...तर मग श्रीमंत कसे नाहीत?

 • First Published :13-May-2017 : 19:09:11 Last Updated at: 13-May-2017 : 19:20:28

 • - ओंकार करंबेळकर

  दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीच्या वेळेस जगाची रचना कशी असावी, 

  हे अमेरिकेने ठरवले. जीडीपी, जीएनपी, दरडोई उत्पन्न, देशाच्या जमाखर्चाचा ताळेबंद, व्यापारातील तूट वगैरे.. 

  हे मापदंड लावूनच प्रत्येकाची वाढ मोजली जाऊ लागली. 

  त्यावरच एखाद्या देशात शांतता नांदते आहे की नाही, विकास होतो आहे की नाही,

  लोक आनंदी आहेत की नाही हे ठरवले जाऊ लागले.

  - आता नव्याने आलेल्या ‘कनेक्टिव्हिटी’ने हे सगळे मोडायला घेतले आहे.

  आजच्या जगातील ‘इंटरनेट’च्या स्थानावर मी गेली अनेक वर्षे विचार करत आहे. लेखक, अभ्यासक वगैरेपेक्षा मी आयुष्याचा सर्वाधिक काळ अभियंता म्हणून व्यतीत केला आहे. मूलत: मी टेक्नोक्रॅट आहे. साधने आणि त्यांचा उपयोग यावरच मी जास्त अभ्यास केला असं म्हणता येईल. ज्या साधनांचा मी अधिक विचार केला त्यामध्ये इंटरनेटचा समावेश आहे. 

  गेल्या काही वर्षांमध्ये इंटरनेटने आपले आयुष्य पूर्ण बदलून टाकले आहे, हे आता प्रत्येकाच्याच अनुभवातली गोष्ट बनली आहे. ८० च्या दशकामध्ये मी काम सुरू केले तेव्हा भारतात केवळ वीस लाख फोन होते. साधा फोन मिळवायचा म्हटले, तरी फार प्रतीक्षा करायला लागायची. फोन मिळवणे अजिबातच सोपे नव्हते. पण केवळ २५ ते ३० वर्षांमध्ये आपल्या देशातले फोन वीस लाखांवरून तब्बल एक अब्जाच्या संख्येवर येऊन पोहोचले आहेत. यामुळे आपण एक अब्ज लोकांना एकमेकांशी जोडणारे राष्ट्र झालो आहोत. सॉफ्टवेअर आणि संबंधित सेवांमधून १३० ते १४० अब्ज डॉलर्स मिळवू शकू अशा परिस्थितीपर्यंत आपण पोहोचलो आहोत. ही वाटचाल आपल्याला जगभरामध्ये मान्यता, सन्मान, मनुष्यबळ, विश्वास आणि भांडवल मिळवून देणारी आहे. भारतीय उद्योजकांनाही जगभरात मान्यता मिळत आहे. 

  - पण या सगळ्याचे आपण काय करत आहोत हा खरा विचाराचा मुद्दा आहे. नव्याने उपलब्ध झालेली कनेक्टिव्हिटी वापरून आपण देश कसा, किती वेगाने आणि कोणत्या दिशेने बदलतो आहोत; हा प्रश्न आज आपल्या धोरणात्मक चर्चांच्या मुळाशी असायला हवा. आपण काही बदल घडवण्याच्या उद्देशाने नियोजन आणि कृती करतो आहोत, की आपण केवळ त्याच त्याच गोष्टी करतो आहोत? आपल्याकडे इंटरनेट, स्मार्टफोन, मोठा डाटा, रोबोटिक्स, अ‍ॅनालिटिक्स हे सगळे आहे; पण त्या साऱ्यासकट आता पुढे काय? - याबाबत आपण बोलायला हवे. ते आपल्याकडे पुरेशा प्रमाणात घडते आहे, असे मला वाटत नाही.

  मानवी इतिहासात पहिल्यांदाच संपूर्ण जग (इंटरनेटने) जोडले गेले आहे... मग ते आफ्रिकेतले एखादे खेडे असो वा भारतातील एक लहानसे गाव. सगळे एकमेकांशी जोडले गेले आहे. मानवी इतिहासात घडलेल्या या इतक्या मोठ्या स्थित्यंतराची आपण योग्य ती ‘दखल’ घेतली आहे आणि त्या घटनेचे महत्त्व पुरतेपणाने आपल्याला समजले आहे, असे मला वाटत नाही. इंटरनेट हे माहितीचे लोकशाहीकरण करणारे, त्याचे विकेंद्रीकरण करणारे आहे. इंटरनेटमुळे सर्व प्रकारची माहिती सर्वांना वापरायला मिळते, खुलेपणा येतो. या इंटरनेटने शिक्षण, प्रशासन, वाहतूक, मनोरंजन, कुटुंब, कॉर्पोरेट क्षेत्र अशा एक ना अनेक जागा व्यापल्या आहेत. खरेतर इंटरनेटचा प्रभाव नसलेले एखादेही क्षेत्र आता बहुधा अस्तित्वातच नसेल. इथे पुन्हा तोच प्रश्न माझ्या मनाशी येतो.. असे जर असेल, तर मग या उपलब्ध सुविधेचा वापर आपण कसा करतो आहोत?

