पंढीरीची पायवारी...

 • First Published :17-June-2017 : 17:03:29 Last Updated at: 17-June-2017 : 17:11:35

 •  - अभय टिळक

  ज्येष्ठातील पौर्णिमा उलटली की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून 

  भक्तिप्रवाहांचा उगम होतो आणि सारे प्रवाह पंढरीच्या दिशेने वाहू लागतात.

  दिवसेंदिवस दिंड्यांची आणि वारकऱ्यांची संख्या वाढते आहे.

  पूर्वापार पालखीतळ अपुरे पडत आहेत.

  दिंड्यांना रात्रीचे पडाव टाकण्यासाठी मोकळी जागा मिळणे दुरापास्त होते आहे.

  दिंड्यांबरोबरच्या वाहनांची संख्या फुगते आहे.

  याशिवाय वारकऱ्यांंना लागणारा गॅस, रॉकेल, पाण्याचा टँकर, 

  वारकऱ्यांचे बाडबिस्तरे, निवासाचे तंबू, शिधा, भांडी, रुग्णवाहिका, प्रदूषण,

  वारीबरोबर चालणाऱ्या विक्रेत्यांच्या हातगाड्या, 

  त्यामुळे वारीची मंदावत जाणारी गती, 

  प्रशासन आणि पोलिसांवरचा प्रचंड ताण.. 

  यापुढच्या काळात मुख्य आव्हान आहे ते 

  या साऱ्या व्यवस्थेचे दीर्घकालीन नियोजन करण्याचे. 

  ज्येष्ठातील पौर्णिमा उलटली की मराठी मनाला वेध लागतात ते आषाढीच्या पायवारीचे. वारकरी सांप्रदायिकांचे तर जणू चित्त आणि नेत्र जडलेले असतात पंढरीनगरीकडे. त्याच वेळी आणखीही एका आघाडीवर एकप्रकारे लगीनघाईच उडालेली असते. ती आघाडी म्हणजे प्रशासनाची ! ज्या-ज्या जिल्ह्यांमधून वैष्णवांचा मेळा मार्गस्थ होणार असतो त्या प्रशासनाच्या पुढ्यात वारी आणि वारकरी यांच्याशी निगडित अनंत कामांचे तगादे उभे असतात. वारीचा उत्साह, त्यादरम्यान भावभक्तीला येणारा मोहर, संबंधित देवस्थानांकडे वाहणारा वारकरी सांप्रदायिकांचा राबता... अशा साऱ्या माहौलात वारीच्या सोहळ्याचे व्यवस्थापन नीटनेटके व्हावे यासाठी विभागीय आयुक्तांपासून ते पोलीस आयुक्तांपर्यंत आणि जिल्हाधिकाऱ्यांपासून ते तहसीलदारांपर्यंत सर्वच यंत्रणा किती पद्धतीने आणि कोणकोणत्या आघाड्यांवर सज्ज बनत असते, हे सहजासहजी कोणाच्याच नजरेत भरत नाही. वारीमार्गांचे रुंदीकरण, रस्त्यांची देखभाल दुरुस्ती, दिवाबत्ती, पाणीपुरवठा, स्वच्छता, वाहतुकीचे नियंत्रण, गर्दीचे व्यवस्थापन, कायदा व सुव्यवस्थेची तरतूद, माहिती प्रसारणाची सिद्धता, आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याची दक्षता, सर्वसाधारण आरोग्य, दळणवळण व संपर्कव्यवस्था, वारकऱ्यांच्या दिंड्यांसाठी स्वयंपाकाचा गॅस तसेच रॉकेलसारख्या जिनसांचे साठे आणि वितरणप्रणाली... अशा अगणित जबाबदाऱ्यांचे व्यवधान शासकीय-प्रशासकीय यंत्रणेला थेट आषाढी एकादशीच्या महापर्वापर्यंत अहोरात्र राखावे लागते. आजवर, राज्यातील प्रशासकीय यंत्रणा या सगळ्याच बाबतीत काटेकोर राहत आलेली आहे. या संपूर्ण सहकार्याबद्दल तसेच दक्षतेबद्दल प्रत्येक वारकरी सांप्रदायिक प्रशासनाचे कौतुक करतो आणि ऋणही मान्य करतो. तसे न करणे हे संतबोधाशी प्रतारणा करणारेच ठरावे.

