करमत नाय शाळेत...

 • First Published :10-June-2017 : 20:45:05

 • - भाऊसाहेब चासकर

  समाजातली वंचित मुलं शाळेत आली खरी,  पण त्यांचं आयुष्य अभ्यासात आलं नाही.

  त्यांच्या पुस्तकातली भाषा शहरी, त्यातली मुलंही गोरी-गोबरी.जंगलांचा काना-कोपरा माहीत असलेल्या  या लेकरांना ‘जंगलाची व्याख्या’ लिहिता येत नाही, म्हणून आम्ही शिक्षकच ‘नापास’ ठरवतो. कशी येतील ही मुलं शाळेत? आणि आली तरी का टिकतील?
   
  आता सुटी संपेल. शाळा सुरू होईल. आणि मला परत एकदा राजूची आठवण होईल. त्याच्यासारख्या त्याच्या मित्रांचे चेहरे पुढच्या वर्गात दिसतात का, हे माझी नजर शोधत राहील. ग्रामीण भागात काम करणाऱ्या माझ्यासारख्या सगळ्या शिक्षकांच्या नशिबी या दरवर्षीच्या उत्कंठेचा ताण असतोच हल्ली.
  गेल्या वर्षी परीक्षा देऊन धूम पळालेले अनेक चेहरे आता यावर्षी नव्या वर्गात दिसतात का? - ही ती उत्कंठा!
  गेल्यावर्षीची गोष्ट :
  सुटी संपली. शाळा सुरू झाली. चार-पाच दिवस उलटून गेले. राजू अजूनही शाळेत आला नव्हता. गावापासून दूर असलेल्या त्याच्या वस्तीच्या आसपास राहणाऱ्या पोरांना विचारलं. तो रानात गुरं राखायला जातो असं समजलं. सहावीतला राजू तसा दांड्याबहाद्दरच. गायब झाला की चार-सहा दिवस शाळेचं तोंड बघणार नाही. गैरहजर राहायला एवढंसं कारण पुरे. 
  शेवटी एके दिवशी वर्गातल्या बाकीच्या मुलांना काम देऊन मुख्याध्यापक आणि मी मोटारसायकल राजूच्या वस्तीच्या दिशेनं काढली. गावाच्या शिवारातल्या टोकाला असलेल्या डोंगरकाठावरच्या राजूच्या वस्तीवर पोहोचलो. पाचरटाने शाकारलेल्या, शेणा-मातीनं लिंपलेल्या चंद्रमौळी झोपडीतून धुराचे लोट बाहेर निघत होते. तिकडे गेलो. 
  राजूची आई स्वयंपाक करत होती. तिनं बसायला घोंगडी दिली. आम्ही राजूची विचारपूस केली. ‘व्हतो याठंच कुख तरी व्हया. सांग रानात बैलांक गेलाये’ -भाकरी थापता थापता तिनं सांगितलं. इतक्यात राजूचा बाप झोकांडे खात झोपडीकडं आला. आम्ही येण्याचं कारण सांगताच, कुडाला खोचलेली वेताची काठी त्यानं उपसली. राजूला शिव्यांची लाखोली वाहत जंगलात निघाला. ‘व्हत्याला हाणू नगं’, अशी विनवणी आईनं केली. राजूचा बाप पुढं, त्याच्या मागून आम्ही दोघं. रानवाटा तुडवत चालू लागलो. ‘राजा ए राजा, खाली येतो नं न्हाई बिगीन. थांब मां तुझ्याक चांगलाच हेरितो...’ असं मोठमोठ्यानं ओरडत बाप आता वेगानं धावत निघाला. राजू कुठे असेल, हे त्याला पक्कं माहीत होतं. 
  मात्र आमचा कानोसा लागलेला राजू डोंगरातल्या नळीच्या दिशेनं धावत गर्द झाडीत दडून बसला. त्याची आई तिथं आली. त्याला हाका मारल्या. पण सारं व्यर्थ... रिकाम्या हातांनी शाळेत आलो. 
