फिर रंग बदलती दुनिया है..

 • First Published :15-May-2017 : 10:32:57

 •  शुभा प्रभू-साटम

  जुनं सुटत नाही, नवं धरवत नाही या द्विधेतली कसरत चाललेल्या घरा-मनात

  माझं पूर्ण आयुष्य शिस्तबद्ध आहे. सगळं कसं वेळच्या वेळी आणि जिथल्या तिथं लागतं मला’ असं अनेक जण बोलताना ऐकलं असेल. घड्याळ्याच्या काट्याप्रमाणे माझा दिनक्रम असतो असंही अनेकजण अभिमानानं सांगतात. पण असा अलौकिक रेखीव दिनक्रम रोज त्याच कडक चौकटीत पार पाडणं खरंच कंटाळवाणं होत नसेल का? 
   
  आयुष्याला, कामाला शिस्त हवीच, पण ती शिस्त लवचिकही हवी. 
  हल्ली नव्या शोधांमुळे परंपरागत जुन्या समजुतीच्या चौकटी बदलत आहेत. रोजच्या रुटीनमध्ये, दैनंदिन चाकोरीबद्ध आयुष्यात बदल करावा हा एक नवा विचार रूढ होतो आहे. खरंतर हा विचार आयुष्य खूप सोपं करणारा आहे. आहे ते स्वीकारावं आणि पुढे चालावं. यात कुठे आली शिस्त आणि नियमांची चौकट. पण तरीही आयुष्य रोचक करणारं खूप काही आहे या विचारात. 
  परिवर्तन हे चिरंतन आहे आणि ते स्वीकारावं लागतं हे जेवढं खरं आहे तितकंच ठरावीक चौकट मोडणं पण गरजेचं आहे. इथे चौकट मोडावी म्हणजे नियम/ कायदा तोडणं हे नसून बदल घडवणं अभिप्रेत आहे. 
   
  साधं उदाहरण घेऊयात, पाऊस यायला झालाय. अनेकदा पाऊस बेसावध गाठतो आणि पावसाचा एखादा थेंब जरी अंगावर पडला तरी काही भयंकर होईल अशा तऱ्हेनं माणसं पळापळ करतात, आडोशाला जातात. छत्र्या उघडतात. अशावेळी आपण ठरवून भिजायचं. छत्री बॅगेत जरी असली तरी उघडायची नाही आणि मस्त चालत राहायचं. गाडीत असलो तर तातडीनं खिडकी बंद न करता पावसाचे तुषार झेलून घ्यायचे. घरात, आॅफिसात असलो तर हात बाहेर काढून ओंजळीत ते पाणी टिपायचं. एकदम ताजं वाटतं पाहा.
   
  कामावर जाताना-येताना हल्ली हेडफोन्स कानात कोंबून झापडं लावून अनेक जण गाडीत, रेल्वेत, बसमध्ये किंवा सार्वजनिक ठिकाणी बसतात. पण ठरवून एखाद दिवस मोबाइल बाहेर काढायचाच नाही. आजूबाजूला बघायचं. बाजूच्या प्रवाशाला मस्त स्माइल द्यायचं, त्याच्याशी चार गोष्टी आपणहून बोलायला सुरुवात करायची. कचेरीतील लिफ्टमन, वॉचमनला काय कसं काय हे विचारायचं. आपलं काम चोख करायचं पण कामाचा ताण घेऊन नाही, तर मस्त एखादं गाणं गुणगुणत. प्रत्येक कामात सतत जी घाई आपल्यामागे लागलेली असते ना ती विसरण्याचा प्रयत्न करायचा. 
   
  लंचटाइममध्ये रोजचा भाजी-पोळीचा डबा न नेता नाक, डोळे गाळत सू सू करत तिखट चटकदार पाणीपुरी हादडायची. वेडेवाकडे चेहरे करून स्वत:चा एखादा सेल्फी काढायचा. कोणाला पाठवायचा नाही पण आपला आपण पाहून हसायचं. अशा चौकटीबाहेरच्या जगण्याला हरकत कशाला असावी?
  थोडक्यात काय की वेड्यासारखं वागायचं. तुम्ही कधी भूभूला खेळताना पाहिलं का? किती छान उड्या मारत फिरत असतात. अगदी पट्ट्याला बांधलेले असले तरीही सतत कुतूहलानं आजूबाजूला बघत असतात. तस्सच वागायचं. आईबाबांच्या खांद्यावर मान टेकवलेलं बाळं असतं पाहा. टुकटुक विस्फारलेल्या नजरेनं आजूबाजूला पाहणारं.. अगदी तस्संच आपणही पाहायचं. फार कठीण नाहीये ते. 
   
  आपल्या आॅफिसची वा सोसायटीची लिफ्ट. रोज चढ-उतार करतो त्यातून. पण ती नक्की कशी चालते हे आपल्याला माहीतच नसतं. विचारच केलेला नसतो कधी. आपल्या दरवाज्याचं लॅच, आपला फ्रीज, गॅस, ओव्हन, एवढंच काय अगदी गीझरसुद्धा नव्या कुतूहलानं पाहायचं. आपल्याला त्यामागचं विज्ञान जाणून घ्यायचं नाहीये की अभ्यास करायचा नाही, तर नुसतं ते पाहून अचंबित व्हायचं आहे. 
   
  झापड लावून चालण्यापेक्षा या कुतूहलाच्या नजरेत वेगळीच मजा आहे. कोसळणारा पाऊस, खटका दाबताक्षणी अंधार पळवणारी ट्यूब, हवं ते गाणी ऐकवणारा डेक, हवं त्याच्याशी बोलायला देणारा फोन हे नीरस, रोजचंच असं न वाटता सगळं सगळं अद्भुत वाटू लागेल. आपल्या उनाड दिवसातील एक अजब गजब गोष्ट. एवढं सगळं का करायचं असा प्रश्न असेल तर उत्तर सोप्पंय अगदी.. ‘अस्सच.. उगाच वाटलं म्हणून... कधी तरी करून पाहा तरी... नेहमीचं कृष्णधवल आयुष्य एकदम कॅलिडोस्कोपिक होईल!

   

  (लेखिका मुक्त पत्रकार असून, स्त्रीमुक्ती चळवळीत कार्यरत आहेत.shubhaprabhusatam@gmail.com ) महत्वाच्या आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लोकमत अॅप: Android | IOS