  अर्थात, महाराष्ट्राच्या अक्षरश: कानाकोपऱ्यातून उगम पावणाऱ्या या भक्तिप्रवाहांचे व्यवस्थापन करताना नाना पातळ्यांवर कोठे ना कोठे काही ना काही त्रुटी प्रसंगवशात उद्भवतात. आषाढीच्या पायवारीचे नियोजन येत्या काळात खरोखरच किती आव्हानात्मक बनत जाणार आहे, याची जणू चुणूकच या त्रुटी आपल्या सगळ्यांच्याच पुढ्यात एकप्रकारे उलगडत असतात. श्रीक्षेत्र देहू, आळंदी, सासवड, त्र्यंबकेश्वर, पैठण... यांसारख्या विविध संतक्षेत्रांमधून महायोगपीठ पंढरीक्षेत्राकडे प्रस्थान करणाऱ्या पालखी सोहळ्यांचे व्यवस्थापन अलीकडील काळात अतिशय जोखमीचे आणि तितकेच जिकिरीचे बनते आहे. समाज बदलतो आहे. बदलत्या समाजाबरोबरच वारीही बदलते आहे. वाढलेली सुबत्ता, माध्यमांचा अप्रतिहत विस्तार, आधुनिक जीवनशैलीमध्ये रममाण होत असतानाच आपल्या परंपरेचा अनुबंध तुटू न देण्याची तीव्र प्रेरणा, तंत्रज्ञानाचा अमोघ विकास... यांसारख्या अनेक बाबींचा एकत्रित प्रभाव आजच्या वारीवर पदोपदी जाणवतो. अमर्याद उत्साह, अलोट भावभक्ती एकीकडे आणि सर्व प्रकारच्या साधनसामग्रीची मर्यादित उपलब्धता दुसरीकडे, या निखळ अर्थशास्त्रीय द्वंद्वाचा खेळ अलीकडे प्रकर्षाने दृष्टोत्पत्तीस पडतो. त्या वास्तवाचेच काही कवडसे इथून पुढे मांडलेले आहेत. ‘वारी’नामक आमच्या भावविश्वातील एका विलक्षण संपन्न संचिताचे भविष्यकालीन दर्शन येणाऱ्या पिढ्यांना अधिक समृद्धपणे घडावे यासाठी या विविध मुद्द्यांबाबत आपल्या सगळ्यांनाच येत्या काळात सखोल चिंतन करावे लागणार आहे. 

  पालख्यांबरोबर वाटचाल करणाऱ्या समाजात दिवसेंदिवस भर पडते आहे. दिंड्यांची संख्या आणि दिंड्यांमधून भजन करत मार्गक्रमण करणाऱ्या वारकऱ्यांची संख्या यात उत्तरोत्तर वाढ होताना दिसते. कोणत्याही पालखीसोहळ्यात औपचारिकपणे समाविष्ट नसणाऱ्या दिंड्यांची संख्याही दिसामाशी वाढते आहे. दुसरीकडे, पंढरीच्या वाटेवर पालख्यांचे रात्रीचे मुक्काम जिथे पडतात त्या गावांतील आणि संबंधित गावांच्या परिसरातील बांधकामांची संख्या अलीकडील काळात प्रचंड फुगलेली आहे. साहजिकच, गावांच्या मेरेवर आजवर मोकळ्या राहिलेल्या जमिनींचे आकारमान आक्रसत चाललेले आहे. जमिनींची बाजारपेठ सगळीकडेच कमालीची गुंतागुंतीची बनलेली आहे. सोन्यापेक्षाही जमिनीचे मोल आज अधिक आहे. परिणामी, वापरात आणता येण्याजोगा इंच न् इंच बांधकामाखाली आणण्याची हातघाई लहानमोठ्या सगळ्याच गावाशहरांच्या लगत आज ऐन भरात आलेली दिसते. यात असाधारण अथवा अनैसर्गिक काहीच नाही. परंतु, यामुळे येत्या काळात पालख्यांबरोबर चालणाऱ्या दिंड्यांना रात्रीचे पडाव टाकण्यासाठी पुरेशा मोकळ्या जागा मिळणे दुरापास्त ठरत जाणार आहे. गावाबाहेरील माळरानांवर, गायरानांवर अथवा मोकळ्या खासगी जमिनींवर तंबू ठोकून रात्रीच्या पथाऱ्या टाकणाऱ्या वारकऱ्यांना भविष्यात जागाच मिळणे त्यापायी दुष्कर बनेल. जसे पैशाचे सोंग आणता येत नाही तशीच जमीनही निर्माण करता येत नाही! 