  तंत्रज्ञानाच्या विकासामुळे आपल्या जगण्याशी संबंधित बहुतांशी क्षेत्रांचा विकास झाला आहे. मृत्युदर कमी झाला आहे, वाहतूक सुधारली आहे, संवादक्षेत्र विकसित झाले आहे; पण आजही गरिबी, उपासमार, दहशतवाद, देशा-देशांमधील विखार, युद्ध, असमानता हे प्रश्न आपण सोडवू शकलेलो नाही. आपण श्रीमंत- गरिबांमधील दरी वेगाने वाढवली, शहरी-ग्रामीण असा भेद मिटवण्याऐवजी आणखी खोल केला, सुशिक्षित-अशिक्षित असा नवा वर्गभेद तयार केला. या जगात मूठभर लोकांच्या हातामध्ये सर्वाधिक संपत्ती आहे आणि फार मोठ्या संख्येने गरीब लोकांकडे अत्यंत कमी संपत्ती आणि साधने आहेत. - या प्रश्नाचा विचार करताना माझ्या डोळ्यासमोर जगाचा आकृतिबंध येतो. आताच्या जगाच्या आकृतिबंधातील शेवटचा बदल दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीच्या वेळेस अमेरिकेने केला. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात सगळे देश भांडणांमध्ये व्यस्त होते, त्या परिस्थितीवर उत्तर शोधत होते. तेव्हा अमेरिकेने काही युरोपीय देशांच्या मदतीने आताच्या जगाचा एक नवा आकृतिबंध किंवा साचा तयार केला. संयुक्त राष्ट्राची स्थापना केली पण त्याचे मुख्यालय अमेरिकेमध्ये. जागतिक बँकेची निर्मिती झाली पण त्याचे मुख्यालय वॉशिंग्टनमध्ये. जागतिक नाणेनिधी, जागतिक व्यापार संघटना, नाटो अशा सगळ्या जागतिक म्हणवल्या जाणाऱ्या संघटनांची कार्यालये आणि केंद्रस्थानेही पश्चिमेलाच. या आकृतिबंधाच्या घडणीमध्ये काही मापदंडही निर्माण करण्यात आले. जसे की जीडीपी, जीएनपी, दरडोई उत्पन्न, देशाच्या जमाखर्चाचा ताळेबंद, व्यापारातील तूट वगैरे.. हे मापदंड लावूनच प्रत्येकाची वाढ मोजली जाऊ लागली. त्यावरच एखाद्या देशात शांतता नांदते आहे की नाही, लोक आनंदी आहेत की नाही हे ठरवले जाते. कारण या निकषांच्या मोजमापाचे दुसरे कोणते आराखडेच जगासमोर नाहीत. आपण या आराखड्याचा नीट अभ्यास केला तर आताच्या जगाची घडण उलगडून पाहता येते. १९४७ साली महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली भारताने स्वातंत्र्य मिळवले. आपण वसाहतवादातून मुक्त झालो. अचानक लाखो लोकांच्या मनामधील इच्छा-आकांक्षा जागृत झाल्या. माझे वडील केवळ चौथ्या इयत्तेपर्यंत शिकले होते. ‘ब्रिटिशराज’ मध्ये राहत असताना आपला मुलगा कधी इंग्रजी शाळेत जाईल असे त्यांच्या स्वप्नातही येणे शक्य नव्हते. पण नंतर त्यांनी तशी आकांक्षा धरण्याची हिंमत केली, याचे मुख्य कारण म्हणजे स्वातंत्र्य. स्वातंत्र्याने सगळे बदलले. स्वातंत्र्याने लोकांच्या मनात नव्या आकांक्षा पेरल्या. अशक्य ते शक्य दिसू लागले. त्यासाठी प्रयत्नांची आकांक्षा बळावली. ‘मीसुद्धा ते करू शकतो’ असा विश्वास माझ्या वडिलांसारख्या एरवी मागे पडलेल्या अनेक लोकांच्या मनामध्ये निर्माण झाला. भारतानंतर आफ्रिकेतील देशांमागून देश स्वतंत्र झाले आणि तिथल्या लोकांच्या मनातही अशाच आकांक्षा निर्माण झाल्या. महायुद्धानंतर वीस वर्षांच्या आत सर्व जग वसाहतवादातून मुक्त झाले. पण अमेरिकेचा तो आराखडा मात्र कायम राहिला. तो आराखडा पाच स्तंभांवर आधारित आहे : लोकशाही, मानवी हक्क, उपभोग (कन्झम्प्शन), भांडवलशाही आणि एक मुद्दा ज्यावर सहसा कोणी बोलत नाही तो म्हणजे युद्ध! 

