सीईओ @ 24 !

By admin | Published: January 15, 2017 01:15 AM2017-01-15T01:15:26+5:302017-01-15T01:15:26+5:30

वय वर्ष २१. कॉलेजचा उंबरठा ओलांडताना आता आपल्याला पाहिजे त्या ठिकाणी किंवा मग आवडीप्रमाणे एखाद्या ठिकाणी इंटर्नशिप करण्याचं वय. पण याच वयात आपण इतरांना

CEO @ 24! | सीईओ @ 24 !

सीईओ @ 24 !

Next

- स्नेहा मोरे

वय वर्ष २१. कॉलेजचा उंबरठा ओलांडताना आता आपल्याला पाहिजे त्या ठिकाणी किंवा मग आवडीप्रमाणे एखाद्या ठिकाणी इंटर्नशिप करण्याचं वय. पण याच वयात आपण इतरांना इंटर्नशिप योग्य पद्धतीने मिळावी यासाठी काहीतरी केले पाहिजे या विचाराने आपल्या मित्राच्या साथीने नवी मुंबईच्या निरंजन यादवने स्वत:ची कंपनी सुरू केली. २०१३पासून ‘स्विच आयडिया डॉट कॉम’ या कंपनीच्या माध्यमातून जगभरासह देशातील प्रसिद्ध कंपन्यांच्या सहयोगाने महाविद्यालयीन तरुण-तरुणींना इंटर्नशिप मिळवून देण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सहसंस्थापकाच्या भूमिकेतून निरंजनची धडपड सुरू आहे.

दरवर्षी देशात जवळपास २५ लाख विद्यार्थी पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करतात, मात्र नोकरी मिळत नाही म्हणून या तरुणपिढीला बेरोजगार राहावे लागते. त्यानंतर येणारे नैराश्य, मानसिक खच्चीकरण या सगळ्याच्या आहारी जाणाऱ्या पिढीचे भवितव्यच धोक्यात येताना दिसते, हेच चित्र बदलण्यासाठी निरंजनने इंटर्नशिप मिळवून देणारा संपूर्ण अभ्यासक्रम डिझाईन केला.
आजच्या घडीला ‘उद्योग आणि शैक्षणिक संस्था’ यांच्यामधील अंतर कमी करण्यासाठी स्वीच आयडिया काम करत असल्याचे निरंजनने सांगितले. प्रत्येक उद्योगाला कुशल कामगारांची आणि कॅम्पस प्लेसमेंटमध्ये फ्रेशर्सला कामाची गरज आहे. या दोन्हीमध्ये जी दरी आहे त्यांना जोडण्याचे काम स्वीच आयडिया करत आहे. ही कंपनी पदवी पूर्ण होण्याच्या आधी विद्यार्थ्यांना पगारी इंटर्नशिप मिळावी म्हणून मार्गदर्शन
करते.
आपल्या आवडीच्या क्षेत्रात काम करण्याचा पूर्व अनुभव पदवीच्या अगोदर मिळवला तर विद्यार्थ्यांना खूप लाभदायक ठरतो. कामाचा मिळणारा छोटासा अनुभव विद्यार्थ्यांना खूपकाही शिकवतो, जसे की नवनवीन प्रोजेक्टची माहिती मिळते तसेच कंपनीचे कामकाज कसे चालते हे प्रत्यक्ष पाहायला मिळते. यामुळे त्यांना चांगली दूरदृष्टी मिळते व त्यामुळे भविष्यात आपले करिअर करायला सहकार्य मिळेल, या दृष्टिकोनातून स्वीच आयडियाचे काम सुरू आहे. तसेच स्वीच आयडिया यासाठी ‘राष्ट्रीय प्रज्ञाशोध संपादन परीक्षा’ आयोजित करण्यात येते. त्यामुळे विद्यार्थ्यांची प्राथमिक कामाविषयीच्या कौशल्याची परीक्षेद्वारा पडताळणी होते; तसेच कंपनीतील एचआरला कुशल व गुणवत्तापूर्ण कामगार मिळायला सोपे जाते.
आतापर्यंत स्वीच आयडियाच्या माध्यमातून १० हजार विद्यार्थ्यांना इंटर्नशिप मिळाल्याचे सांगताना निरंजनच्या डोळ्यांत आगळीच चमक दिसून येते. स्वीच आयडियाच्या चमूत सहसंस्थापक म्हणून निरंजनसोबत त्याचा मित्र रोहित मक्कूही काम पाहतो. या दोघांच्या नेतृत्वाखाली २२ जणांची टीम स्वीच आयडियाचे काम पाहते. शिवाय, या स्वीच आयडियाचे वैशिष्ट्य म्हणजे याच ठिकाणी परीक्षा देऊन यश मिळवलेले काही इंटर्न्स स्वीच आयडियाच्या क्रिएटीव्ह टीममध्ये
आहेत.
या टीमविषयी निरंजन सांगतो की, टीममधील सगळेच तरुण असल्याने खूपसाऱ्या नव्या आयडीया आणि कल्पना-विचारांची सतत देवाणघेवाण सुरू असते. शिवाय, या कामात काही मेन्टॉर्सही आम्हाला सतत मार्गदर्शन करीत असतात. हा सगळा डोलारा उभारताना परीक्षेचा अभ्यासक्रम डिझाईन करण्याचे आणि प्रश्नोत्तरे तयार करण्याचे सर्वांत मोठे आव्हान होते. मात्र त्यासाठी आम्हालाही पूर्वतयारी म्हणून ८-१० महिने रात्रंदिवस अभ्यास करावा लागला.
सध्याच्या ‘स्टार्टअप’चे विश्व वेगाने डोके वर करत आहे. याविषयी त्याला विचारल्यावर तुम्हाला जे आवडतं ते झोकून देऊन करायची तयारी असेल, तर यश मिळणारच या विचाराने स्टार्टअप्स सुरू केले तर नक्कीच यश मिळेल,
असे त्याने आत्मविश्वासाने सांगितले.
काही वर्षांपूर्वी प्रसिद्ध असलेल्या ‘ब्लॉगथॉन’ या उपक्रमातही निरंजनचा महत्त्वाचा वाटा होता, तरुणपिढीने ब्लॉगविश्वात सक्रिय होण्यासाठीही मार्गदर्शन करायचो. ब्लॉग लिखाणासाठीही पारतोषिके पटकावल्याचे निरंजनने आवर्जून सांगितले. टेक्नोलॉजीच्या विकासात तरुणपिढी भरकटत जाते अशी ओरड होत असताना निरंजनचा हा प्रवास नक्कीच भावी पिढीसाठी आदर्श ठरेल, असा विश्वास आहे.

Web Title: CEO @ 24!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.