  मग, यासंदर्भात काय करायचे? येत्या काळात शासन, प्रशासन, वारकरी संप्रदायातील धुरीण, लोकाभिमुख राजकीय नेतृत्व, संबंधित संस्थाने, गावकरी, स्थानिक स्वराज्य संस्था अशा सगळ्याच संबंधित घटकांना एकत्र बसून या संभाव्यतेची गंभीरपणे चर्चा करावी लागणार आहे. शासन-प्रशासनावरही बाकीच्या जबाबदाऱ्यांचा ताण एवढा असतो की, आषाढीची वारी आणि वारकरी यांच्या संदर्भातील प्रश्नांची चर्चा एका आषाढीनंतर थेट पुढील वर्षाची आषाढी जवळ आल्यानंतरच सुरू होते. परंतु जागेचा प्रश्न अशा वार्षिक चर्चांनी हलका होणारा नाही. सबंध महाराष्ट्रातून पंढरीला जमणाऱ्या पालख्यांचे मार्ग, त्या मार्गांवरील गावे, त्या गावांचे परिसर, त्या-त्या ठिकाणच्या स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या एकात्मिक विकासाचा पालखीसोहळाकेंद्रित नियोजन आराखडा विकसित करण्यावाचून आता गत्यंतर नाही. मोकळ्या जमिनींच्या वाढत्या तुटवड्यापायी पालखीसोहळ्यांच्या रात्रीच्या मुक्कामांचा भूपृष्ठीय नकाशा बदलणे अपरिहार्य ठरते आहे. दिंड्यांची संख्या आणि दिंड्यांमधून चालणारा समाज मर्यादित होता त्यावेळी मुख्य पालखीतळाच्या पलीकडे सोहळ्याच्या रात्रीच्या मुक्कामाचा पसाराही फारसा फैलावलेला नसे. आजची परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे. आज, गावोगावचे पूर्वापार पालखीतळच मुळात अपुरे ठरत आहेत. त्यासाठी वाढीव क्षेत्रांची मागणी संस्थाने आणि वारकरी सांप्रदायिक सरकारदरबारी सतत लावून धरत आहेत. मुख्य म्हणजे, गावठाणांनीच हातपाय पसरलेले असल्याने, पालख्यांच्या मुख्य तळावर रात्रीच्या मुक्कामाची जागा नसलेल्या दिंडीकऱ्यांना मूळ तळापासून दूरदूर अंतरांवर आपले रात्रीचे तंबू ठोकावे लागतात. परिणामी, आसमंतात दूरदूर पडाव टाकणाऱ्या दिंड्यांना आणि दिंड्यांच्या समूहांना स्वयंपाकाचा गॅस, रॉकेल, पाण्याचा टँकर अशांसारख्या मूलभूत सुविधा पुरविण्याबाबत प्रशासनावरही ताण वाढतो. दुसरे म्हणजे, हे वास्तव जोखून उपाययोजना करावी लागत असल्याने दिंड्यांबरोबर असणाऱ्या लहान आकाराच्या वाहनांची संख्याही वाढते आहे. अवचितच गॅसचा सिलिंडर संपला आणि वाटप यंत्रणा दूर असेल तर लहान टेम्पो अथवा चारचाकी वाहन धाडून सिलिंडर दिंडीच्या मुक्कामापर्यंत आणण्यावाचून गत्यंतर राहत नाही. यातून, प्रत्येकच दिंडीबरोबर असणाऱ्या लहानमोठ्या वाहनांची संख्या प्रतिवर्षी वाढते आहे. त्याला इलाजच नाही. दिंड्यांमधून चालणाऱ्या सांप्रदायिकांच्या संख्येतही भरीव वाढ होत चालल्याने वारकऱ्यांचे बाडबिस्तरे, निवासाचे तंबू, स्वयंपाकाचा शिधा व भांडी यांसारखे सामान वाहून नेण्यासाठी आवश्यक असणाऱ्या मालमोटरींसारख्या मोठ्या, अवजड वाहनांची संख्या फुगत चाललेली आहे. पाण्याचे टँकर, रुग्णवाहिका, सोहळ्याबरोबर चालणाऱ्या फिरत्या विक्रेत्यांच्या हातगाड्या यांची गणना वेगळीच. या सगळ्यांपायी सोहळ्यातील गजबज अतोनात वाढते. त्याचा उपसर्ग पायी चालणाऱ्या वारकऱ्यांना सतत होत राहतो. वाहनांचे आवाज, कर्कश हॉर्न, हवेत सोडला जाणारा धूर यांतून भजनाची लय भंग पावत राहते. प्रदूषण वाढते ते निराळेच. त्यातच, रस्त्यांची बांधबंदिस्ती नीट झालेली नसेल तर डांबरी रस्त्यावरून कडेच्या मुरूमात अगर चिखलात उतरलेले वाहनाचे चाक त्यात फसले तर विचारायलाच नको. मुळातच आक्रसत चाललेल्या मुक्कामांच्या जागांवर वाहनांची वाढती संख्या तिचाही हक्क सांगते. या सगळ्यांपायी पायी चालणारे वारकरी आणि त्यांना समांतर आगेकूच करणारी वारकऱ्यांची वाहने यांचे सुविहित व्यवस्थापन करणाऱ्या पोलीस यंत्रणांवर किती प्रचंड ताण येत असेल याची कल्पनाच केलेली बरी. या वाढत्या गर्दीचा एक अपरिहार्य परिणाम म्हणजे सोहळ्याच्या वाटचालीची सरासरी गती मंदावत राहते. त्यामुळे रात्रीचे मुक्काम गाठायला उशीर होणे ओघानेच येते. या सगळ्याबाबत आपण काय करणार आहोत?