  युद्ध नावाचे यंत्र सतत चालू ठेवण्याची सोय या आराखड्यामध्येच अंतर्भूत आहे. याच काळात जगाची दोन गटांमध्ये विभागणी झाली. एकामध्ये भांडवलवादी, दुसऱ्यामध्ये साम्यवादी. तुम्हाला कोणता तरी एक पक्ष निवडावाच लागेल अशी स्थिती असताना, चीनच्या डेंग झिओपेंगने हे आव्हान स्वीकारत भांडवलशाही आणि साम्यवाद यांची एकत्रित मांडणी केली. एक नवा प्रयोग त्यांनी चीनमध्ये राबवला, ज्यामुळे चीनची प्रगती सतत ८ ते १० टक्क्यांच्या गतीने होत राहिली. 

  मी १९७९-८० साली अमेरिकन शिष्टमंडळाबरोबर पहिल्यांदा चीनला गेलो होतो. तुमचा विश्वास बसणार नाही पण तेव्हा शांघाय मुंबईइतके (सुद्धा) प्रगत नव्हते. पण आज मी शांघायला जातो तर हे शहर न्यू यॉर्कपेक्षा केवळ इमारतींच्याच बाबतीत नव्हे, तर सामाजिक आयुष्य, मोकळेपणाच्या बाबतीतही फार पुढे गेले आहे. मी पूर्वी गेलो होतो तेव्हा शांघायमध्ये फारशा गाड्याही नव्हत्या. बहुतेक लोक सायकलच चालवायचे. पण आज हे सगळेच्या सगळे चित्र बदलून गेले आहे. त्या बदलाने अक्षरश: थक्क व्हायला होते. यानंतर येतात ते रशियाचे गोर्बाचेव्ह! मी चीनच्या बरोबर उलट करणार असे त्यांनी ठरवले. अर्थव्यवस्था तीच ठेवेन पण राज्यपद्धती बदलेन असा बेत त्यांनी केला. पण तेथे ते नापास झाले. एका रात्रीत रशियन महासंघ भंगला आणि अनेक लहान देशांचा जन्म झाला. यामुळे जग एकध्रुवीय झाले. अमेरिका ही महासत्ता असेल आणि युरोपीय महासंघ तिच्या पाठीवर बसून जाईल असे सगळ्यांनी जणू ठरवूनच घेतले. - अखेरीस अमेरिकेने दिलेले जुने मॉडेलच कायम राहिले. सगळ्यांनी त्यामध्येच आनंदी राहायचे, वाटून घ्यायचे यावर काही अपवाद वगळता जगभर जणू एकमत झाले आणि ९/११ चा हल्ला झाला. अमेरिकेवरील या हल्ल्याने मग सगळी ‘रचना’च बदलून टाकली. मला नेहमी वाटते, रशियन महासंघ अस्तित्वात असता तर हा हल्ला झालाच नसता. केवळ एकच महासत्ता त्यांच्या पद्धतीने जगावर राज्य करेल या विचाराच्या विरोधी शक्तींनी अमेरिकेच्या एकाधिकारशाहीला दिलेले ते प्रत्युत्तर होते असे मला वाटते. अमेरिकन आकृतिबंध हा केवळ उपभोगावर आधारलेला आहे. जितका जास्त उपभोग घ्याल तितके जास्त वेगाने वाढाल असे या आकृतिबंधामागचे गृहीतक.. खरेतर सूत्रच आहे. पण या प्रक्रियेमध्ये नैसर्गिक साधनसंपत्तीचा ऱ्हास होतो. जगाच्या केवळ पाच टक्के लोकसंख्येसाठी अमेरिका जगातील ५० टक्के ऊर्जा वापरते. आज प्रत्येकाला या अमेरिकन मॉडेलचा मोह पडलेला आहे. प्रत्येकाला अमेरिकन व्हायचे आहे. चायनिज असो वा इंडियन, प्रत्येकाचे लक्ष्य एकच - शक्य त्या वेगाने अमेरिकेसारखे होणे! 

