काय हरकत आहे?

 • First Published :02-July-2014 : 16:40:42

 • - तेर पॉलिसी सेंटर 
   
  पर्यावरण वाचवा ही हाकाटी सध्या रोज कानावर पडते. घरात बसून, बाहेर पडल्यावर चारचौघात वावरताना पर्यावरण वाचवण्याचे कोरडे उपदेश तर किती जण रोज करत असतात.  
  फक्त बोलून, ओरडून, उपदेश करून पर्यावरण वाचणार नाही हे माहीत असूनही फक्त एवढंच केलं जातं. पर्यावरण वाचवायचं म्हणजे नेहमी समोरच्यानं किंवा दुसर्‍यांनीच बदलायची अपेक्षा का केली जाते?
  खरंतर पर्यावरण वाचवण्याचा सोपा मार्ग प्रत्येकातून जातो. फक्त त्याकडे आपण दुर्लक्ष करतो इतकंच.
  पर्यावरणाचा प्रश्न आज सर्वच बाजूंनी गंभीर झाला आहे, गुंतागुंतीचा बनला आहे. पण झोपेतून उठल्यापासून झोपेपर्यंत जर आपण एक एक पाऊल पर्यावरणाचा विचार करून उचललं तर मात्र पर्यावरणाच्या प्रश्नाचा गुंता एक एक करून सुटू शकतो. पर्यावरणाच्या प्रश्नांचा गुंता सोडवण्याआधी काही प्रश्न स्वत:ला विचारले तर या प्रश्नाचं अर्ध उत्तर तुम्हाला लगेच मिळेल. 
   
  -  तुम्ही राहता त्या इमारतीत भलेही तुमच्या सोयीसाठी लिफ्ट असेल; पण दिवसातून एकदा तरी लिफ्ट टाळून पायर्‍या चढा-उतरायला काय हरकत आहे?
   
  - फळवाला-भाजीवाला- किराणा दुकानदार उदार अंत:करणानं प्लॅस्टिकची पिशवी देतो. पण आपण तिला नाही म्हणायला काय हरकत आहे?
   
  - घरापासून अध्र्या किलोमीटर जायचं आहे. ते अंतर वाहन टाळून चालत कापायला काय हरकत  आहे?
   
  - बाहेर पडलं, दुकानात, मॉलमध्ये गेलं की खरेदी ही होणारंच हे गृहीत धरूनच सोबत कापडी पिशवी ठेवायला काय हरकत आहे? 
   
  - आवारात झाडांचा पालापाचोळा पडतो म्हणून तो जाळून धूर करण्यापेक्षा त्याचं कंपोस्ट खत करायला काय हरकत आहे? 
   
  - मोटार धुण्यास पाच लिटर पाणी सहज पुरतं तेवढंच पाणी वापरण्यास काय हरकत आहे?
   
  -  घरात जाड-जाड पडद्यांनी सजावट करायची आणि भर दिवसा अंधार पडतो, गरम होतं म्हणून दिवे आणि एसी लावायचे. त्यापेक्षा घरात नैसर्गिक उजेड आणि वारा यायला जागा ठेवली तर?
   
  - भाजीपाला, स्वयंपाक यातून तयार होणारा विघटनशील कचरा कचरा पेटीत न टाकता आपल्याच बागेतील झाडांसाठी वापरला तर?  
   
  -  आता शेतीयोग्य जमीन कमी होतेय. घरच्याघरी आपल्या कुटुंबासाठी टोमॅटो, लिंबं, मिरच्या, कोथिंबीर असं काहीबाही पिकवलं तर?
   
  -  नको असलेलं झाडं तोडून मोकळं होण्यापेक्षा त्या जागी नवीन झाड लावलं तर? 
   
  -  खूप पाणी पिणारी झाडं, हिरवळ लावण्यापेक्षा आपल्या बाल्कनीत फुलपाखरं, पक्ष्यांना बोलावणारी झाडं लावली, जलसंचय करणारी आणि आता नामशेष होणारी  वड, पिंपळ, करंज, उंबर अशी  झाडं लावली तर?
   
  -  जरुरीपेक्षा जास्त वस्तू खरेदी करण्यापेक्षा आपल्या घरातून अन्नाचा एकही  कण वाया जायला नको याची काळजी घेण्यास काय हरकत आहे?
   
  -  आपल्या मुलांना लहानपणापासून निसर्ग नवलाईची ओळख करून देण्यास, त्यांच्यामध्ये पर्यावरण संवर्धनाच्या सवयी रुजवण्यात, आपल्या अन्नसाखळीचा आदर त्यांच्यात निर्माण करण्यात काय हरकत आहे?
   
  -  फिरायचं म्हणून फिरण्यापेक्षा जरा एथिकल टुरिझम, ट्रेकिंग करायला काय हरकत आहे?
   
  - सहलीला गेल्यावर तिथल्या पर्यावरणाला त्रास  होणार नाही याची दक्षता आवर्जून घेतली तर काय हरकत आहे?   
   
  -  अमुक तमुक सणाला- व्रताला झाडांची पानं फांद्या तोडण्यापेक्षा सण-व्रत आणि पर्यावरणाची सांगड घालायला काय हरकत आहे?
   
  -  दुचाकी-चारचाकी आवड, गरज म्हणून वापरतो तर मग त्याची  वेळच्या वेळी देखभाल करण्यास काय हरकत आहे? 
   
  -  भरमसाट पाणी वापरण्याची सवय मोडून महिनाभरात किमान १0 टक्के पाणी वाचवेन, असा निश्‍चय करून त्याप्रमाणे वागण्यास, पाण्याचा पुनर्वापर करण्यास काय हरकत आहे? 
   
  - जलसंधारण हा फक्त सरकारचा विषय नसून शक्य असल्यास जलसंधारणाचे छोटे छोटे प्रयोग आपल्या घराजवळच करता येतील का, असा विचार करण्यास काय हरकत आहे?
   
  - आठवड्यातून, महिन्यातून एक दिवस वाहनाला, आठवडा-महिनाभरातून एकदा तासभर घरातली वीज बंद ठेवायला काय हरकत आहे? ऊर्जाबचतीच्या साधनांचाच वापर करायचा हा आग्रह धरण्यास काय हरकत आहे?  


महत्वाच्या आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लोकमत अॅप: Android | IOS