मुलांची वाढ

 • First Published :17-June-2017 : 16:55:48 Last Updated at: 17-June-2017 : 17:11:26

 • - मयूर पठाडे

  ‘आमचं मूल अ‍ॅक्टिव्ह नाही, चिडचिडल्यासारखं करतं.

  त्याच्या वयाच्या इतर मुलांच्या तुलनेत 

  त्याची वाढही कमी वाटते..’

  प्रत्येक आईलाच आपलं मूल

  अगदी गुटगुटीत हवं असतं.

  पण अशी लक्षणं दिसत असतील,

  तर त्याकडे दुर्लक्षही करू नका.

  अनेक पालकांची तक्रार असते.. विशेषत: हे मूल जर तीन वर्षांच्या आतील असेल तर.. ‘आम्ही मुलाकडे इतकं लक्ष देतो, मुलाच्या वाढीसाठी आवश्यक ते सारं त्याला खायला घालतो.. त्याची खाण्याची, जेवणाची वेळ एकदाही चुकवत नाही.. पण तरीही आमचं मूल अ‍ॅक्टिव्ह नाही, चिडचिडल्यासारखं करतं. त्याच्या वयाच्या इतर मुलांच्या तुलनेत त्याची वाढही कमी आहे असं वाटतं..’

  - तुमचीही अशीच तक्रार आहे? खरंतर प्रत्येक आईला आपलं मूल काहीच खात नाही आणि ते अतिशय बारीक आहे, असंच वाटत असतं. तो आपल्या खास भारतीय मानसिकतेचाही भाग आहे. पण तरीही काही प्रमाणात त्यात तथ्यही आहे. आपण मुलांना वारेमाप खायला तर घालतो, पण मुलांच्या वाढीसाठी आवश्यक असलेले घटक त्यात किती प्रमाणात आहेत हे आपण कधी तपासतो का? बऱ्याचदा ते नसतातच. अत्यावश्यक पोषकमूल्य भारतीय मुलांना मिळत नाहीत, त्यामुळे त्यांच्यात मायक्रोन्यूट्रिअंट डेफिशिअन्सी असते.. भारतीय घराघरांत हेच चित्र आहे. युनिसेफनंही नुकतंच त्यावर शिक्कामोर्तब केलं आहे आणि त्याबद्दल चिंताही व्यक्त केली आहे. भारतीय पालक आपल्या मुलांची नीट काळजी घेत नाहीत, असाच त्याचा मथितार्थ आहे. भारतीय पालक मुलांकडे सरसकट दुर्लक्ष करतात असा त्याचा अर्थ नाही; उलट जगात भारतीय पालकच आपल्या मुलांची सर्वाधिक, अगदी नको तितकी काळजी घेत असावेत. पण आपण काय करतो? आपलं मूल चांगलं गोबरं, गुबगुबीत दिसावं यासाठी त्याला येताजाता भरपेट खाऊ घालत असतो. मुलाचं पोट भरलेलं असल्यावर अर्थातच ते प्रत्येक वेळी खात नाही. त्यामुळे आईला वाटतं, आपल्या मुलाचा आहार कमी आहे किंवा ते अशक्त आहे. मुलांना जो आहार रोज दिला जातो, त्याकडे नीट पाहिलं तर लक्षात येईल, या आहारात बऱ्याचदा फॅट्स आणि कार्बोहायड्रेट्स यांचाच जास्त समावेश असतो. सूक्ष्म पोषक घटकांचीही शरीराला आवश्यकता असते, त्याकडे मात्र बऱ्याच पालकांचं दुर्लक्षच होतं. 

  काय आहे कमतरता?

  लोह, झिंक, आयोडिन, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी- १२, फोलेट.. इत्यादी अनेक सूक्ष्म पोषक घटकांची (मायक्रोन्यूट्रिअंट) भारतीय मुलांच्या शरीरात कमतरता असते. त्याचे दुष्परिणाम त्यांना नंतरच्या आयुष्यात भोगावे लागतात. 

  कमतरतेमुळे निर्माण होणारे दोष-

  १. मुलांची पचनक्रिया आणि पचनशक्ती दुबळीच राहते.

  २. अ‍ॅनिमिया म्हणजे रक्तक्षयासारख्या विकारांना त्यांना सामोरं जावं लागू शकतं.

  ३. लक्ष एकाग्र करण्याची क्षमता तकलादूच राहते. 

  ४. शारीरिक वाढ खुंटलेली राहते.

  ५. मानसिक वाढीवरही परिणाम होतो. 

  ‘लॅन्सेट’ या जगप्रसिद्ध मेडिकल जर्नलमध्येही यासंदर्भात नुकताच एक अहवाल प्रसिद्ध झाला आहे. हा अहवाल सांगतो, मुलांच्या वाढीत या मायक्रोन्यूट्रिअंट्सचा अतिशय महत्त्वाचा वाटा असतो. विशेषत: पहिल्या हजार दिवसांत, म्हणजेच साधारण तीन वर्षे वयापर्यंतच्या मुलांच्या वाढीत त्यांची भूमिका अनन्यसाधारण असते. या काळात जर मुलांना व्यवस्थित पोषक द्रव्ये मिळाली, तरच त्यांची वाढ योग्यरित्या होईल. ती खऱ्या अर्थानं ‘गुटगुटीत’ आणि हेल्दी असतील.महत्वाच्या आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लोकमत अॅप: Android | IOS