लग्नाचा खर्च टाळून गड-किल्ल्यांचे संवर्धन

  • First Published :19-May-2017 : 03:33:10

  • - लोकमत न्यूज नेटवर्क

    मुंबई : मराठा आरक्षण आणि इतर मागण्यांसाठी नवी मुंबईत मराठा क्रांती मूकमोर्चाच्या आयोजनात समन्वयकाची भूमिका निभावणाऱ्या विनोद लक्ष्मण पोखरकर यांनी समाजासमोर नवा आदर्श प्रस्थापित केला आहे. लग्नाचा अवास्तव खर्च टाळून, पोखरकर यांनी गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी काम करणाऱ्या संस्थांसह अपंगांसाठी साकारण्यात येणाऱ्या शिवाश्रमला आर्थिक मदत केली आहे. राज्यातील मराठा क्रांती मोर्चात सामील झालेल्या मराठा बांधवांसह समन्वयकांनी हा उपक्रम सुरू ठेवण्याचे आवाहनही, पोखरकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना केले आहे.

    छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्यासह देशासाठी ठेवलेला वारसा म्हणजे, त्यांनी उभारलेले गड-किल्ले आहेत. मात्र, आज गड-किल्ल्यांची दुरवस्था झाली आहे. म्हणून सह्याद्री प्रतिष्ठानच्या उपाध्यक्ष पदाच्या माध्यमातून पोखरकर गड-किल्ल्यांच्या संवर्धनाचे काम करत आहेत. अहमदनगरच्या पुणे-नाशिक द्रुतगती मार्गावर असलेल्या घारगाव येथे गुरुवार, १८ मे रोजी पोखरकर यांचा विवाह अभिलाषा आहेर यांच्यासोबत पार पडला. या वेळी लग्नाचा अवास्तव खर्च टाळून, पोखरकर आणि आहेर कुटुंबीयांनी दुर्ग संवर्धनाचे काम करणाऱ्या शिवशक्ती प्रतिष्ठान, श्री शिवदुर्ग संवर्धन, शिवदुर्ग मित्र, श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ आणि दुर्गवीर प्रतिष्ठान या संस्थांना प्रत्येकी १० हजार रुपयांची मदत दिली. तर शिर्डी येथे अपंग बांधवांसाठी डॉ. विजय तनपुरे यांच्या संकल्पनेतून साकारण्यात येणाऱ्या शिवाश्रमासाठी नवदाम्पत्यांकडून २५ हजार रुपयांचा निधी शिवाश्रम फाउंडेशनला देण्यात आला.

    यानिमित्ताने पोखरकर म्हणाले की, ‘एक सामाजिक बांधिलकी म्हणून लग्नामध्ये होणाऱ्या अवास्तव खर्चाला कात्री लावण्याचा प्रयत्न केला. हा खर्च टाळून दुर्ग संवर्धनात खारीचा वाटा उचलण्याचा मानस भावी पत्नीला सांगितला. तिलाही संकल्पना आवडली, म्हणूनच लग्नपत्रिकेवर टिप टाकत, अधिकाधिक लोकांनी या उपक्रमात सामील होण्याचे आवाहन केले. सर्व मराठा बांधवांनी जरी हा उपक्रम सुरू ठेवला, तरी राज्यातील सर्व किल्ल्यांचे संवर्धन होऊ शकते. शिवाजी महाराजांवर मराठा बांधवांइतकाच अधिकार सर्व जनतेचा आहे. त्यामुळेच सर्व जाती-धर्माचे लोक या उपक्रमात सामील होऊन, राज्याचा अमूल्य ठेवा जपतील, अशी अपेक्षा आहे.



महत्वाच्या आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लोकमत अॅप: Android | IOS