पाच गावांत शिरले बारवी धरणाचे पाणी

By admin | Published: August 8, 2016 02:19 AM2016-08-08T02:19:41+5:302016-08-08T02:19:41+5:30

गेल्या आठवड्यातील पावसाने बारवी धरणाच्या पाण्याची पातळी वाढल्याने तोंडली, काचकोळी, जांभूळवाडी, मार्गवाडी, देववाडीतील प्रकल्पग्रस्तांच्या घरात पाणी शिरू लागले आहे

In the five villages, the submerged Barvi dam water | पाच गावांत शिरले बारवी धरणाचे पाणी

पाच गावांत शिरले बारवी धरणाचे पाणी

Next

बदलापूर/मुरबाड : गेल्या आठवड्यातील पावसाने बारवी धरणाच्या पाण्याची पातळी वाढल्याने तोंडली, काचकोळी, जांभूळवाडी, मार्गवाडी, देववाडीतील प्रकल्पग्रस्तांच्या घरात पाणी शिरू लागले आहे. त्यांना त्वरित घरे सोडण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. अनेक गावांतील पाणवठेही पाण्याखाली गेल्याने त्यांच्या स्थलांतराच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मात्र, गावात पाणी शिरत असतानाही काही प्रकल्पग्रस्तांनी गाव न सोडण्याचा निर्णय घेतला आहे. आहे त्याच गावात उंचवट्याच्या ठिकाणी तात्पुरती निवारा शेड उभारून तेथे ते राहत आहेत. दोन दिवसांत पाण्याची पातळी आणखी वाढेल. सर्व आदिवासी पाडे पाण्याखाली जातील. त्यामुळे घरे सोडण्यावरून एमआयडीसी आणि प्रकल्पग्रस्तांमध्ये संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत.
या ग्रामस्थांच्या स्थलांतरासाठी एमआयडीसीने मुरबाड शहरात आठ महिन्यांच्या भाडेकराराने ५० खोल्या घेतल्या आहेत. जी कुटुंबे स्थलांतरित होतील, त्यांच्या पाळीव जनावरांसाठी तंबू उभारून चाऱ्याची व्यवस्था केली जाणार आहे.
या गावांतील पाणवठे पाण्याखाली गेले आहेत. तात्पुरती व्यवस्था म्हणून त्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
दरम्यान, मोबदल्याच्या मुद्द्यावरून काही गावकऱ्यांनी अद्याप घरे सोडलेली नाहीत. त्यामुळे त्यांना सक्तीने घरांतून बाहेर काढण्यासाठी प्रशासन सज्ज आहे.
प्रकल्पग्रस्त गावांतील चार घरे, विहिरी आणि बोअरवेल पाण्याखाली गेली आहे. या आदिवासीपाड्याला जोडणारा मुख्य रस्ता पाण्याखाली गेल्याने या गावांचा संपर्क तुटला आहे. हे प्रकल्पग्रस्त जीव धोक्यात घालून या रस्त्यावरून जात आहेत. ज्या घरांमध्ये पाणी शिरले आहे, त्यांनी गाव न सोडता त्याच गावात वरच्या भागात तात्पुरती शेड बांधली आहे. या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी बारवी प्रकल्पग्रस्त पीडित सेवा संघाचे अध्यक्ष कमलाकर भोईर यांनी ग्रामस्थांसोबत चर्चा केली. मात्र, या बैठकीत गाव न सोडण्याचाच निर्णय एकमताने घेण्यात आला.
बुडित क्षेत्रात वास्तव्य करणाऱ्या प्रकल्पग्रस्तांनी पाण्याशी न खेळता आणि कोणाच्याही भूलथापांना बळी न पडता त्वरित घरे सोडावी आणि स्थलांतर करावे, असे आवाहन आमदार किसन कथोरे यांनी केले आहे. या स्थलांतरितांची अवहेलना होणार नाही, याची काळजी घेण्याचे आदेशही त्यांनी प्रशासनाला दिले.
ज्यांच्या घरात पाणी शिरले आहे, त्यांच्या स्थलांतरापेक्षा बारवी प्रकल्पपीडितांच्या संघटनेच्या ‘वातानुकूलित’ पदाधिकाऱ्यांनी त्यांची माथी भडकावण्याचा प्रयत्न केल्याने कथोरे यांनी त्यांच्यावरही टीका केली. आजवरच्या आंदोलनात बाधित आदिवासी आणि आंदोलकांचा किती फायदा झाला आहे, असा प्रश्न त्यांनी विचारला. बारवी धरण आताच अस्तित्वात आलेले नाही. ज्याज्या वेळी त्याची उंची वाढवली, त्यात्या वेळी शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन मोबदल्याची मागणी मान्य केल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.
पावसाळी अधिवेशनात बारवी प्रकल्पपीडित कुटुंबांच्या घरातील एकाला परिसरातील नगरपालिकांत कायमस्वरूपी नोकरी देण्याच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. (प्रतिनिधी/वार्ताहर)

Web Title: In the five villages, the submerged Barvi dam water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.