  जर तुम्ही श्रीमंत नाही, तर तुम्ही स्मार्ट नाही आणि तुम्ही स्मार्ट आहात, तर मग श्रीमंत कसे नाहीत? - असा रोकडा प्रश्न सतत लोकांचा पाठलाग करत असतोे. जग त्याच्या मागे धावत चालले आहे. पण हे मॉडेल जगाच्या अनेक भागांमध्ये चालणारे नाही, तेथे ते टिकणार नाही. प्रत्येकाने जर या वेगाने आणि या पद्धतीने उपभोग घ्यायचा ठरवला तर जग कोसळेल... हे कसे होईल याचा एक इशारा म्हणजे जगाच्या डोक्यावर लटकणारा ग्लोबल वॉर्मिंगचा धोका! 

  आज प्रत्येक जण व्यक्तिस्वातंत्र्यवादी, एककल्ली होत चालला आहे. अर्थात गेल्या पन्नास वर्षांमध्ये आपली स्थिती नक्कीच चांगली झाली आहे. १९४७ साली झालेल्या स्थित्यंतराच्या सुरुवातीने मोठे बदल घडवले आहेत. रेडिओ, मग टीव्ही, कलर टीव्ही, मग फोन, संगणक, मोबाइल, सॉफ्टवेअर, शेवटी इंटरनेट असा वेगाने प्रवास झाला आणि इंटरनेट येते तेव्हा माहितीचा प्रस्फोट होतो. मी माझेच उदाहरण देतो, १९६४ साली अमेरिकन विद्यापीठांमधील अभ्यासक्रमांची माहिती घेण्यासाठी मला बडोद्याहून मुंबईला रेल्वेने यावे लागत असे. मग अमेरिकन माहिती केंद्रात जायचे. तिथे तासन्तास रांगेत ताटकळत बसायचे. मग नंबर आला की तिथला माणूस केवळ पंधरा मिनिटांचा वेळ देई. तेवढ्यात जे काय मार्गदर्शन मिळे, त्यातून कोर्सेस पेन्सिलीने कागदावर उतरवायचे अशी स्थिती होती. पण आज अशी स्थिती नाही हे कॉलेजातला सर्वसाधारण बुद्धिमत्तेचा मुलगाही जाणतो. अवघ्या काही सेकंदात कुणालाही अमेरिकाच काय, जगभरातील विद्यापीठे, तेथील शिक्षक, अभ्यासक्रम सगळ्यांची माहिती मिळू शकते. मी अमेरिकेत गेलो तोपर्यंत कधी फोनही वापरला नव्हता, कारण फोन वापरायची वेळच आली नाही. आता मात्र तसे नाही. मूल जन्माला आले, की त्याच्या हातामध्ये फोन येतो. मोबाइल हे देवाने दिलेल्या देणगीसारखा जणू जन्मजात मिळणारा एक अवयवच होऊन गेला आहे. भाषेनंतर मानवाच्या इतिहासात झालेली सर्वात महत्त्वाची क्रांती म्हणजे इंटरनेट! लोक कोणत्याही ठिकाणी राहून जगातील कोणत्याही समान छंदाच्या व्यक्तींना एकत्र करून कम्युनिटी स्थापन करू शकतात. बिहारचा कोणताही मुलगा पॅरिस कसे आहे ते पाहू शकतो. मी तरुण होतो, तेव्हा असली स्वप्नेही आम्हाला पडत नसत. अमेरिकन मॉडेलमध्ये असमानता होती. प्रत्येक ठिकाणी असणारे भेदाभेद कायम राहिले होते. पण इंटरनेटने ही परिस्थिती मोडून काढली. समोर कोण व्यक्ती बसली आहे तिचे लिंग, धर्म, जात, भाषा, वंश याचा कोणताही विचार आता करावा लागत नाही. इंटरनेटमुळे जगाच्या मांडणीचा हा एक नवाच नवा आराखडा तयार होत गेला. या नव्या आराखड्यामुळे लोक एकदम जवळजवळ येऊ लागले. याला प्रतिसाद म्हणून अचानक कथित राष्ट्रवाद, सीमा बंद करून घेणे वगैरे कल्पना पुढे येऊ लागल्या. याचे उदाहरण द्यायचे झाले तर ब्रेक्झीट, ट्रम्प यांची निवड हे सांगता येईल. 

