प्रतिभेला पासपोर्टचे पंख

By admin | Published: November 5, 2016 03:50 PM2016-11-05T15:50:51+5:302016-11-05T15:50:51+5:30

भेंडे बुद्रुक, तालुका नेवासा, जिल्हा अहमदनगर.- या खेडेगावातील ती दिव्यांग तरुणी. पोलिओमुळे तिचं आयुष्यच व्हीलचेअरशी जखडलेलं आहे. बारा महिने, चोवीस तास फक्त घरात आणि घरात. आकाशात भरारी घेण्याचं स्वप्न ती पाहते आहे. त्या स्वप्नातला पहिला टप्पा ‘पार’ पडला तो एका ‘पत्रा’नं. त्याच प्रवासाची ही गोष्ट..

Passport wings to talent | प्रतिभेला पासपोर्टचे पंख

प्रतिभेला पासपोर्टचे पंख

Next
>ज्ञानेश्वर मुळे
 
तिचं पहिलं ई-पत्र मला १२ मे २०१६ या दिवशी मिळालं. त्या पत्राचा पहिला परिच्छेद असा होता : मी प्रतिभा गोरे. महाराष्ट्रात अहमदनगर जिल्ह्यात राहते. तुमचा लेख वाचून तुमच्याबरोबर बोलावं वाटलं म्हणून हे ई-मेलरूपी पत्र’. 
८ मे रोजी लोकमतमध्ये आलेला माझा लेख तिनं वाचला होता. त्यात काकू आणि तात्या यांच्या १९८५ मधल्या जपानला नेणाऱ्या विमान प्रवासाच्या वर्णनानं प्रतिभा गहिवरून गेली. तिच्या डोळ्यांत पाणी आलं. त्या लेखात काकूचा अंगठा असलेला पासपोर्ट बघून मला कसं भरून आलं याचं वर्णनही होतं. 
प्रतिभानं पुढे लिहिलं होतं, ‘मला एक गोष्ट खूप दिवसांची बोलायची होती. तुमच्या लेखाच्या शेवटच्या ओळी वाचल्या आणि मी चमकलेच. अरे, मला ज्यांच्याबरोबर बोलायचं ते तुम्हीच आहात. सर, मी ‘हॅण्डिकॅप’ आहे. पोलिओमुळे व्हीलचेअर ही माझी सगळ्यांत जवळची मैत्रीण आहे.’ 
तिनं कॉलेजमध्ये सगळ्यांत अवघड विषय म्हणून आणि सगळं जग बघता यावं म्हणून इंग्रजी विषय घेतला आणि ती एम.ए., बी.एड. झाली, हे सांगून तिनं मला सरळ प्रश्न विचारला होता, ‘नोकरी मिळेलही या डोनेशन आणि स्पर्धेच्या जगात. पण मला पासपोर्ट मिळेल का?’
प्रतिभाला प्रवासाची आवड आहे, पण सवय नाही. प्रवासात गाड्यांचा वास, धूर यामुळे सारख्या वांत्या होतात. ‘मग सर, मी पासपोर्ट कसा काढणार? मला खूप भीती वाटते. प्रवासात होणाऱ्या त्रासाची. मी बारा महिने चोवीस तास घरात असते. वर्षानुवर्षं नवीन काहीच बघत नाही. रस्त्याच्या बाजूनं असणारी झाडं, घरं, माणसं, प्राणी आणि पाखरं बघत हरखून जावं म्हटलं तर तेही नाही. माझ्या घरापासून विमानतळ एका तासाच्या अंतरावर. परदेशी जाणं सोपं आहे, पण पासपोर्ट काढणं महाकठीण. कारण ते चार तास दूर आहे. सर, तुम्ही तुमच्या लेखात म्हटलंय, की तुम्हाला पासपोर्ट त्या व्यक्तीला तिच्या दारात द्यायचाय. नका देऊ पासपोर्ट अगदी दारात, पण प्रत्येक जिल्ह्याला तर आणा, सर. सोपं होईल आणि अशा अनेक प्रतिभा आहेत त्या आपला पासपोर्ट काढू शकतील.. सर, पासपोर्ट आणि प्रतिभा यातलं अंतर कमीत कमी करा इतकंच. तो पासपोर्ट माझ्या मुक्तीचा मार्ग तेव्हाच ठरेल, जेव्हा मला परदेशी जाता येईल. पण निदान त्या मुक्तीच्या मार्गावर जाण्याचं स्वप्न बघण्याचा अधिकार मला मिळावा. माझा पासपोर्ट मला मिळावा..’
माझ्या त्या पासपोर्टविषयीच्या लेखाला भरपूर प्रतिसाद मिळाला होता. पण या प्रतिभेच्या प्रतिसादामुळे मी अंतर्बाह्य ढवळून निघालो. मी १३ मे रोजी तिच्या ई-पत्राला उत्तर दिलं. ‘तुझ्या दीर्घ, तपशीलवार पत्राबद्दल आभार. तुझ्यासारख्यांसाठी आम्ही पुरेसे प्रयत्न करत नाही याबद्दल माफी मागतो. तुझा पत्ता, दूरध्वनी क्र मांक, ई-मेल आणि वय वगैरे अन्य तपशील पाठव. मी काय करता येईल ते पाहतो. तुझ्या साहसाचं आणि चिकाटीचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. आशा सोडू नकोस आणि तुझे प्रयत्नही. शुभेच्छा.’