  दुसऱ्या दिवशी राजूची वस्ती गाठली. राजूचा बाप घरी नव्हता. दुरूनच राजूला प्रेमळ हाक मारली. आज राजू पळून गेला नाही. आंब्याच्या झाडाच्या सावलीला त्याच्याजवळ जाऊन बसलो. आमच्या सांगण्यावरून त्यानं भुईमुगाची दोन डहाळं उपटून आणली. शेंगा सोलून खाताना गप्पागोष्टी सुरू झाल्या. राजूच्या पायांवर बरेच काळे निळे वळ उमटलेले दिसत होते. विचारल्यावर काल रात्री बापानं शिमटीनं मारल्याचं त्यानं सांगितलं. मारहाणीचं कारण स्पष्ट होतं. 
  ‘शाळेत का येत नाही?’ असं विचारल्यावर ‘शाळा लांब आहे, जोडीला कोणी नसतं’ असं त्यानं सांगितलं. त्याच्याशी बोलत राहिलो. गप्पांतून हळूहळू त्याच्या मनातल्या कप्प्यांचे एकेक पडदे बाजूला होत गेले... घरी असल्यावर तुला काय काय करायला आवडतं, असं विचारल्यावर तो काय काय सांगू लागला. रानात जायला, डोंगरावर, झाडावर चढायला, डोहात पोहायला, ओढ्याला जाऊन खेकडं पकडून भाजून खायला, रानातली फळं-कंद शोधून काढायला, गलोलीनं पाखरं मारून भाजून खायला, आबाधोबी, आंधळी कोशिंबीर, लपाछपी, सूरपारंब्या, लिंगोरच्या, विटीदांडू असे खेळ खेळायला, आईबरोबर दर आठवड्याला बाजाराला जायला.. राजू सांगतच राहिला.
  ‘मला शाळेत करमत नाही’ - बोलता बोलता तो अगदी सहज बोलून गेला. 
  राजू आदिवासी ठाकर समाजातला. डोंगर-दऱ्या, ओहोळ, जंगलातली झाडं, वेली, फुलं, पाखरं, जनावरं, माती आणि शेती असा सारा सारा निसर्ग आणि तिथलं पर्यावरण याच्याशी त्याचं आणि त्याच्या भाईबंदांचं पिढ्यान्पिढ्यांचं नातं जडलेलं. डोंगरदऱ्याच्या कुशीत एकांतातल्या वस्तीवर राहताना तो तिथल्या निसर्गाशी एकरूप झालेला. रोजच्या जगण्यातले ‘जिवंत’ रसरशीत विषय त्याला शाळेतल्या औपचारिक वातावरणापेक्षा, पाठ्यपुस्तकांपेक्षा जास्त आवडीचे आणि म्हणून महत्त्वाचे वाटत. तसं बघितलं तर त्यात काही चुकीचं नव्हतं. त्याला मजा येत होती ती बिनभिंतीच्या शाळेत! निसर्ग हेच तिकडचं उघडं पुस्तक होतं. अगदी अनौपचारिकपणे त्याला ते वाचायला शिकवणारे सवंगडी अवतीभोवती होते. तिकडं चुकांना शिक्षा नव्हती. कोणी अंगावर खेकसायचं नाही. शिकला का नाही हे तपासायला तांत्रिक परीक्षा वगैरे घेणारं तर दूर दूरपर्यंत कोणीच नव्हतं! राजू तिथं मनापासून रमायचा.
  सार्वत्रिकीकरणाच्या टप्प्यावर वंचित घटकांतली राजूसारखी लक्षावधी मुलं औपचारिक शिक्षणाच्या प्रवाहात दाखल झाली. या मुलांचं जगणं वेगळं आणि औपचारिक शिक्षण त्यापासून बरंच तुटलेलं! जगणं आणि शिकणं यातली दरी सांधली गेली नाही की मग राजू आणि त्याच्यासारख्या लाखो मुलांना आमच्या शाळा, शिक्षक आणि पाठ्यपुस्तकं अजिबात जवळचे वाटत नाहीत. किंबहुना शाळा आणि शिक्षणच मुलांना नकोसं वाटू लागतं.
  आदिवासी, भटक्या समाजातल्या मुलांचं जगणं शाळा आणि एकूण शिक्षणात ठळकपणे येत नाही, तोपर्यंत ‘आमच्या’ शाळा त्या मुलांना आपल्याशा कशा वाटतील? त्यांच्या भाषा, संस्कृती, परंपरा, खानपान, जगण्याच्या तऱ्हा याचा आदर आमचं औपचारिक शिक्षण कितपत करतं?
