श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टेस्टआधी टीम इंडियाला धक्का, लोकेश राहुल बाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2017 06:29 PM2017-07-24T18:29:30+5:302017-07-24T18:29:30+5:30

भारतीय क्रिकेट संघ तीन कसोटी, पाच एकदिवसीय आणि एका टी-20 सामन्यासाठी श्रीलंकेमध्ये आहे. मात्र श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टेस्टआधीच टीम इंडियाला धक्का

Lokesh Rahul was out in the first match against Sri Lanka | श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टेस्टआधी टीम इंडियाला धक्का, लोकेश राहुल बाहेर

श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टेस्टआधी टीम इंडियाला धक्का, लोकेश राहुल बाहेर

Next

ऑनलाइन लोकमत

कोलंबो, दि. 24 - भारतीय क्रिकेट संघ तीन कसोटी, पाच एकदिवसीय आणि एका टी-20 सामन्यासाठी श्रीलंकेमध्ये आहे. मात्र श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टेस्टआधीच टीम इंडियाला धक्का बसला आहे. सलामीवीर लोकेश राहुल पहिल्या कसोटीमध्ये खेळू शकणार नाही. तीन महिन्यांपूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टेस्टवेळी दुखापत झाल्यामुळे राहुल आयपीएल, चॅम्पियन्स ट्रॉफी आणि वेस्ट इंडिज दौऱ्यातही खेळू शकला नव्हता. आता ताप आल्यामुळे त्याला पहिल्या सामन्याला मुकावं लागणार आहे. भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाने (बीसीसीआई) सोमवारी याबाबत माहिती दिली. 
 
26 जुलै रोजी टीम इंडियाला श्रीलंकेविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळाचा आहे.  राहुल आणि मुरली विजयच्या अनुपस्थितीत अभिनव मुकुंद आणि शिखर धवन भारताच्या डावाची सुरूवात करतील.  टेस्ट सीरिजसाठी मुरली विजयचीही निवड करण्यात आली होती. पण मनगटाची दुखापत बरी झाली नाही म्हणून शेवटच्या क्षणी त्यानं या दौऱ्यातून माघार घेतली. त्यामुळे मुरली विजयऐवजी शिखर धवनला संधी देण्यात आली आहे. 
 
श्रीलंका बोर्ड एकादशविरुद्ध झालेल्या सराव सामन्यात राहुल चांगल्या फॉर्ममध्ये होता. त्याने शानदार 54 धावा फटकावल्या होत्या. पण आता ताप आल्यामुळे तो पहिल्या सामन्यात खेळू शकणार नाही. 

भारत - श्रीलंका बोर्ड सराव सामना अनिर्णीत-
कर्णधार विराट कोहलीसह आघाडीच्या भारतीय फलंदाजांनी श्रीलंका बोर्ड एकादशविरुद्ध शनिवारी अनिर्णीत संपलेल्या दोन दिवसांच्या सराव सामन्यात जोरदार फटकेबाजी करीत ९ बाद ३१२ धावा उभारल्या.
 
शुक्रवारच्या ३ बाद १३५ वरून पुढे खेळणाऱ्या भारतीय संघासाठी कोहलीने अर्धशतक फटकाविले. मधल्या फळीतील अजिंक्य रहाणे (४०), रोहित शर्मा (३८) आणि शिखर धवन (४१) यांनीही योगदान दिले. कोहली-रहाणे यांनी शनिवारी आठ षटके खेळल्यानंतर सहकाऱ्यांना संधी दिली. कोहलीने ७८ चेंडूंत आठ चौकार, तर रहाणेने ५८ चेंडंूत तीन चौकार मारले. रोहित आणि शिखर यांनी ८० धावांची भागीदारी केली. हे दोघे १६ षटके खेळून निवृत्त झाले. चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर ब्रेक घेणाऱ्या रोहितने ४९ चेंडू खेळून एक षट्कार व चौकार मारला. शिखरने ४८ चेंडूंत सात चौकार मारले. यष्टिरक्षक रिद्धिमान साहा याने नाबाद ३६, अष्टपैलू हार्दिक पांड्या याने १३ आणि रवींद्र जडेजाने ३२ चेंडूंत १८ धावा केल्या. श्रीलंकेसाठी कुशालने १४ षटकांत ८१ धावा देत दोन गडी बाद केले. विश्वा फर्नांडो याने दोन आणि विकुम संजया यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. त्याआधी शुक्रवारी भारतीय गोलंदाजांनी लंका बोर्ड एकादश संघाला १८७ धावांत रोखले होते. यादवने ४, तर जडेजाने ३ गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक-
श्रीलंका अध्यक्ष एकादश सर्वबाद १८७ धावा. भारत ९ बाद ३१२ धावा (लोकेश राहुल ५४, विराट कोहली ५३, अजिंक्य रहाणे ४०, रोहित शर्मा ३८, शिखर धवन ४१, रिद्धिमान साहा नाबाद ३६, रवींद्र जडेजा १८. फर्नांडो २/३७, कौशल २/८१.)
 
 

Web Title: Lokesh Rahul was out in the first match against Sri Lanka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.