  मुख्य रस्त्यावर दिंडी व वारकरी चालत असताना सोहळ्याबरोबर असणारी वाहने अन्य रस्त्यांनी, बाह्यवळण मार्गांनी रात्रीच्या मुक्कामापर्यंत सुरळीत पोहोचण्याच्या दृष्टीने रस्त्यांची अशी एक व्यवस्था (रोड सिस्टिम) अथवा रस्त्यांचे सुविहित जाळेच विकसित करण्यावाचून येत्या काळात पर्यायच राहणार नाही. 

  हे साध्य करायचे, तर वेगवेगळ्या भागांतून पंढरीकडे मार्गक्रमण करणाऱ्या पालख्यांच्या मार्गांवरील गावांचा आणि त्या-त्या ठिकाणी कार्यरत असणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कार्यक्रम डोळसपणे राबवणे अनिवार्य ठरते. त्या दृष्टीने एकसंध आणि एकात्मिक असे पालखीसोहळाकेंद्रित नगरनियोजन प्रवर्तित केले जायला हवे. पालखीसोहळा हा दरवर्षी अविरत चालणारा महोत्सव आहे. एक हजारहून अधिक वर्षांची परंपरा असणारा हा भक्तिसोहळा खरोखरच कालातीत आहे. त्यामुळे पालखीसोहळाकेंद्रित नगरनियोजनाचे ‘मॉडेल’ वाया तर जाणार नाहीच पण ते कालबाह्यही ठरणार नाही. पालख्यांच्या मार्गांवरील गावे, त्यांचे परिसर, त्या-त्या ठिकाणी उपलब्ध असणाऱ्या पायाभूत सेवासुविधा, पालख्यांचे तळ, त्यांच्या भविष्यकालीन विस्ताराच्या गरजा, दिंड्यांचे रात्रीचे पडाव, दिंड्यांना गरज भासणाऱ्या नागरी सुविधांचे स्वरूप, त्या सुविधा आणि त्या-त्या गावांतील नागरिकांच्या नागरी गरजा यांचा समन्वय, पालखीसोहळ्यांसाठी निर्माण होणाऱ्या सुविधांच्या वर्षभर वापराचे आराखडे, वित्तीय साधनांची तरतूद... यांसारख्या सगळ्याच संबंधित बाबींसंदर्भात शासन, सांप्रदायिक, संघटित कॉर्पोरेट उद्योग, संस्थाने, स्वयंसेवी संस्था यांनी सामूहिक प्रयत्नांतून कल्पक योजना निर्माण करण्याचे शिवधनुष्य आता उचलायलाच हवे. 

