कतार - कोंडी

 • First Published :10-June-2017 : 20:49:26

 •  - निळू दामले

  अरब-आखाती-सुन्नी जगातलं अंतर्गत राजकारण आणि व्यवस्था कतारनं ढवळून काढली हे कतारवरच्या बहिष्काराचं मुख्य कारण आहे.
   
  सौदी अरेबिया, येमेन, बहारीन, इजिप्त आणि अरब अमिराती या देशांनी कतारबरोबरचे संबंध तोडले आहेत. केवळ दूतावास बंद करून ते देश थांबलेले नाहीत, त्यांनी कतारच्या सरहद्दी बुजवल्या आहेत, बहुधा व्यापार आणि दळणवळण थांबवलं आहे. एका परीनं कतारची कोंडीच करण्यात आली आहे.
  कतार दहशतवादाला खतपाणी घालतं असा अरब देशांचा आरोप आहे. मुस्लीम ब्रदरहुड, हमास आणि हेझबुल्ला या तीन दहशतवादी संघटनांना कतार पैसे पुरवतं, शस्त्रं पुरवतं असं अरब देशांचं म्हणणं आहे. सीरियातलं घनघोर युद्ध गुंत्याचं आहे. सीरियातली असद यांची राजवट शिया राजवट मानली जाते, तिला इराणचा पाठिंबा आहे कारण इराण शिया आहे. असद राजवट क्रूर आहे, अमानुष आहे, तिनं सीरियामधला असंतोष अमानवी पद्धतीनं चिरडला. ‘धर्माच्या पलीकडं जाऊन नागरिक या नात्यानं आपल्याला स्वातंत्र्य हवंय’ असं म्हणणाऱ्या लोकांना असद यांनी विषारी वायूचा वापर करून मारलं. तेव्हा सीरियातल्या असंतुष्ट विरोधकांना मदत करायला अमेरिका आणि अमेरिकामित्र सौदी अरेबिया पुढं सरसावले. सौदी अरेबियाला लोकशाहीचा पुळका आहे अशातला भाग नाही. असद हे शिया आहेत, असद यांना इराणचा पाठिंबा आहे म्हणून सौदी या युद्धात पडले. इराण हा शिया देश जगभरच्या मुसलमानांमध्ये आपला प्रभाव वाढवू पाहतो हे सौदीला मंजूर नाही. 
  - थोडक्यात असं की पश्चिम आशियातल्या अरब-आखाती प्रदेशातल्या घालमेलीमधून कतारवरची कारवाई जन्मली आहे. मारामारी आहे ती सुन्नी आणि शिया गटांमधली. सौदी, इजिप्त, बहारीन, येमेन इत्यादी सुन्नी देशांना आखाती-अरब प्रदेशाचं नायकत्व हवं आहे. इराण हा शिया देश त्या नायकत्वाला आव्हान देतोय. कतार इराणला मदत करतोय हे कतार कोंडीचं मुख्य कारण आहे. 
  अमेरिकेनं म्हणजे ट्रम्प नावाच्या एका रिअ‍ॅलिटी शोवाल्या चक्रम माणसानं या कोंडीत सौदीच्या बाजूनं माप टाकलं आहे. या भानगडीत मुसलमान देश आपसात भांडून अशक्त होणार असतील तर बरंच झालं असा एक विचार त्यामागे असावा. शिवाय या भानगडीत अमेरिकेची शस्त्रंही खपत आहेत. ट्रम्प सौदीला हज्जारो करोडो डॉलर्सची शस्त्रं विकत आहे. यातून एकीकडं अमेरिकेत लाखो रोजगार तयार होतील. पण दुसरीकडं ही शस्त्रं सौदीगट बहुतांशी आपल्या विरोधकांना खतम करण्यासाठीच वापरणार आहे. म्हणजे येमेन, सीरिया, इराक, इजिप्तमध्ये ब्रदरहुड-हमास-हेजबुल्ला यांच्या विरोधात वापरणार आहे. हमास-हेझबुल्लाना नेस्तनाबूत करणं म्हणजे इस्रायलला मदत करणं. हे अमेरिकेच्या हिताचं आहे. एकूणात अमेरिकेला फायदाच फायदा असा हिशेबही या भानगडीत दिसतो.