लगोलग मी तिचं ई-पत्र आमचे पुण्याचे पासपोर्ट अधिकारी अतुल गोतसुर्वे यांना पाठवलं आणि ते वाचून ताबडतोब फोनवर बोल असं सांगितलं. १३ तारखेला लगेच प्रतिभाचा सर्व तपशील आला. गाव भेंडे बुद्रुक, तालुका नेवासा, जिल्हा अहमदनगर. 
मनात विचार आला, अरे ज्ञानेश्वरांनी जिथं ज्ञानेश्वरी सांगितली तिथली जवळची ही प्रतिभा; हिला पंख मिळालेच पाहिजेत. 
तिच्या २३ मे च्या ई-पत्रात तिनं पुणे पासपोर्ट आॅफिसमधून अतुलचा फोन आल्याचं सांगितलं. ‘त्यांनी मला आॅनलाइन पासपोर्टचा फॉर्म भरायला सांगितलाय.’- तिच्या १६ जुलै २०१६ च्या ई-पत्रानं गोष्टी एका नव्या पातळीवर गेल्याचा अहवाल तिनं दिला. 
‘सर, अतुल गोतसुर्वे यांनी १६ आणि १७ जुलैला अहमदनगरमध्ये आयोजित केलेल्या पासपोर्ट कॅम्पमध्ये मी सहभागी झाले आणि माझी कागदपत्रं आणि बायोमेट्रिक्स दाखल केली. हे सगळं घडलं आणि मला माझा पासपोर्ट आता लवकरच मिळणार! अतुल सरांनी माझ्या सोयीनुसार सर्व व्यवस्था केली. शक्य होती ती प्रत्येक गोष्ट त्यांनी केली.’ वगैरे. 
त्याच दिवशी तिनं आणखी एक तपशीलवार ई-पत्र मला लिहिलं. त्यातलं प्रत्येक वाक्य हेलावून टाकणारं होतं. ‘आजचा दिवस मला दिल्याबद्दल मी ऋणी आहे. आता माझे विचार आणि स्वप्नं नव्या गोष्टी चितारू लागले आहेत.’ 
..आणि मग शेवटी तो दिवस आला; ज्याची मला स्वत:ला प्रतिभाच्या पहिल्या ई-पत्रापासून प्रतीक्षा होती. १२/९/२०१६. संध्याकाळी ७ वाजून ४९ मिनिटांनी प्रतिभाचा एक अत्यंत दीर्घ ई-संदेश आला. एखाद्या उत्सवाचं वर्णन असतं तसं तिने स्वत:च्या हातात पासपोर्ट आलेल्या क्षणांचं वर्णन केलं होतं.. 
‘माझा पासपोर्ट माझ्या हातात आहे यावर माझा विश्वास बसत नाहीये. ही जादू केवळ तुमच्यामुळे घडून आली. जेव्हा कधी पासपोर्टचा विचार माझ्या मनात यायचा, तेव्हा किती छोट्याशा कारणामुळे मी माझ्या अधिकारामुळे वंचित आहे हा प्रश्न मला सतावायचा. किती छोटंसं पुस्तक (पासपोर्ट) आहे हे, पण याचा एक कटाक्षच पुरेसा आहे की माझा संपूर्ण देश माझ्या पाठीशी आहे. कारण माझ्या देशाच्या माननीय राष्ट्रपतींनी हे स्वत: पासपोर्टमध्ये स्पष्ट केलं आहे. कोण म्हणतं की पुस्तकं बोलत नाहीत? माझं हे छोटंसं पारपत्र किती अर्थपूर्ण बोलत आहे आणि त्याच्या रूपात जणू माझा भारत देशच माझ्या बरोबर संवाद साधतो आहे. तो शब्दांत सांगणं हा खूप आनंददायी अनुभव आहे.’
 
सोबत प्रतिभानं एक सुंदर कविताही लिहून पाठवली होती. तिची स्वत:ची.. 
 
लक्षात ठेव
मी फक्त पारपत्रच नाही तुझं
मी तुझा अभिमान आहे
मी तुझा मान आहे
तुझे शब्द, तुझे कटाक्ष
तुझे संस्कार, तुझे भान
हे सगळेच, माझी ओळख आहे
माझा मान, तुझा मान
एक आहे तू माझेच 
इटुकले रोप आहे..
 
प्रतिभेला आता पासपोर्टचे पंख मिळालेत. तिला अडवू शकणारी शक्ती आता या जगात तरी अस्तित्वात नाही. 
 
(लेखक भारतीय परराष्ट्रसेवेतील वरिष्ठ अधिकारी आहेत.)

Web Title: Passport wings to talent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.