  - या अचानक सर्वत्र उसळलेल्या राष्ट्रवादामागे कारण काय असावे? मला वाटते, ग्लोबल कनेक्टिव्हिटी कशी हाताळायची हेच लोकांना माहिती नसणे! त्यातून निर्माण झालेल्या विचित्र संदर्भहीनतेतून, गोंधळातून, अनिश्चिततेतून लोकांनी घाईघाईने आपापले एक नवे मॉडेल घडवायला घेतले असावे. लोक असे जवळ आले, येतच राहिले आणि आजवर सवयीच्या असलेल्या सगळ्याच सीमा पुसल्या जात राहिल्या तर काय करायचे, असा प्रश्न आता लोकांना पडू लागला आहे. पूर्वीसारखे काहीच राहणार नसेल, सवयीची व्यवस्था नक्की कशी बदलणार, नव्या व्यवस्थेचे नियम कोणते असणार हेच जर माहीत नसेल, तर मग आपल्या उत्पादनांचे काय? आपल्या सेवांचे काय? आपल्या नोकऱ्याचे काय? - असे प्रश्न लोकांना पडायला लागले आहेत. माझ्या संस्कृतीचे काय, माझ्या मूल्यांचे काय आणि अखेर एक व्यक्ती म्हणून माझे काय हे त्याच प्रश्नांच्या लडीचे पुढचे आकडे! त्यामुळे लोक भूतकाळात पाहून भविष्याचा विचार करू लागले आहेत. 

  - पण असे होत नाही. भूतकाळात पाहून भविष्याचा विचार करता येत नाही. आता आम्हाला नवा आराखडा हवा आहे. तो अमेरिकेचा जुना आराखडा आता कालबाह्य झाला आहे.

  आता लोकांना वेगळे काहीतरी हवे आहे.

  लोक हळूहळू म्हणायला लागतील, मला तुम्ही ते जीडीपी, जीएनपीचे मापदंड लावू नका, माझा बँक बॅलन्स किती आहे यावरून माझी किंमत करू नका. पैसा म्हणजे सगळी संपत्ती नाही. जर हा पैसा आपले कुटुंब, समाज, समुदाय नासवून टाकत असेल, साधनसंपत्तीचा ऱ्हास करत असेल किंवा प्रदूषण करत असेल तर अशी संपत्ती निर्माण करण्यात काय अर्थ आहे? 

  - या प्रश्नांची उत्तरे आता नव्या कनेक्टेड जगाला शोधावी लागतील. लोकशाहीबरोबर सर्वसमावेशकता आणि मानवी हक्काबरोबर लोकांच्या गरजांचा समावेश ‘नव्या आकृतिबंधा’त करावा लागेल.

  असे जर असेल, तर..

  इंटरनेट हे माहितीचे लोकशाहीकरण करणारे, त्याचे विकेंद्रीकरण करणारे आहे. इंटरनेटमुळे सर्व प्रकारची माहिती सर्वांना वापरायला मिळते, खुलेपणा येतो. या इंटरनेटने शिक्षण, प्रशासन, वाहतूक, मनोरंजन, कुटुंब, कॉर्पोरेट क्षेत्र अशा एक ना अनेक जागा व्यापल्या आहेत. खरेतर इंटरनेटचा प्रभाव नसलेले एखादेही क्षेत्र आता बहुधा अस्तित्वातच नसेल. इथे पुन्हा तोच प्रश्न माझ्या मनाशी येतो, असे जर असेल, तर मग या उपलब्ध सुविधेचा वापर आपण कसा करतो आहोत?

  उत्तरांंमधून आलेले नवे प्रश्न

  तंत्रज्ञानाच्या विकासामुळे आपल्या जगण्याशी संबंधित बहुतांशी क्षेत्रांचा विकास झाला आहे. मृत्युदर कमी झाला आहे, वाहतूक सुधारली आहे, संवादक्षेत्र विकसित झाले आहे; पण आजही गरिबी, उपासमार, दहशतवाद, देशा-देशांमधील विखार, युद्ध, असमानता हे प्रश्न आपण सोडवू शकलेलो नाही. 

  आपण श्रीमंत-गरिबांमधील दरी वेगाने वाढवली, शहरी-ग्रामीण असा भेद मिटवण्याऐवजी आणखी खोल केला, सुशिक्षित-अशिक्षित असा नवा वर्गभेद तयार केला. या जगात मूठभर लोकांच्या हातामध्ये सर्वाधिक संपत्ती आहे आणि फार मोठ्या संख्येने गरीब लोकांकडे अत्यंत कमी संपत्ती आणि साधने आहेत.महत्वाच्या आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लोकमत अॅप: Android | IOS