  कतार कोंडीला काहीशी आर्थिक बाजूही अर्थातच आहे. कतारमध्ये जगातला सर्वात मोठा नैसर्गिक वायूचा साठा आहे. कतार आणि इराण हे नैसर्गिक वायूचे अड्डे आहेत. सौदी, कुवैत इत्यादी देश तेलअड्ड्यांचे मालक आहेत. सौदीच्या तेलअड्ड्याला कतारच्या वायुअड्ड्याचं आव्हान असंही काहीसं स्वरूप या कोंडीला आहे. तेलाच्या किमतींना काही प्रमाणात वायूच्या किमती शह देऊ शकतात. 
  एक अगदी स्वाभाविक प्रश्न पडतो की कतार हा सुन्नी देश सौदीगटातल्या सुन्नी देशांच्या विरोधात का? इराण हा शिया देश असूनही कतार हा सुन्नी देश त्यांच्याबरोबर कसा? शिया-सुन्नी हे इस्लामच्या जन्मापासून चालत आलेलं वैर सुन्नी-शिया देशांना, इराण आणि कतार या देशांना कसं एकत्र आणू शकतं? प्रश्न चमत्कारिक आहे खरा; पण त्याचं उत्तर सैद्धांतिक नसून व्यवहारामध्ये सापडण्यासारखं आहे. सौदी गटातले देश आणि कतार यांच्या घडणीमध्ये वरील प्रश्नाची काही उत्तरं सापडतात.
  कतारचे सध्याचे राज्यप्रमुख अल थानी हे या सगळ्या भानगडींचे निर्माते आहेत. कतार हा हाताच्या अंगठ्याएवढा चिमुकला देश त्यांनी बलवान केलाय. आपल्या वडिलांना सत्तेतून हाकलून ते देशप्रमुख झाले तेव्हा कतार हा देश इतर आखाती देशांसारखा, सौदीगटातला देश असल्यासारखंच होतं. सौदी राजे स्वत:ला वहाब या सौदी घराण्याचे वंशज मानतात. अल थानींचे वडील आणि पूर्वजही स्वत:ला वहाबीच मानत होते. एकूण आखातातल्या इतर अरब-सुन्नी देशांप्रमाणेच कतारची आर्थिक-राजकीय-सामाजिक परिस्थिती होती. एका जमातप्रमुखाचं खानदानी राज्य असं कतारचं स्वरूप होतं. नैसर्गिक वायूच्या व्यापारातून मिळालेला पैसा जनतेत वाटून जनतेला सुखी ठेवायचं. काही कारणानं जनतेत असंतोष असेल तर तो चिरडून टाकायचा या उपकारशाही (फ्यूडल) पद्धतीनं कतारचं राज्य चाललं होतं. परदेशातून कामगार आणि विशेषज्ञ आणून, परदेशातून तंत्रज्ञान आणि शस्त्रं आणून कतारचा कारभार चालत असे.
  बंदिस्त अरब जगाचा आरसा बनलेली अल जझीरा ही वृत्तवाहिनी ही या थानी महाशयांचीच निर्मिती!
  अल जझिरा चालवत असतानाच अल थानी यांनी कतारमध्ये अनेक लोकशाहीवादी, उदारमतवादी संस्था आणि शैक्षणिक संस्था स्थापन केल्या. आपल्याच घराण्याचं फाउंडेशन वापरून आरोग्य व्यवस्था उभी केली. शैक्षणिक संस्था आणि थिंक टँक यांचा वापर करून आधुनिकता या विषयावर, लोकशाही या विषयावर थानी यांनी कतारमध्ये चर्चा घडवून आणल्या. जगभरातली नामांकित-जाणकार माणसं या चर्चांमध्ये सामील होती. आपल्या घराण्याचं वर्चस्व, घराणेशाही टिकवून थानी यांनी काही सुधारणा केल्या. घटनेत सुधारणा करून कतार पालिकेत निवडणूक घेतली. स्त्रियांना मतदानाचा अधिकार दिला, निवडून येण्याचा अधिकार दिला, त्यांना चक्क कार चालवायची परवानगी दिली. जगाला या गोष्टी अगदीच किरकोळ वाटत असल्या तरी अरब जगामध्ये लोकांनी भुवया उंचावल्या.
