्या वतीने पत्रकारांना वृत्तसंकलन करताना येणाऱ्या अडचणींच्या निराकरणाबद्दल मार्गदर्शन केले तर सूत्रसंचालन मराठी पत्रकार परिषद पालघर जिल्हाशाखेचे कार्याध्यक्ष हर्षद पाटील यांनी केले.

    या कार्यक्रमास परिषदेचे माजी जिल्हाध्यक्ष दीपक मोहिते, वाडा पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक पाटील, कोकण विभाग पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष जयेश शेलार उपाध्यक्ष ओमकार पोटे यासह पत्रकार संघटनेचे पदाधिकारी व पत्रकार उपस्थित होते. या शिवाय गावातील अनेक मान्यवरही उपस्थित होते. (वार्ताहर)महत्वाच्या आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लोकमत अॅप: Android | IOS