आई-वडिलांची साक्ष अन् मुलाला शिक्षा

By admin | Published: August 26, 2015 01:45 AM2015-08-26T01:45:01+5:302015-08-26T01:45:01+5:30

दुचाकी चोरीप्रकरणी एक महिन्याचा कारावास, नाही तर पाच हजार रुपये दंड.

Parental testimony and child education | आई-वडिलांची साक्ष अन् मुलाला शिक्षा

आई-वडिलांची साक्ष अन् मुलाला शिक्षा

Next

अकोला : मुलाच्या हातून घडलेला गुन्हा लपविण्यासाठी किंवा त्याला वाचविण्यासाठी आई-वडील नेहमीच जिवाचा आटापिटा करीत असल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत; मात्र दुचाकी चोरणार्‍या आपल्या मुलाला शिक्षा व्हावी म्हणून आई-वडिलांनीच त्याच्याविरोधात न्यायालयात साक्ष दिल्यानंतर सदर दुचाकी चोरणार्‍या मुलास प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी गजाला-अल-अमुदी यांच्या न्यायालयाने पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. आरोपीने दंड न भरल्यास त्याला एका महिन्याच्या कारावासाची शिक्षा देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. कीर्ती नगर येथील रहिवासी ज्ञानदेवराव बाजड यांना दोन मुले असून, मोठा मुलगा लक्ष्मीकांत याचा विवाह झाला आहे, तर लहान मुलगा गजानन हा नेहमी आजारी असतो. गजानन बाजड याच्या आजारावर होणार्‍या खर्चाला त्याचा भाऊ लक्ष्मीकांत व त्याची पत्नी या दोघांचा विरोध होता. या कारणावरून ज्ञानदेवराव बाजड व त्यांच्या मोठय़ा मुलामध्ये नेहमीच वाद होत होते. त्यामुळे ज्ञानदेवराव बाजड हे मुलगा गजानन व पत्नीला घेऊन अंजनगाव सूर्जी येथे निघून गेले होते. येथे जाण्यापूर्वी त्यांनी त्यांची एम एच ३0 एम ८११0 क्रमांकाची दुचाकी कीर्ती नगरमधील निवासस्थानी व्यवस्थित ठेवली होती. ९ नोव्हेंबर २00९ रोजी ज्ञानदेवराव पत्नी व मुलाला घेऊन घरी परत आले असता त्यांची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरल्याचे समोर आले होते. या प्रकरणी त्यांनी खदान पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून खदान पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध कलम ३७९ नुसार गुन्हा दाखल केला. त्यानंतर चोरट्याचा शोध सुरू केला असता ही दुचाकी ज्ञानदेवराव यांचा मुलगा लक्ष्मीकांत यानेच चोरी केल्याचे तपासात समोर आले. पोलिसांनी लक्ष्मीकांत याच्याजवळून दुचाकी जप्त करून सुपूर्द केली. या प्रकरणी न्यायालयामध्ये सुनावणी सुरू झाल्यानंतर लक्ष्मीकांत बाजड याच्या आई-वडिलांनी प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी गजाला-अल-अमुदी यांच्या न्यायालयासमोर मुलाच्या विरोधात साक्ष दिल्यानंतर न्यायालयाने आरोपीस पाच हजार रुपयांचा दंड ठोठवला. आरोपीने दंड न भरल्यास त्याला एका महिन्याच्या कारावासाची शिक्षा न्यायालयाने सुनावली. या प्रकरणी सरकार पक्षातर्फे अँड. पंकज महाले व अँड. करुणा महाजन यांनी कामकाज पाहिले.

Web Title: Parental testimony and child education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.