  आज अमेरिका कतारच्या कोंडीला पाठिंबा देत आहे. याच अमेरिकेतला अरब जगातला मोठा लष्करी तळ थानी यांनी कतारमध्ये उभारून दिला आहे. कतारमध्ये आधुनिकता, उदारमतवाद, ज्ञान या गोष्टींचा प्रसार करण्यासाठी कतारनं अमेरिकेतल्याच माध्यमांची मदत घेतली आहे. अरब स्प्रिंग या चळवळीचं मूळ अल जझिरा आणि कतारच्या कारवायांमध्ये आहे. येमेनचे झोटिंग अब्दुल्ला साले यांना हाकला अशी उघड मागणी अल थानी यांनी केली. साले यांचा गैरकारभार अल जझिरानं वेशीवर टांगला आणि तरुणांच्या व्यथांना वाट मोकळी केली. इजिप्तमधली मुबारक यांची हुकूमशाही आणि भ्रष्टाचार अल जझिरानंच बाहेर काढला. बंड येमेनपासून सुरू झालं आणि नंतर ते इजिप्तवाटे साऱ्या अरब जगात पसरलं. या बंडाच्या बातम्या अल जझिरानं पसरवल्या. अरब जग, सौदी-सुनी राज्यकर्त्यांची घराणेशाही हादरली.
  अर्थात हेही खरं की अल थानी हे काही सरळ, थेट लोकशाहीवादी आहेत असं नाही. राजकारणातल्या त्यांच्या खेळी फारच नागमोडी आहेत. येमेन, इजिप्तमधील व्यथा त्यांनी उघड केली पण इराणमधल्या दादागिरीवर ना ते कधी बोलले ना अल जझिरानं माहिती दिली. इस्त्रायलच्या नाकात दम आणणाऱ्या हमासला ते पाठिंबा देतात पण त्याच इस्त्रायलच्या शिमॉन पेरेस यांना कतारमध्ये बोलावून त्यांच्याशी ते व्यापारी करार करतात. तालिबानशी समझौता करून त्यांना अफगाणिस्तानातल्या सत्तेत सामील करण्यासाठी कतारनं प्रयत्न केले. त्यांचं राजकारण बुचकळ्यात पाडणारं आहे, ते यामुळे!
  जे असेल ते असो, पण अल थानी यांच्या उद्योगांमुळं अरब जगाची, त्या जगातल्या पारंपरिक घराण्यांची सत्ता विसकटली आहे.
  म्हणून तर सारं अरब जग कतारला नेस्तनाबूत करायला निघालं आहे.
  अल जझिरा आणि अल थानी
  कतारचा सर्वसत्ताधीश अल थानी हा माणूस एकदमच विचित्र निघाला, अरब-आखाती-सुन्नी या चाकोरीच्या बाहेर पडला. अल थानी यांनी जगातल्या उदारमतवादी परंपरा, शिक्षण, आधुनिकता या गोष्टी कतारमध्ये निर्माण करायचं ठरवलं. १९९६ साली त्यांनी सरकारी पैसा (म्हणजे आपला व्यक्तिगत पैसा) गुंतवून अल जझिरा ही वाहिनी सुरू केली. बीबीसी हे या वाहिनीचं रोल मॉडेल होतं. अरब जगातल्या घडामोडी तटस्थपणे मांडायच्या असं या वाहिनीचं धोरण ठरलं. अरब समाजातली उपकारशाही, अरबांचा घराणेवाद, अरबांना असलेलं लोकशाहीचं वावडं इत्यादी गोष्टींचा बातम्या देताना येणारा अडथळा दूर करून काही एका तटस्थपणे, वेगळ्या रीतीनं अरब जग अल जझिरावरून दिसू लागलं. ताजं तंत्रज्ञान आणि तटस्थ माध्यमनीती या दोन घटकांमुळं कमी काळात अल जझिराला जगात प्रतिष्ठा आणि मान्यता मिळाली. अरब जगातल्या चाकोरीला कंटाळलेल्या तरुणांना अल जझिरानं जगण्यासाठी उमेद मिळवून दिली. बहुसंख्य अरब जगातल्या रोजगार आणि सुखी जीवन या गरजा अल जझिरानं अरब मुलांसमोर ठेवल्या.
  (लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.damlenilkanth@gmail.com)
   


महत्वाच्या आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लोकमत अॅप: Android | IOS