  यांत सांप्रदायिकांचे आणि वरकड समाजाचे उत्तरदायित्वही अर्थातच मोठे आहे. पंढरीची पायवारी आणि ही पायवारी ज्या वारकरी संप्रदायाच्या आचारधर्माचा प्राण आहे तो भागवत धर्म विचाराचे अधिष्ठान जपणारा वारकरी संप्रदाय यांचा वारसा, वसा आणि पावित्र्य अबाधित राहावे याची दक्षता सगळ्यांनीच घ्यायला हवी. व्यक्ती आणि समाज यांच्या दरम्यान विवेकशील आणि कर्मप्रधान असे एक जबाबदार नाते निर्माण करण्याचा बोध वारकरी तत्त्वज्ञान घडवतो. पंढरीची पायवारी हे अंतिमत: कायिक-वाचिक-मानसिक असे त्रिविध तप आहे, याची जाणीव प्रत्येकच घटकाने मनीमानसी जपायला हवी. शासनाकडे काय काय आणि किती मागायचे याचा विवेक सगळ्यांनाच जोपासावा लागणार आहे. अगदी शासन जरी झाले तरी पैशाचे सोंग त्यालाही आणता येत नाही. त्या दृष्टीने शासनसत्ता, प्रशासकीय यंत्रणा, वारकरी सांप्रदायिक, संस्थाने, समाजातील स्वयंसेवी संस्था, वृत्तपत्रादी माध्यमे यांच्यादरम्यान निकोप, सकारात्मक आणि उद्याच्या आव्हानांवर मात करू शकणारे व्यवहार्य उपाय शोधून काढणारी प्रगल्भ चर्च सतत झडत राहायला हवी. 

  हे आपण करणार का? 

  एकात्मिक आराखडा हवा

  पंढरीच्या वारीसंदर्भात लगोलग करता येण्याजोगे जे काही असते ते शासकीय यंत्रणा, संस्थाने, सांप्रदायिक आणि या सगळ्या सोहळ्याला आपापल्या परीने हातभार लावणाऱ्या स्वयंसेवी संस्था करत राहतातच. इथून पुढच्या काळात मुख्य आव्हान राहणार आहे ते या सगळ्या व्यवस्थेचे दीर्घकालीन नियोजन करण्याचे. त्या दृष्टीनेही पुन्हा, पालखीसोहळाकेंद्रित असे रस्त्यांच्या व्यवस्थेचे नियोजन आणि आरेखन केले जाणे अनिवार्य ठरते. राज्याच्या ज्या-ज्या भागातून जे-जे पालखीसोहळे मार्गक्रमण करतात त्या सोहळ्यांच्या वाटचालीचा मुख्य मार्ग, त्या मार्गांचे रुंदीकरण, वेळोवेळी देखभाल दुरुस्ती, पालखीमार्गांवर वृक्षारोपण आणि लावलेल्या झाडांची वाढ पूर्ण होईपर्यंत त्यांची निगा राखली जाण्याची व्यवस्था अशांसारख्या नाना बाबी यात ओघानेच येतात. आजही शासन हे करतेच आहे. परंतु केवळ एवढेच पुरेसे नाही. पालख्यांच्या मुख्य मार्गांना समांतर असणारे अन्य मार्ग, बाह्यवळण रस्ते, अंतर्गत मार्गिका यांच्या विकासाचा एकात्मिक आराखडा राबविला जाणे आता अगत्याचे ठरणार आहे.महत्वाच्या आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लोकमत अॅप: Android | IOS