पॅरिसमध्ये पुन्हा दहशतवादी हल्ला, इसिसने स्वीकारली जबाबदारी

 • First Published :21-April-2017 : 10:39:01 Last Updated at: 21-April-2017 : 11:03:58

 •  ऑनलाइन लोकमत 

  पॅरिस, दि. 21 - मध्य पॅरिसमध्ये गुरुवारी रात्री झालेल्या गोळीबाराची जबाबदारी इसिसने स्वीकारली आहे. या हल्ल्यात एक फ्रेंच पोलीस अधिकारी ठार झाला असून दोन जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. फ्रान्समध्ये राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला तीन दिवस उरले असताना हा हल्ला झाला. 23 एप्रिलला फ्रान्समध्ये राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. 
   
  फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष फ्रानकोईस ओलांद यांनी हा गोळीबार  दहशतवादाचा प्रकार असल्याचे सांगितले. गोळीबार करणारा हल्लेखोर पोलिसांबरोबर झालेल्या चकमकीत ठार झाला. पॅरिसच्या चॅम्पस इलीसीस परिसरात ही गोळीबाराची घटना घडली. या भागात आर्स डी ट्रीओमफे ही प्रसिध्द वास्तू इथे नेहमीच वर्दळ आणि गर्दी असते. गोळीबाराच्या घटनेनंतर पोलिसांनी लगेच हा परिसर रिकामी केला. 
   
  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हल्लेखोरांची ओळख पटली असून, तो एकटाच होता की, आणखी कोणी त्याच्यासोबत होते या दिशेने तपास सुरु आहे. फ्रान्समध्ये धोकादायक इसम घुसल्याची माहिती मिळाल्यानंतर फ्रान्स पोलिसांनी गुरुवारी अटक वॉरंट जारी केले होते. बेल्जियमहून ट्रेनने हा इसम फ्रान्समध्ये आला होता. ठार झालेल्या हल्लेखोराचे बेल्जियम कनेक्शन तपासण्यात येत आहे.  
   
  चॅम्पस इलीसीस येथे आमच्या पोलिसांनी मोठे हत्याकांड घडू दिले नाही. त्यांनी रक्तपात रोखला असले फ्रान्सचे अंतर्गत मंत्री मॅथीयस यांनी सांगितले. रात्री नऊच्या सुमारास चॅम्पस इलीसीस येथे पोलिसांची गाडी लागलेली असताना अचानक शेजारी एक गाडी येऊन थांबली. या गाडीतून एक इसम उतरला व त्याने पोलिसांवर अंदाधुंद गोळीबार सुरु केला. यामध्ये एक पोलिस अधिकारी ठार झाला. दोन जण जखमी झाले. 


महत्वाच्या आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लोकमत अॅप: Android | IOS

महत्वाच्या बातम्या