  शेती हा विषय शिक्षणात असला पाहिजे, असा आग्रह महात्मा जोतिराव फुले यांनी हंटर कमिशनपुढं १९ आॅक्टोबर १८८२ या दिवशी साक्ष देताना धरला होता. फुलेंनी द्रष्टेपणानं केलेल्या मागणीला सव्वाशेहून जास्त वर्षं उलटून गेलीत. 
  शेती विषय शिक्षणात असता तर कदाचित वंचित समूहातील मुला-मुलींच्या शिक्षणाचं चित्र आज वेगळं दिसलं असतं असं वाटत राहतं. या मुलांच्या शिकण्यावर अभिजनवादी म्हणता येईल अशा व्यवस्थेच्या भल्यामोठ्या पंजाची अदृश्य पकड असल्याचं जाणवत राहतं. 
  आपल्या देशातल्या शिक्षणाचा आशय अभिजनांच्या नजरेतून ठरवलेला, मांडला गेलेला वाटतो. वास्तविक देशातल्या शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणाच्या टप्प्यांवर मोठ्या प्रमाणावर वंचित समूहातली मुलं शाळेत येती आणि शिकती झाली. मात्र अभ्यासक्र मात, पाठ्यपुस्तकांत वंचित समूहांना ज्या तऱ्हेनं सामावून घ्यायला हवं होतं तसं झाल्याचं दिसत नाही. 
  वंचित मुलांचं बालपण शिक्षणात येत नाही. पाठ्यपुस्तकांच्या पानापानांवर गोरीपान, गुटगुटीत बाळं दिसतात. खोबऱ्याचं तेल लावून, वेणीफणी करून चापूनचोपून वेण्या घातलेल्या छानछोकी पोरी, स्वच्छ सुंदर गणवेश असलेली मुलं बघताना, त्यातला आशय समजून उमजून घेताना कुठेच अभाव, गरिबी, कुपोषण, वंचना नाहीत असा आभास निर्माण होत राहतो. 
  अभ्यासक्र म आणि पाठ्य साहित्यात आवश्यक बदल, विषयांची पुनर्रचना केली पाहिजे तरच ही कोंडी फुटू शकेल. त्याशिवाय राजूसारख्या मुलांच्या अस्वस्थ मनांची आतल्या आत होणारी चरफड, तडफड आणि शैक्षणिक आयुष्याची होरपळ थांबणार नाही.
  मुलांचं जगणं आणि शिकणं यातली दरी होतीच, आहे आणि ती रुंदावतेही आहे. यातून काठावर पास होत का होईना माझ्यासारखी मुलं कशीबशी शिकली. पुढं जाऊन आर्थिकदृष्ट्या स्थिरस्थावर झाली. सोबतची इतर आदिवासी मुलं मात्र इयत्तांच्या टप्प्यावरच्या परीक्षांच्या चाळणीतून गळाली. 
  शिक्षण व्यवस्थेनं त्यांच्या शैक्षणिक आयुष्यावर नापाशीचे शिक्के मारले! ज्या आदिवासी मुलांना सबंध जंगलातील बारकावे माहिती असतात, त्यांना आमचं शिक्षण जंगलाची ‘व्याख्या’ लिहायला लावतं. त्यांच्याकडील विशेष क्षमता, माहिती याला एकूण शिक्षणप्रक्रि येत फारसं स्थानच नसतं. यामुळं या मुलांच्या आत्मविश्वासाचं खच्चीकरण होत जातं आणि शाळा, शिक्षण नकोसं वाटू लागतं. 
  ...आता यावर्षी असे किती राजू माझ्या शाळेतून गळतील, या काळजीत मी आहे.
   
  (लेखक नगर जिल्हा परिषदेच्या शाळेत सहायक शिक्षक म्हणून कार्यरत असून, शिक्षण क्षेत्रातील अभ्यासू कार्यकर्ते आहेत.bhauchaskar@gmail.com )


महत्वाच्या आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लोकमत अॅप: Android | IOS